मुंबई: "मला कितीही गोवण्याचा तरीही मी थांबणार नाही, मी घोटाळे बाहेर काढताच राहणार, मी जनतेचे काम करतोय, तुम्ही मला रोखू शकत नाही. अशा शब्दांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला इशारा दिला. महाराष्ट्रातील पोलीस दलांतील बदल्यांच्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी रविवारी देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी त्यांची दोन तास चौकशी केली. या चौकशीत मला विचारलेल्या प्रश्नांवरून या प्रकरणात मला गोवण्याचा सरकारचा प्रयत्न होता असा आरोप फडणवीस यांनी केला होता. त्याच प्रकरणी ट्विटकरून फडणवीसांनी सरकारला इशारा दिला आहे.
"राज्य सरकारने पोलीस बदल्यांमध्ये जो महाघोटाळा केला आहे त्या प्रकरणी मी आरोप केल्यानंतर हायकोर्टाकडून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. मी बोललो नसतो तर हे प्रकरण बाहेर आलेच नसते" असे फडणवीस म्हणाले. या प्रकरणी मी व्हिसलब्लोअरचे काम केले आहे म्हणून मला अडकवण्याचा प्रयत्न सरकार करत आहे पण मी थांबणार नाही. असा घणाघात फडणवीस यांनी केला.