राज्यातील अवैध सोनोग्राफी व गर्भपात केंद्रांच्या शोध मोहीमेस प्रारंभ!

12 Mar 2022 17:58:02

CB-RT
 
 
 
नागपूर : वर्ध्यातील आर्वी इथल्या कदम रुग्णालय परिसरात काही अर्भकांची मानवी हाडे व कवट्या सापडल्या होत्या. तसेच नागपुरातही क्वेटा कॉलोनी भागात कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली पाच अर्भक मिळाली होती. 'राज्याच्या आरोग्य मंत्रालयाने या प्रकरणी काय कारवाई केली?' असा प्रश्न भाजप आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत उपस्थित केला. यावेळी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी राज्यात अवैध सोनोग्राफी व गर्भपात केंद्रांच्या शोध मोहीमेस प्रारंभ झाला असल्याचे सांगितले आहे.
 
 
 
"आर्वी इथल्या खळबळजनक घटनेनंतर स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. नीरज कदमला उपजिल्हा रुग्णालयाच्या कंत्राटी पदावरुन तातडीने बडतर्फ करण्यात आले आहे. तसेच राज्यात अवैधरित्या चालणाऱ्या गर्भपात केंद्रासाठी मोठी शोध मोहीम राबवली जात आहे.", असे राजेश टोपे यांनी सांगितले.
 
 
 
"आर्वीच्या कदम नर्सिंग होम प्रकरणी सहा सदस्यांची अभ्यास गट समिती स्थापन करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणी २ आरोपींना अटकही करण्यात आली आहे. रुग्णालयाच्या तपासणीदरम्यान मुदतबाहय गोळया, ऑक्सीटोसीन इंजेक्शन, डेक्सा इंजेक्शन, गर्भधारणापूर्व निदान यंत्र पोलिसांनी जप्त केले आहे.", असेही ते पुढे म्हणाले.
 
 
Powered By Sangraha 9.0