ईडीचे पाहुणे मातोश्रीच्या अंगणात

22 Mar 2022 18:49:45
 
ED2
 
 
 
मुंबई : केंद्रीय तपाससंस्थांच्या वतीने महाराष्ट्रात करण्यात येत असलेल्या कारवाईला मोठा वेग मिळाल्याचे मंगळवारी दिसून आले. शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे आणि रश्मी ठाकरे यांचे भाऊ श्रीधर माधव पाटणकर यांच्या मालमत्तांवर अंमलबजावणी संचालनालय (ईडी) तर्फे मोठी कारवाई करण्यात आली आहे. पाटणकर यांच्याशी संबंधित ६ कोटी ४५ लाख रुपये किंमतीच्या सुमारे ११ सदनिका ईडीमार्फत सील करण्यात आल्यामुळे ठाकरे परिवार आणि शिवसेनेला मोठा तगडा झटका बसल्याचे बोलले जात आहे.
 
 
 
मागील काही आठवड्यांमधील ईडीच्या कारवाया बघता मंगळवारी करण्यात आलेली ही कारवाई म्हणजे ईडी पुन्हा ऍक्शन मोडमध्ये आल्याचे निर्देशित करत आहे, असेच दिसत आहे. मार्च २०१७ मध्ये दाखल करण्यात आलेल्या पुष्पक बिलीयन फसवणूक प्रकरणात ईडीतर्फे ही कारवाई करण्यात आली आहे. याच प्रकरणी ईडीने यापूर्वी मनी लाँड्रिंगचा गुन्हा देखील दाखल केलेला आहे. त्यानुसार हा तपास सुरू आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ईडीचे धाडसत्र सुरू आहे. यात अनेक मोठ्या कारवाई करण्यात आल्या आहेत.
 
 
 
Powered By Sangraha 9.0