मुंबई : मच्छीमारी व्यवसायाला मत्स्यशेतीचा दर्जा देण्याची आवश्यकता असून मत्स्यशेती म्हणून हा दर्जा मिळणे गरजेचे आहे. मच्छीमार बांधवांना आज शेतकरी म्हणून वागणूक मिळाली तर शेतकऱ्याला जे लाभ व सवलती मिळतात, त्या मच्छिमार बांधवांना मिळतील, अशी जोरदार मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली.
कोकणातील कोळीवाड्यांचे सीमांकन करुन त्यांना आद्य-गावठाण चा विशेष दर्जा देण्याबाबत विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. यावेळी आपला विषय मांडतांना दरेकर म्हणाले की, महसूल मंत्री मच्छीमारांसाठी प्रामाणिक प्रयत्न करत असून बैठका घेत आहेत. जे पारंपरिक मच्छिमार आहेत, त्यांच्या मागण्या आजही प्रलंबित आहे, कुलाब्यातील गीता नगरला आंदोलनाला आजही काही मच्छिमार बसलेले आहेत. मच्छीमारांसाठी कायदा बनवला आहे. जीआर काढला आहे. परंतु मच्छिमार आज अडचणीत आहेत. कायदा बनवूनही आजही त्यांचे तेच प्रश्न सुटत असतील तर उपयोग काय? असा सवालही त्यांनी यावेळी केला.
कोळीवाड्यांच्या सीमांकनाचा प्रश्न गंभीर असून याविषय सभापतींनी निर्देश देऊन यासंदर्भात संयुक्त बैठक घ्यावी अशी मागणीही दरेकर यांनी केली. विरोधी पक्ष नेत्यांच्या मागणीनुसार, सभापती रामराजे निंबाळकर यांनी याविषयी संबंधितांची बैठक घ्यावी असे निर्देश दिला.