भारताचे क्षेपणास्त्र पाकिस्तानात चुकून डागले जाणे खेदजनक – संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Mar-2022
Total Views |
rs


प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करणार
 
 
 
नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : भारताचे क्षेपणास्त्र पाकिस्तानच्या हद्दीत चुकून डागले गेले असून त्याविषयी भारतास खेद आहे.  हे प्रकरण गंभीर असून त्याच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचवेळी, भारतीय क्षेपणास्त्र यंत्रणा अतिशय सक्षम आणि सुरक्षित आहे, असे प्रतिपादन देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत मंगळवारी केले.
 
 
भारताचे एक क्षेपणास्त्र काही दिवसांपूर्वी पाकिस्तानमध्ये डागले गेल्याची घटना घडली होती. त्याविषयी केंद्र सरकारने ११ मार्च रोजी स्पष्टीकरण देऊन ते चुकून डागले गेल्याचे सांगितले होते. त्याविषयी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही राज्यसभा आणि लोकसभेत सविस्तर निवेदन दिले.
 
 
संरक्षण मंत्री म्हणाले, ९ मार्च रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास क्षेपणास्त्र यंत्रणेची नियमित देखभाल आणि पाहणी सुरू असताना एक क्षेपणास्त्र चुकून डागले गेले आणि ते पाकिस्तानमध्ये गेल्याची घटना घडली आहे. हा प्रकार अतिशय खेदजनक आहे, मात्र समाधानाची बाब म्हणे यामध्ये कोणत्याही प्रकारचे नुकसान झालेले नाही. केंद्र सरकारने हा विषय अतिशय गांभिर्याने घेतला असून त्याच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. अर्थात, या कथित अपघाताचे कारण त्याची सविस्तर चौकशी केल्यानंतरच समजणे शक्य आहे.
 
 
 
 
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह पुढे म्हणाले, या घटनेच्या संदर्भात ऑपरेशन्स, मेंटेनन्स आणि निर्देशांसाठी मानक कार्यप्रणालीचे (एसओपी) देखील पुनरावलोकन केले जात आहे. भारताचे आपल्या शस्त्र आणि शस्त्रास्त्र प्रणालीच्या सुरक्षेस सर्वोच्च प्राधान्य असून त्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या त्रुटी आढळून आल्यास त्या तातडीने दूर केल्या जातील. भारताची क्षेपणास्त्र यंत्रणा अतिशय सुरक्षित आणि विश्वासार्ह असल्याची ग्वाही त्यांनी सभागृहाला दिली. त्याचप्रमाणे सुरक्षा प्रक्रिया आणि प्रोटोकॉल सर्वोच्च दर्जाचे असून त्याचा वेळोवेळी आढावा घेण्यात येतो. सर्वांत महत्वाचे म्हणजे भारताचे सशस्त्र दल प्रशिक्षित आणि शिस्तबद्ध असून त्यांना अशा यंत्रणा हाताळण्याचा पुरेसा अनुभव आहे, असेही संरक्षण मंत्र्यांनी यावेळी नमूद केले.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@