कोकणात सॅटलाईट टॅग केलेल्या 'प्रथमा'ने कापले २५० किमी अंतर; गुजरातमध्ये प्रवेशाची शक्यता

24 Mar 2022 12:08:48
Sea Turtle


मुंबई (अक्षय मांडवकर) -
कोकण किनारपट्टीवर ( konkan sea turtle ) सॅटेलाईट ट्रान्समीटर लावलेल्या 'प्रथमा' नामक मादी कासवाने गेल्या दोन महिन्यांमध्ये २५० किमी अंतर कापले आहे. येत्या काही दिवसांमध्ये ही मादी गुजरातच्या सागरी परिक्षेत्रामध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर प्रथमच सागरी कासवांना 'सॅटलाईट टॅग' करण्यात आले असून कोकणात अंडी घातल्यानंतर त्यांचा सागरी प्रवास सुरू आहे. ( konkan sea turtle )

दरवर्षी नोव्हेंबर ते मार्च महिन्यादरम्यान 'ऑलिव्ह रिडले' प्रजातीची मादी कासवे कोकण किनारपट्टीवर अंडी घालण्यासाठी येतात. अरबी समुद्रातील त्यांचा अधिवास आणि स्थलांतर जाणून घेण्यासाठी 'मँग्रोव्ह फाऊंडेशन' आणि 'भारतीय वन्यजीव संस्थान'ने (डब्लूआयआय) पाच मादी कासवांना 'सॅटेलाईट ट्रान्समीटर' लावले. वेळासमध्ये 'प्रथमा', आंजर्ल्यात 'सावनी' आणि गुहागरमध्ये 'रेवा', 'लक्ष्मी', 'वनश्री' या कासवांना 'सॅटलाईट ट्रान्समीटर' लावनू त्यांना समुद्रात सोडण्यात आले होते. यामधील 'लक्ष्मी' वगळता इतर चार मादी कासवांचा समुद्रातील प्रवास सुरू आहे. 'लक्ष्मी' कासवावरील 'सॅटेलाईट'मध्ये बिघाड झाल्याने किंवा तिचा मृत्यू झाल्याची शक्यता असल्याने तिच्या प्रवासाची माहिती मिळणे बंद झाले आहे. इतर चार कासवांमधील 'प्रथमा'ने गेल्या दोन महिन्यांमध्ये वेळासपासून सरळ रेषेत उत्तरेकडे २५० किमी अंतर कापल्याची माहिती समोर आली आहे.


'मॅंग्रोव्ह फाऊंडेशन'चे सागरी जीवशास्त्रज्ञ हर्षल कर्वे यांनी सांगितले की, "गेल्या दोन महिन्यांमध्ये 'प्रथमा'ने वेळापासून सरळ रेषेत उत्तरेकडे २५० किमी अंतर कापले आहे. सध्या ती डहाणूपासून ८६ किमी समुद्रात आहे. परंतु, अजूनही तिने गुजरातच्या सागरी परिक्षेत्रात प्रवेश केलेला नाही." 'सावनी' नामक मादी मुरुडपासून ७३ किमी समुद्रात असून तिने आंजर्लेपासून १०१ किमी अंतर कापले आहे. यादरम्यान तिने आंजर्लेनंतर केळशी किनाऱ्यावर पुन्हा अंडी घातली आहेत. गुहागरमध्ये सॅटेलाईट टॅग लावलेल्या 'वनश्री' मादीने ७४ अंतर कापले असून ती सध्या गणेशगुळेपासून समुद्रात ५ किमी अंतरावर वावरत आहेत. तर 'रेवा' या मादीने १५६ किमी अंतर कापले असून ती तोंडवलीपासून ५ किमी अंतरावर समुद्रामध्ये आहे.
Powered By Sangraha 9.0