क्लेशकारक आणि वेदनादायी प्रसंग स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्ये घडत असतात. यात शारीरिक, मानसिक आणि लैंगिक छळाबरोबरच युद्ध दहशतवाद, घरगुती हिंसा, दुसर्यावर झालेल्या हिंसेच्या घटनांचे दर्शन, अपघात आणि नैसर्गिक विपदांचा समावेश होतो, या घटनांचा त्यातून जाणार्या स्त्रियांवर अत्यंत गंभीर आणि हानिकारक परिणाम होतो. अंदाजे ५० टक्के लोकांना अशा प्रकारच्या एखाद्या क्लेशकारक घटना अनुभवण्याचा प्रसंग आयुष्यात एकदा तरी येतो, बहुधा बरेच जण काही काळात अशा घटना विसरुन जातात किंवा त्यावर मात करतात. इतर अनेक या घटनांमुळे दीर्घकालीन समस्या अनुभवत राहतात. जवळजवळ आठ ते दहा टक्के बायकांना अशा हिंसक अनुभूतीमुळे ‘पोस्ट ट्रोमॅटीक स्ट्रेस डिसॉर्डर’ (Post-Traumatic Stress Disorder) होते, ज्यामध्ये त्यांना निद्रानाश, भीती, चिंता, चीड, राग यासारख्या भावना अनुभवतात. भयाण स्वप्ने पडत असतात. त्यांचा त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या नात्यांवरचा विश्वास उडतो. त्या प्रचंड आक्रमक होतात. त्यांच्या मनात आत्महत्येचे विचार येतात. शिवाय औदासिन्य व चिंता यासारखे मानसिक विकार त्यांच्यामध्ये उद्भवतात.
स्त्रियांच्या बाबतीत त्यांच्या जोडीदाराकडून वा जवळच्या नातेवाईकांकडून घरगुती हिंसा जगभर घडताना आपल्याला दिसत असतात. ही खरंतर जागतिक आणीबाणी आहे, यात स्त्रियांची प्रतिष्ठा, सुरक्षितता, मानवी हक्काची पायमल्ली तर होतच असते. परंतु, त्याहीपेक्षा पुढे जाऊन अशा प्रकारची हिंसक समस्या स्त्रियांसाठी सार्वजनिक आरोग्याची समस्या ठरली आहे, यात स्त्रियांना अधिक धोका आहे, शिवाय त्यांची कार्यक्षमताही कमी होते.
स्त्रियांवर वर सांगितल्याप्रमाणे अनेक प्रकारच्या हिंसा होतच असतात. त्यामुळे समाजात आढळणारी ही घटना समजावून घ्यायला हवी, अशा प्रकारच्या हिंसक घटना टाळायच्या असतील, तर मुळात त्या का घडतात, हे समजून घेतले पाहिजे. संशोधनातून असे सिद्ध झाले आहे. बर्याच स्त्रियांना ‘पोस्ट ट्रोमॅटीक स्ट्रेस डिसॉर्डर’ होत असते. ती खूप काळापर्यंत त्यांना सहन करावी लागते आणि या स्त्रिया अशा स्थितीत आवश्यक असणारी मनोपचार पद्धती घेत नाहीत. अगदी समस्या खूप वाढल्या, सहन होत नाही, असे वाटले म्हणजेच पाणी जवळजवळ डोक्यावरून गेले असे वाटले की, त्या सायकॅट्रीस्टकडे पोहोचतात, काही बायकांना त्यांच्या नवर्याने भिंतीवर डोके आपटून अनेक वर्षे मारलेले असते. डोक्यावर कळशी आपटून मारलेेले असते. हातातील ‘डम्बेल’ने डोक्यावर घाव घातलेला असतो. तेव्हा जर रक्त आले नाही, तर या स्त्रिया भारतातच नाही तर जगभरातसुद्धा दवाखान्यात जाण्यास धजत नाहीत. त्यांना