चांदोली धरणात वाढतेय 'नदी सुरय' पक्ष्यांची नवी पिढी; वीण वसाहतीची नोंद

22 Mar 2022 22:33:41
river tern



मुंबई (विशेष प्रतिनिधी) - 'चांदोली राष्ट्रीय उद्याना'तील चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात नदी सुरय ( river tern ) पक्ष्यांनी आपली वीणवसाहत तयार केली आहे. धरणाचे पाणी आटल्यामुळे पाण्याबाहेर आलेल्या छोट्या बेटांवर या पक्ष्यांच्या वीण वसाहती आढळून आल्या आहेत. जागतिक स्तरावर नदी सुरय ( river tern ) संख्या कमी होत आहे.
 
 
 
'इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर'च्या (आययूसीएन) लाल यादीत नदी सुरय पक्ष्यांची नोंद संभाव्य धोकाग्रस्त प्रजातींमध्ये करण्यात आली आहे. नदी आणि खाडीच्या परिसरात या पक्ष्यांचा अधिवास आढळतो. प्रामुख्याने गोड्या पाण्याच्या परिसरात नदी सुरय पक्षी अधिवास करणे पसंत करतात. महाराष्ट्रात स्थानिक स्थलांतर करणारे हे पक्षी नद्यांमधील बेटांवर समूहाने वीण वसाहत तयार करतात. जमिनीवरच घरटे बांधतात. मार्च ते मे हा या पक्ष्यांचा विणीचा हंगाम असतो. 'सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाती'ल 'चांदोली राष्ट्रीय उद्याना'त या पक्ष्यांची वीण वसाहत निदर्शनास आली आहे.
 
 
 
 
चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात निर्मनुष्य ठिकाणी नदी सुरय पक्ष्यांनी घरटी बांधल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी नंदकुमार नलावडे यांनी दिली. उष्णतेमुळे धरणातील पाण्याच्या पातळीत घट झाली आहे. त्यामुळे धरणामध्ये पाण्याबाहेर आलेल्या छोट्या टेकड्या तयार झाल्या आहेत. या टेकड्यांवर २० ते २५ ठिकाणी आम्हाला २ ते ३ अंडी सापडली असून त्याठिकाणी लावलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये नदी सुरय आणि त्यांच्या पिल्लांची छायाचित्र टिपण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. चांदोली धरणामध्ये दरवर्षी नदी सुरय पक्षी आपली वीण वसाहत तयार करत असल्याची माहिती मानद वन्यजीव रक्षक अजितकुमार पाटील यांनी दिली. तसेच कोयना जलाशयातील बेटांमध्येही या पक्ष्यांची वीण वसाहत होत असल्याचे त्यांनी सांगितले.
 
 
 
 

Powered By Sangraha 9.0