जीवासवे जन्मे मृत्यू...

    17-Mar-2022
Total Views |

death
 
 
पूर्वकर्मानुसार जेव्हा जीव जन्माला येतो तेव्हा त्याच्या मृत्यूचाही जन्म झालेला असतो. जन्म आणि मरण ही जोडी जन्मजातच असते. अखेरीस या जीवाला मृत्यूच्या मिठीत जावे लागते. हे सर्व या भूमीवर घडताना आपण पाहत असल्याने या भूमीला ‘मृत्युभूमी’ असे म्हणतात.
या पूर्वीच्या लेखातील शेवटच्या श्लोकात समर्थांनी सर्व जीवांच्या मागे मृत्यू लागलेला आहे, असे प्रतिपादन करुन या सत्याची जाणीव लोकांना करून दिली आहे. सामान्य जीव प्रपंचाच्या, वासनातृप्तीच्या, भावभावनांच्या अनेकविध व्यापांत इतका गुंतून गेलेला असतो की, मृत्यूची त्याला आठवण राहत नाही. तथापि, काळ म्हणजेच मृत्यू कोणालाही सोडणारा नाही. काळाचे वर्चस्व मृत्यूची अटळता स्पष्ट करून समर्थांनी हा विषय पुढील चार श्लोकांतून स्पष्टपणे मांडला आहे.
जिवां कर्मयोगें जनीं जन्म जाला।
परी सेवटीं काळमुखी निमाला।
महा थोर ते मृत्युपंथेचि गेले।
किती येक ते जन्मले आणि मेले॥१४॥
आपले तत्त्वज्ञान असे मानते की, पूर्वकर्मानुसार माणसाला जन्म मिळतो. हा जीव पुढील आयुष्यात सुखदुःख भोगून अखेरीस काळाचे भक्ष्य ठरते. साधारणपणे जगातील सर्वसामान्य माणसाच्या आयुष्याचा हा आलेख आहे. कोणी कितीही महान असला, कर्तृत्ववान, शूर, पराक्रमी असला, तरी तोही मृत्यूकडे वाटचाल करतो. आज असे किती आले आणि किती गेले, याची गणती नाही. तेव्हा आपली गती काही याहून वेगळी नाही, हे प्रत्येक माणसाने लक्षात ठेवून त्याप्रमाणे वागावे. मृत्यूबाबत बोलायचे, तर पूर्वकर्मानुसार कोणत्या कुटुंबात, कोणत्या समाजव्यवस्थेत जन्म झाला, हे महत्त्वाचे नसून अखेरीस या जीवाची इतिश्री मृत्यूच्या मुखात होणार आहे, हे सत्य विसरून चालणार नाही. अनेक व्यक्ती मृत्यूच्या वाटेने गेल्या व त्यांचे या भूतलावरील आयुष्य संपले, हे आपण रोज पाहतो. आपल्या डोळ्यांदेखत मृत्यूचा हा खेळ चाललेला आहे, तरीही माणूस मृत्यूबद्दल बोलायचे टाळतो. एका अर्थाने आपला मृत्यूशी काही संबंध नाही, अशा थाटात माणूस या जगात वावरत असतो. आपण अध्यात्मातील आत्म्याच्या अमरत्वाचा सिद्धांत जसाच्या तसा प्रपंचात भौतिक जीवनात देहाला लावतो. त्यामुळे मृत्यूशी माझा काही संबंध नाही, असा भ्रम माणसाच्या मनात निर्माण होतो. अध्यात्मातील सिद्धांत अध्यात्मात श्रेष्ठ असतात, पण ते जसेच्या तसे लौकिक जीवनाला लावले तर माणसाची फसगत होते. हे भ्रम दूर करावेत, होणार्‍या फसगतीपासून माणसाला सोडवावे, या उदात्त हेतूने समर्थांनी मृत्यूबद्दल चर्चा घडवून आणली आहे. सामान्य माणसाला ती चर्चा अप्रिय असली, तरी भ्रमनिरासासाठी ती आवश्यक आहे. समर्थ पुढे सांगतात-
मना पाहतां सत्य हे मृत्युभूमी।
जिता बोलती सर्वही जीव मी मी।
चिरंजीव हे सर्वही मानिताती।
अकस्मात सांडूनिया सर्व जाती॥१५॥
आत्म्याचे परमार्थातील अमरत्व देहाला लावल्याने मोठा भ्रम निर्माण होतो. या अवस्थेत माणूस सारखे ‘मी-मी’ करीत असतो. ‘मी हे केले’, ‘मी ते केले’, ‘सर्वकाही करणारा मीच आहे’, असा अहंभाव निर्माण झाल्याने माणूस मृत्यूला विसरतो व स्वतःला चिरंजीव समजू लागतो. सत्याची जाणीव पूर्णपणे विसरल्याने काही काळ तो ‘मी’च्या घमेंडीत वावरत असतो. अहंभावाची नशा चढल्याने त्याला या भ्रमातून बाहेर पडता येत नाही. त्याला याचा साधा विचारही नसतो की, गर्विष्ठपणाने केलेली कृत्ये, मिळवलेले सर्वकाही इथेच टाकून माणसाला अकस्मात येथून निघून या जगाचा निरोप घ्यावा लागतो. हे सर्वांच्या बाबतीत घडून येते. जीवन आणि मृत्यू ही जोडी विसरून कसे चालते. कविवर्य ग. दि. माडगूळकर म्हणतात, ‘जीवासवे जन्मे मृत्यू। जोड करजात।’ हे अगदी खरे आहे. पूर्वकर्मानुसार जेव्हा जीव जन्माला येतो तेव्हा त्याच्या मृत्यूचाही जन्म झालेला असतो. जन्म आणि मरण ही जोडी जन्मजातच असते. अखेरीस या जीवाला मृत्यूच्या मिठीत जावे लागते. हे सर्व या भूमीवर घडताना आपण पाहत असल्याने या भूमीला ‘मृत्युभूमी’ असे म्हणतात. अशा या मृत्युभूमीवर वावरत असूनही मी सदा जीवंत राहाणार आहे, असा भ्रम माणसाच्या ठिकाणी निर्माण होतो आणि माणसे स्वतःलाचिरंजीव समजू लागतात. असे हे चिरंजीव अचानक काहीतरी कारण घडते आणि मृत्यूच्या अधीन होतात. अव्यक्तात कसा परत जातो, या तत्त्वज्ञानातील प्रश्नांची उकल न करता समर्थ फक्त दृश्य परिणामांचा विचार मांडून माणसाने आपले जीवन सन्मार्गाने वागून या जीवाचा उद्धार करावा असे सांगतात. जीव या सृष्टीत अवतरल्यावर जगातील दृश्य वस्तू व भावनिक संबंधांतून त्याचा जीव येथे जडतो. त्याला वाटत असते की, देवाने हे सर्व माझ्यासाठीच निर्माण केले आहे. असा समज झाल्याने या दृश्य जगातील वस्तू येथेच सोडून जाण्याची कल्पना जीव करू शकत नाही, पण हे सृष्टिचक्र चालू राहण्यासाठी जीवाला दृश्य जग सोडून जावे लागते.
मरे येक त्याचा दुजा शोक वाहे।
अकस्मात तोही पुढें जात आहे।
पुरेना जनीं लोभ रे क्षोभ त्यातें।
म्हणोनी जनी मागुता जन्म घेतें॥१६॥
एक जीव मेला की, त्याच्या आजूबाजूला असलेले त्याचे संबंधी शोक करतात. तथापि शोक करणारे जीवंत असले, तरी त्यांनाही पुढे सरकत काळाच्या दिशेने जायचे असते. पण, आपण हळूहळू मृत्यूच्या दिशेने वाटचाल करीत आहोत, हे त्यावेळी त्यांच्या लक्षात येत नाही, जीवाने देह सोडला तरी जीवाची वासना, लोभ, तीव्र संताप, आसक्ती या भावना तशाच कायम राहतात. या वासनांच्या, भावनांच्या तृप्तीसाठी जीव नवीन देह धारण करून पुन्हा जन्माला येतो व जन्ममृत्यूंच्या दुष्टचक्रात अडकतो, असे भारतीय तत्त्वज्ञान मानते, तेव्हा वासना, भावना जिंकून म्हणजेच त्यांच्यावर ताबा मिसळून जीवाने शांतचित्ताने देह ठेवला, तर पुन्हा जन्म घेण्याचा प्रश्न उद्भवत नाही. आपल्या सर्व संतांनी अशा श्रेष्ठ अंत:काळावर भर दिला आहे. जीव जन्ममरणाच्या चक्रातून सुटणे आणि परमेश्वर तत्त्वाशी एकरुप होणे, यालाच संत ‘मोक्ष’ म्हणतात. भागवत पंथातील भक्तिमार्गी याचे वर्णन ‘विठ्ठलाच्या पायी विसावणे’ असे करतात. तथापि, सर्वसाधारण माणसे आयुष्यभर कसली ना कसली तरी चिंता करीत असतात. त्यांच्यासाठी समर्थांनी सांगितले आहे की, विनाकारण मनात चिंता करीत बसण्याची जी सवय जीवाला लागलेली असते, ती त्याने सोडून दिली पाहिजे.
मनीं मानव वेर्थ चिंता वाहातें।
अकस्मात होणार होऊनि जातें।
घडे भोगणे सर्वही कर्मयोगें।
मतिमंद ते खेद मान वियोगे ॥१७॥
अनेक गोष्टी आपल्या हातात नसतात. नियती सारे घडवून आणत असते. त्यामुळे मृत्यूसारख्या घटनाही अकस्मात वेळी घडून येतात. ही सर्व आपल्या कर्माची फळे असल्याने ते भोग भोगावे लागतात. अतिवेळी कमी बुद्धी असलेल्या माणसांना मात्र हा वियोग वाटतो म्हणून जे घडते त्याकडे शांत चित्ताने पाहावे, असा समर्थांना सल्ला आहे.
- सुरेश जाखडी