या गोष्टींची वाच्यता करायची नसते. मनावर दबाव असतो. लाज वाटत असते, मनात विश्वास नसतो, धैर्य नसते. घरगुती हिंसा भावनिक असते, शारीरिक असते आणि आध्यात्मिक असते, पण अनेक स्त्रियांना डोक्याला मार लागून झालेली भीषण इजा आणि त्याचे भयानक परिणाम जगात जेवढे लक्षात यायला पाहिजे, तेवढ्या प्रमाणात का लक्षात आले नाहीत, याचा खरंतर विचार व्हायला हवा. लाखो स्त्रिया या जगात या दारुण परिणामांसह जगत आहेत. त्यामुळे येणार्या ‘फीट्स’, डोळे अधू होणे, कानांनी ऐकू न येणे, स्पर्शाचे ज्ञान न होणे, डोकेदुखी होणे, तोल ढळणे यांसारख्या अनेक प्रकारच्या परिणामांसह स्त्रिया जगत असतात. असं का झालं, तर डोक्याला मार लागला एवढंच उत्तर देऊन त्या थांबतात. यावर जगात फार संशोधनही झालेले नाही. कारण, तो मार घरगुती हिंसेबरोबरच समाजाच्या अजाण, अज्ञानी चादरीखाली दडवला गेला आहे.
या अशा शारीरिक आणि मानसिक जखमांवर योग्य आणि वेळीच उपचार न झाल्यामुळे होणारे शारीरिक परिणाम स्त्रियांसाठी प्राणघातक तर आहेतच, पण ते त्यांच्या दैनंदिन जीवनात त्यांना कमजोर करणारेही आहेत. याशिवाय घरगुती हिंसा आणि लैंगिक हिंसा जी स्त्रियांच्या बाबतीत अधिक प्रमाणात होते, जी समाजासमोर वा आरोग्य संस्थांच्यासमोर सहजासहजी आणली जात नाही, त्याचा मानसिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून जितका विचार व्हावा तितका तो आजही झालेला दिसत नाही. कारण, अशा प्रकारच्या हिंसेनंतर स्त्रिया येणारा तणाव मनाच्या एखाद्या कोपर्यात दडपून टाकतात. ज्या स्त्रीवर अशा प्रकारचा हिंसक अत्याचार झाला आहे, ती स्त्री मदत मागण्यापेक्षा आत्मविश्वास गमावल्याने ज्याने हे अत्याचार केले, त्या नवर्यावर अधिकाधिक अवलंबून झालेली दिसते. तिच्या मनावर झालेली जखम जवळजवळ कायमसाठीच तिच्याबरोबर असते. यामुळे तिचा इतर कोणी आपल्याला या भयानक स्थितीतून बाहेर काढू शकेल, यावर अजिबात विश्वास नसो. ती खूप हळवी झालेली असते. तिला ‘डिप्रेशन’ तर होतेय, पण मनात आत्महत्येचे विचारही जोम धरत असतात. बर्याच वेळेला तिने आत्महत्येचे प्रयत्नही केलेले असतात. मनात अपराधी भावना व लज्जा असल्याने या स्त्रिया स्वत:ला आपल्या नातेवाईक व मैत्रिणींपासून लपवतात आणि एकट्या पडतात. त्यांचा आपल्यावर पुन्हा अत्याचार होईल, आपला जीव घेतला जाईल, या भीतीने जीव जवळजवळ गोठलेला असतो आणि मन बधिर झालेले असते. त्यासाठीच या पीडित स्त्रियांना गरज असते, ती भक्कम तांत्रिक आणि मानसिक आधाराची. ‘मै हूं ना’ असे सांगणारे नातेवाईक आणि मित्रमंडळी त्यांना खर्या अर्थाने मदत करू शकतात, नाहीतर हे सगळे काल चालले होते, आजही आहे आणि उद्याही चालेल...
- डॉ. शुभांगी पारकर