युक्रेनच्या महिला...

19 Mar 2022 12:31:59
 
 
ukraine
 
 
युक्रेनमधील महिलांच्या परिस्थितीचा आढावा घेतला तर जाणवेल की, युद्धग्रस्त स्थितीतही स्त्रीला विकृततेचा सामना करावा लागतोच. सगळ्यात प्राचीन संस्कृतीमध्ये आणि नवमानवतावादामध्येही स्त्रीला उपभोग्य वस्तू समजू नका, केवळ शरीर समजू नका, असा संदेश असतोच असतो. तरीही जगभरात ही वृत्ती मरण पावलेली नाही. असाहाय्य महिलेला मदत करणारे लोकही आहेत. पण, तिच्या परिस्थितीमुळे स्त्रीत्वाचा फायदा घेणारेही आहेत हे सत्यच आहे. उडदामाजी काळे गोरे असतात हे ठीक आहे. कुठे तरी वाईट असते, असे जरी मानले तरीसुद्धा त्या कुठे तरी वाईट असणार्‍यांमुळे ज्या मुलीमहिलांचे आयुष्य उद्ध्वस्त होते, त्या उद्ध्वस्ततेची तुलना महायुद्धातल्या विनाशाशीच होऊ शकते. आताही जगभरात युद्धसदृश्य स्थिती असलेल्या देशांमध्ये महिलांच्या आयुष्यात काय घडत आहे याचा विचारही करवत नाही. रशिया-युक्रेन युद्धात युक्रेनमधील महिलांची स्थिती काय असेल?
तर यावर ८ मार्च रोजीची एक अत्यंत कुप्रसिद्ध बातमी प्रकाश टाकू शकेल. ८ मार्च रोजी साओ पावलो इथला खासदार आर्थर डो वाल हा युक्रेनमधील विध्वंसाची पाहणी करण्यासाठी युक्रेन सीमेवर गेलेला. तिथून त्याने एक विधान केले ते असे-“मी आता पायी चालतच युक्रेन आणि स्लोव्हाकियाची सीमा ओलांडली. शपथेवर सांगतो, मी एवढ्या सुंदर मुली अगोदर कधीच पाहिल्या नाहीत. निर्वासितांची रांगच रांग... २०० मीटरहून लांब ही रांग होती आणि त्यामध्ये अतिशय सुंदर स्त्रियांचा समावेश आहे. या स्त्रिया इतक्या सुंदर आहेत की, ब्राझीलच्या नाईट क्लबच्या बाहेर उभ्या राहणार्‍या मुलींची त्यांच्याशी तुलनाही केली जाऊ शकत नाही. युक्रेनच्या महिला स्वस्त आणि सेक्सी आहेत.” युक्रेनमधल्या विध्वंसाची पाहणी करण्यासाठी राजनैतिक मिशनवर असताना वाल असे बोलला. एखादी व्यक्ती मग ती स्त्री असो की, पुरूष ती दुःखात असताना दुसर्‍या व्यक्तीला तिचे दु:ख दिसत नाही. मात्र, त्याचवेळी तिचे उपभोग्यपण दिसते यापेक्षा वाईट गोष्ट काय असू शकते? याच पार्श्वभूमीवर आणखी एक बातमी समोर आली आहे. ती चीन आणि युक्रेनसदंर्भातली आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर विवाह जुळवणार्‍या ‘मैलिश्का’ या संस्थेचे पावेल स्टेपनेस म्हणाले की, सध्या चीनमधून विवाहासाठी युक्रेनच्या मुलींना मागणी अचानक वाढली. कारण, चीनच्या पुरूषांना खात्री आहे की, युक्रेनमध्ये सध्या युद्धामुळे परिस्थिती गंभीर आहे. तिथले नागरिक युक्रेनमधून पलायन करत आहेत. त्यामुळे युद्धग्रस्त स्थितीला वैतागून आणि घाबरून युक्रेनच्या मुली देशाबाहेर राहण्यास तयार होतील, असे चिनी पुरूषांना वाटते, तर जागतिक स्तरावर समाजाचा अभ्यास करणार्‍या एका गटाचे म्हणणे आहे की, सौंदर्याच्या मापदंडात जागतिक स्तरावर काही निकष आहेत. युक्रेनमधील लोक या सौदर्यांच्या निकषात गुण राखून आहेत. लग्नाच्या बाजारात या मापदंडांना जगभरात आजही किंमत आहे. त्यानुसार चिनी पुरूषांना वाटते की, युक्रेनमधील अस्थिर परिस्थितीमुळे युक्रेनमधील गोर्‍या आणि सोनेरी केसांच्या त्या मुली सहजासहजी विवाहाला तयार होतील. मात्र, यावर समाजअभ्यासकांनी चिंता व्यक्त केली.
त्यांच्या मते, ही मागणी विवाहाकरता नसून त्या मुलींच्या शोषणासाठीही असू शकते. कदाचित या मुलींच्या परिस्थितीचा फायदा घेऊन त्यांना देहविक्रीच्या धंद्यात ढकलण्याचेही षड्यंत्र असू शकते. एक-दोन वर्षांपूर्वी चीनमध्ये असेच विवाहासाठी पाकिस्तानातील ख्रिस्ती मुलींची मागणी वाढली होती. त्यानंतर सत्य उघडकीस आले की, पाकिस्तानातील गरीब ख्रिस्ती मुलींना विवाहाचे अमिष दाखवून चीनमध्ये नेले जायचे. नंतर त्यांना देहविक्रीच्या धंद्यात ढकलले जायचे. पाकिस्तानमधील ख्रिस्ती मुलीच का? तर इस्लाम राष्ट्र असलेल्या पाकिस्तानमध्ये ख्रिस्ती धर्मीय अल्पसंख्यक आहेत. तिथे त्यांच्यावर होणार्‍या अत्याचाराची गणती नाही. पाकिस्तानमध्ये होणार्‍या अत्याचारापासून सुटकेसाठी इथल्या मुली चीनमधील मुलांशी लग्न करण्यास तयार होतील, असेच गणित त्यावेळी मांडण्यात आले. त्यानुसार शेकडो मुली पाकिस्तानातून चीनमध्ये गेल्या आणि पुढे त्यांचे जे काही झाले ते केवळ शोषणच. त्यामुळे चीनमध्ये युक्रेनच्या मुलींना विवाहासाठी मागणी वाढली हा एक चिंतेचाच विषय आहे. बाकी विवाह काय इतर कोणत्याही बाबतीत जग चिन्यांवर विश्वास ठेवण्यास सहजासहजी तयार होत नाही. युक्रेनच्या मुलींचे जगणे पुन्हा सुलभ होवो हीच इच्छा!
Powered By Sangraha 9.0