घर हवे मजला मातीचे...

    दिनांक  19-Mar-2022 17:33:38   
|

Mud House

गावाकडचे कौलारू टुमदार घर, ऐसपैस अंगण आणि छानशी बाग हे स्वप्न भारतात राहणार्‍या प्रत्येकाच्याच ’बकेट लिस्ट’मध्ये असेल. परंतु, अशाच प्रकारची स्वप्नं आता अमेरिकन माणसं सत्यात उतरवू पाहत आहेत. भारतीय संस्कृतीप्रमाणे साकारण्यात आलेल्या घरांची मागणी अमेरिकेत वाढू लागली आहे.


मातीच्या घरांमध्ये 'गृहप्रवेश' व्हावा, यासाठी अमेरिकेतील मंडळी अट्टाहास धरू लागली आहेत. अशा मातीच्या घरांना पाहून आपल्याला भारतातील कुठल्या तरी खेड्यापाड्यांची आठवण येईल, पण अमेरिकेतील माँटेना आणि एरिझोना राज्यांमध्ये अशा घरांची मागणी वाढू लागली आहे.


दरम्यान, अमेरिकेत गेल्या दोन वर्षांपासून माती आणि भुसा मिश्रित घरे तयार केली जात आहेत. १९९५ मध्ये स्टेनफोर्ड विद्यापीठात तीन विद्यार्थ्यांनी हा प्रयोग सुरू केला होता. ‘डान्सिंग रॅबिट’ नावाच्या एका गावात अशी घरे तयार करण्याची रीत आहे. या गावाला ’इको-व्हिलेज’ही म्हटले जाते. कोरोनाच्या काळात शाश्वत राहणीमानाकडे सर्वांचा कल वाढला आहे. त्यामुळे अशा प्रकारचा कल अमेरिकेतल्या शहरांमध्ये सुरू झाला.

कोरोना काळात ‘लॉकडाऊन’मध्ये सोशल मीडियाचा यथेच्छ वापर झाला. पण, यात काही चांगल्या गोष्टीही शिकता आल्या. याच काळात अमेरिकेतल्या ‘डान्सिंग रॅबिट’ या नावाने ‘इको-व्हिलेज’ तयार केले. या ठिकाणी मातीची घरे तयार करणार्‍या कुटुंबाचा व्हिडिओ ‘व्हायरल’ झाला होता. त्यानंतर या गावात अशा घरांसाठी प्रशिक्षण घेणार्‍यांची संख्याही वाढू लागली. ‘इको-व्हिलेज’मध्ये सध्या अशी ३८ घरे आहेत. सर्व घरे मातीचीच तयार केलेली आहेत.
Mud House
कोरोना काळात दररोज इथे ४०-४५ माणसे प्रशिक्षणासाठी येत असत. आता ही संख्या हजारांवर गेली आहे. ‘डान्सिंग रॅबिट’च्या कार्यकारी संचालक डेनिएल विलियम्स यांनी याबद्दल सध्याच्या आर्थिक चणचणीचा मुद्दा जोडला आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे जगात अस्थिरतेचे वातावरण आहे.


१९९५ मध्ये इराक-कुवेत युद्धामुळे कच्च्या तेलाचे भावही गगनाला भिडले होते. घरखरेदीही महागली होती. त्यानंतर स्टेनफोर्ड विद्यापीठातील तीन विद्यार्थ्यांनी एका नव्या प्रकल्पाची सुरुवात केली. अमेरिकेतील मिसूरी राज्यातील रटलेजमध्ये त्यांनी २८० एकर जागा घेतली. त्यात ‘इको-व्हिलेज’ स्थापन केले. अमेरिकेतील मूळ निवासी ‘रेड इंडियन्स’ ज्यांना पूर्वीपासूनच मातीच्या घरात राहतात.


या सर्वांना प्रेरणा भारतातील घरे आणि संस्कृती पाहूनच मिळाली होती. याबद्दल संशोधन केल्यावर मातीच्या घरांमध्ये राहण्याचे फायदे कळाले. त्यामुळे काहीही झाले, तरीही घरांची रचना याचप्रमाणे असावी, असा निश्चय या चमूने केला होता. कोरोना काळात कमी खर्चात ग्राहकांना घरे उपलब्ध करून देण्याची ही कल्पना फारच पथ्यावर पडली. पर्यावरणपूरक असल्याने याला तेथील पर्यावरणप्रेमींनी डोक्यावर घेतले. या घरांमध्ये सिमेंट किंवा धातूंच्या कुठल्याही प्रकारचा वापर होत नाही.


ज्या जमिनीवर घरे तयार करायची आहेत, तिथेच खड्डा खणून माती मिळवली जाते आणि बाजारातून भुसा खरेदी केला जातो. ७० टक्के रेती आणि ३० टक्के मातीमध्ये हा भुसा मिश्रित करून भिंत तयार केली जाते. लाकडाचे छत तयार केले जाते. भिंतींच्या मिश्रणाद्वारेही छत तयार करता येऊ शकते. छतांवर सोलार पॅनेल बसवलेले आहे. त्याद्वारे पुरेशी वीजही तयार केली जाऊ शकते.


Mud House


पावसाच्या पाण्याचा जोर झेलू शकेल, इतक्या ताकदीची ही घरं तयार केली जातात. त्यामुळे पावसात काय होणार, याचीही चिंता नाही. सध्या अमेरिकेत १२ चौरस फुटांची घरे तयार करण्यासाठी मंजुरी घ्यावी लागते. त्यामुळे परवानग्यांच्या अटीशर्तींच्या जाचातून सुटण्यासाठी १२ चौरस फुटांचं मोठं घर तयार करण्याऐवजी लहान घरे तयार केली जात आहेत. सरकारतर्फेही याबद्दल काही सवलती मिळवता येतील का, यासाठीही प्रयत्न सुरू आहेत.

मातीच्या या घरांमध्ये थंडीच्या दिवसांत उष्ण आणि उकाड्यामध्ये थंड, असे वातावरण घरात राहते. भारतातील ग्रामीण घरांचा विचार केला असता आजही ७०-८० वर्षे जुनी घरे तितकीच शाबूत असल्याचे प्रमाण मिळते. पर्यावरणाचा र्‍हासही थांबतो. त्यामुळे कार्बन उत्सर्जन होत नाही. विशेष म्हणजे, ही कल्पना भारतीयांच्या जीवनमानातून सुचलेली आहे.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

तेजस परब

मुंबई विद्यापीठातून एमएसीजेपर्यंत शिक्षण. वाणिज्य शाखेतून पदवी. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. तीन वर्षांपासून विविध वृत्तपत्रांमध्ये वार्ताहर व उपसंपादक पदाचा अनुभव. दोन प्रमुख वृत्तपत्रांतील निनावी सुत्रांच्या बातम्यांबद्दल संशोधन. डिजिटल मीडियासाठी लेखन.