मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या सोडतीमध्ये यशस्वी ठरलेल्या पात्र अर्जदारांकडून लाचेची मागणी करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांना बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. या दोन्ही कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई मंडळाच्या सोडतीमध्ये अल्प उत्पन्न गटात यशस्वी ठरलेल्या अर्जदाराने पात्रतेची संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. यानंतरही सदनिकेचा ताबा देण्यासाठी मिळकत व्यवस्थापक यशवंत गोसावी यांनी विजेत्याकडे ७५ हजार रुपयांची मागणी केली. विजेत्यास ही रक्कम द्यायची नसल्याने त्यांची नातेवाईकांनी लाच लुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार रचलेल्या सापळ्यात गोसावी यांनी ७५ हजार रुपयांची रक्कम स्वीकारली. तसेच घराचा ताबा देण्याचे काम करण्यासाठी वरिष्ठ लिपिक संदीप पांचाळ यांनी २५ हजार रुपये देण्यात आले. यावेळी पांचाळ यांनाही रंगेहाथ पकडण्यात आले. या दोघांवर विभागाने लाच स्विकारल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.