अखिलेश यादवांच्या सोशल इंजिनिअरींगवर योगींचा 'बुलडोझर'

10 Mar 2022 09:41:56

UP


2022 Vidhan Sabha election



नवी दिल्ली 
: देशाच्या राजकारणात अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणार्‍या आणि देशातील राजकारणाचे वारे नेमक्या कोणत्या दिशेने वाहत आहेत, याचा अचूक वेध देणार्‍या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल लागण्यास आता सुरुवात झाली आहे. उत्तर प्रदेशच्या राजकारणात पहिल्यांदाच जनतेने दुसऱ्यांदा मुख्यमंत्री कायम ठेवला आहे. भाजप युपीमध्ये १६५ जागांवर आघाडी घेत सत्तास्थापनेकडे कूच करत आहे.

गोरखपूर मतदार संघातून स्वतः योगी आदित्यनाथ साडेपाच हजार मतांनी आघाडीवर आहेत. तुष्टीकरण, जातीयवादाला बगल देत युपीमध्ये मतदारांनी विकासाला मतदान केले आहे. योगींच्या युपी व्हीजनला मतदारांनी साथ दिली आहे. सकाळी ९.३० वाजतेपर्यंत अखिलेश यादव यांच्या सपाला फक्त ८५ जागांवर आघाडी घेता आली आहे. काँग्रेसला उत्तर प्रदेशात मैदानही राखता आलेलं नाही. काँग्रेस केवळ तीन जागांवर आघाडीवर आहे. प्रियांका गांधींना मुख्यमंत्री पदाचा चेहरा देऊनही त्यांना करीश्मा दाखवता आलेला नाही.

उत्तर प्रदेशसह पंजाब, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठी गुरुवारी मतमोजणीची प्रक्रिया सुरू होणार आहे. या पाचही राज्यांच्या मतमोजणीस गुरुवारी सकाळी 8 वाजता प्रारंभ होणार आहे. साधारणपणे दुपारच्या सुमारास पाचही राज्यांचे चित्र स्पष्ट होणे अपेक्षित आहे. यामध्ये उत्तर प्रदेशच्या 403, पंजाबच्या 117, उत्तराखंडच्या 70, मणिपूर आणि गोव्याच्या अनुक्रमे 60 व 40 जागांचा निकाल हाती येणार आहे.



मतदानानंतर जाहीर झालेल्या मतदानोत्तर कल चाचणीमध्ये (एक्झिट पोल) उत्तर प्रदेशमध्ये भाजपला पुन्हा एकदा बहुमत मिळणार, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्याचप्रमाणे उत्तराखंड, मणिपूर आणि गोव्यातही भाजपकडे सत्तेचा काटा सरकताना ‘एक्झिट पोल’मध्ये दिसून आले आहे. त्याचवेळी पंजाबमध्ये मात्र आम आदमी पक्षाकडे सत्तेचा लंबक झुकल्याचे दिसून येत असून पाचही राज्यांमध्ये काँग्रेसला यशाने पुन्हा हुलकावणीच दिल्याचे चित्र आहे.






Powered By Sangraha 9.0