पोलिसांसाठी खुशखबर! किरकोळ सुट्ट्यांमध्ये केली वाढ

25 Mar 2022 15:51:01
 
 
police
 
 
मुंबई : पोलिसांवरील कामाचा ताण कमी करण्यासाठी कामाचा आठवडा पाच दिवसांचा करावा, पोलिसांच्या घरांचा, आरोग्याचा प्रश्न सोडवावा आणि वार्षिक किरकोळ रजांची संख्या १२ वरुन २० करावी अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी लक्षवेधीद्वारे केली होती. यावर उत्तर देत असताना गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले की, "पोलिसांच्या वार्षिक किरकोळ रजा २० दिवस करण्यासाठी गृह विभागाने तत्त्वतः मान्यता दिली आहे. हा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर ठेवून लवकरच त्याला अंतिम मंजुरी दिली जाईल."
 
 
लक्षवेधी मांडत असताना आमदार रोहित पवार म्हणाले की, “आपल्या मागण्यांसाठी कधीही आंदोलन न करणाऱ्या किंवा काम बंद न करणाऱ्या पोलिसांचे मूलभूत प्रश्न राज्य सरकारने सोडविले पाहीजेत. जे आपले रक्षण करतात, त्यांच्यासाठी राज्याने घर, आरोग्य, सुट्टी आणि कामांच्या तासांबाबत न्याय्य भूमिका घ्यावी. पोलिसांना आरोग्य सुविधा पुरविणाऱ्या कॅशलेस हॉस्पिटल्सची संख्या वाढवावी आणि निवृत्तीनंतरही पोलिसांना मेडिक्लेमसारखी सुविधा देता येईल, अशी योजना आखावी.”
 
 
आमदार सीमा हिरे, सुनील टिंगरे, भारती लवेकर यांनी देखील या लक्षवेधीदरम्यान आपले प्रश्न मांडले. आठ तासांच्या ड्युटीबद्दल बोलताना शंभूराज देसाई म्हणाले की, गृहविभागाने महिला कर्मचाऱ्यांना आठ तास ड्युटी देण्याचा निर्णय जानेवारी महिन्यात घेतलेला आहे. प्रायोगिक तत्त्वावर हा निर्णय घेतला होता. त्याचे चांगले परिणाम दिसत असून पुढे सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. तसेच पोलिसांना चांगले उपचार मिळावेत यासाठी राज्यातील ३४७ हॉस्पिटल्स गृहविभागाने कॅशलेस उपचारासाठी निवडलेली आहेत. ही संख्या अपुरी पडल्याचे निदर्शनास आल्यास यावर सकारात्मक विचार केला जाईल.
 
 
तसेच पोलिसांच्या घराचा प्रश्न सोडविण्यासाठी दोन वर्षात मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मा. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पुरेशी तरतूद केल्यामुळे पोलिसांना लवकरात लवकर घरे मिळतील, असेही आश्वासन शंभूराज देसाई यांनी दिले. २०१८-१९ च्या अर्थसंकल्पात पोलिसांच्या घरांसाठी साधारणतः ४०० कोटींची तरतूद होती. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर २०२१-२२च्या अर्थसंकल्पात घरांसाठी ७३७ कोटी आणि यावर्षीच्या अर्थसंकल्पात ८०२ कोटी अधिक इतर खर्चांकरता मिळून १ हजार २९ कोटींची तरतूद प्रस्तावित केली आहे. तीन वर्षात घरांसाठीची तरतूद ४०० कोटींवरुन एक हजार कोटींवर करण्यात आली असल्याची माहिती शंभूराज देसाई यांनी दिली. तसेच सध्या ७ हजार २०५ निवासस्थानांची कामे सुरु आहेत. निविदा प्रसिद्ध प्रकल्प १,२३५ आणि निविदास्तरावर २ हजार ७२७ प्रकल्प असल्याचेही त्यांनी सांगितले.
Powered By Sangraha 9.0