आज मार्च महिन्याचा पहिला दिवस आणि मार्च महिना म्हटलं की परीक्षेचा महिना आणि परीक्षा म्हटलं की नुसतं टेन्शन! पण, परीक्षांकडे एक शिक्षा म्हणून न पाहता, त्याला सकारात्मकतेची परिभाषा जोडल्यास निश्चितच या परीक्षा ताणतणावाचे रुप धारण करत नाहीत. त्यासाठी गरज आहे ती मन आणि मेंदूच्या नियोजनाची योग्य सांगड घालण्याची. तेव्हा, विद्यार्थीमित्रांनो आणि त्यांच्या पालकांनो, परीक्षांच्या या मौसमात तुम्हाला मार्गदर्शक करण्यासाठी आजचा हा लेखप्रपंच...
बहुतांशी परीक्षा आता तोंडावर आलेल्या आहेत. अशाच परीक्षेच्या तयारीचा तणाव सध्या परीक्षा देणार्या मुलांबरोबर त्यांच्या पालकांच्या मनावरही जाणवतो. त्यातच गेल्या दोन वर्षांच्या कोरोना काळात ऑनलाईन परीक्षा झाल्या. त्यामुळे आता परीक्षा केंद्रात जाऊन ऑफलाईन परीक्षा देण्याच्या काही व्यावहारिक, पण बर्याच प्रमाणात मानसिक समस्या काही विद्यार्थ्यांना जाणवत आहेत. पण कसं आहे ना, कोरोना काळात जंतुसंसर्गाच्या भीतीने काही बदल क्रमप्राप्त होते. ते तसे शिक्षण क्षेत्रातही झाले, पण शेवटी गाडी रुळावर यायला हवी. जेवढ्या लवकर ती रुळावर येईल, तेवढ्या लवकर सगळ्या समस्या संपतील.
सामान्यत: परीक्षेच्या नुसत्या कल्पनेनेच बर्याच जणांची बोबडी वळते. हातापायांना घाम फुटतो. मनात नकारात्मकता येते. आत्मविश्वास ढासळतो. यासाठी मुळात परीक्षेच्या तणावाला कसे नियंत्रित करायचे, हे विद्यार्थ्यांनी शिकून घ्यायला हवे.
१) आपला परीक्षेबद्दलचा दृष्टिकोन बदलायला हवा. परीक्षा काही आपल्याला झालेली शिक्षा नाही. आपण परीक्षा देऊनच आयुष्यात शिक्षणाच्या पुढच्या टप्प्यावर मार्गक्रमण करत असतो. जेव्हा आपण परीक्षेकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहतो, तेव्हा आपला अभ्यास आपण आनंदाने करतो आणि आपल्याला तो सोपाही वाटायला लागतो. मनातून परीक्षेची भीती काढून टाकायला हवी. परीक्षा ही एक चाचणी आहे आणि ती सगळ्यांना घ्यावी लागते. लक्षात घ्या, परीक्षेची भीती मनात ठेवली, तर परीक्षेच्या तयारीत समस्या होणार म्हणून आपण आत्मविश्वास जोपासावा. यापूर्वीही आपण परीक्षा दिल्या होत्या आणि त्यात यशही प्राप्त केले होते, याची जाणीव ठेवावी.
२) अभ्यासाचं वेळापत्रक निश्चित करायचं असतं. परीक्षेला किती दिवस बाकी आहेत, यावर वेळापत्रक तयार करायचं. सहा महिने, तीन महिने किंवा १५ दिवस यावर वेळापत्रक बदलत राहील. पहिल्यांदा सगळं पुस्तक आणि अभ्यासक्रम पालथा घालायचा असतो. काही विषय आणि पाठ अगदी पहिल्यापासून वाचायचे असतात, समजून घ्यायचे असतात, म्हणून पुरेसा वेळ तिथे घ्यायचा असतो. परंतु, परीक्षा जशी जशी जवळ येते, अगदी एक-दोन आठवड्यांवर येते, तेव्हा विषयांची झटपट उजळणी करावी. आपल्याला जे येत असते ते स्मृतीत पक्के करायचे असते आणि एखादी गोष्ट अवघड वाटली, तर ती पुन्हा शिक्षकांच्या किंवा मित्रांच्या मार्गदर्शनाने पक्की करुन घ्यायची. वेळापत्रकात अवघड वाटणारे विषय पहिले घ्यायचे आणि त्यांना पुरेसा वेळ घ्यावा. सोपे वाटणारे विषय नंतर घ्यायचे, पण त्यांची उजळणी मात्र व्यवस्थित जाणीवपूर्वक करायची. कठीण विषयांची उजळणी करून मधून मधून उसंत वा छोटी विश्रांती घेऊन मग पुढच्या विषयाकडे जायचे. ताजेतवाने असताना नेहमीच कठीण विषय घ्यायचे म्हणजेच त्यांचे व्यवस्थित आकलन होते.आपलं मनही एकाग्र होतं. एका कठीण विषयानंतर दुसरा आवडीचा किंवा सोपा विषय उजळणीला घेतला, तर मन थकत नाही. गरजेप्रमाणे वेळापत्रकात थोडं प्रसन्नं राहता यावं, मनाचा क्षीण दूर व्हावा म्हणून मध्यंतरासाठी वेळ ठेवायची.
३)घरात अभ्यासाचे वातावरण तयार करावे. आपली स्वत:ची आवडती अशी अभ्यासाठी जागा करावी, जी आपल्याला व्यवस्थित आणि शांत वाटेल. अशी परीक्षेच्या तयारीसाठी ही आखणी महत्त्वाची असते. यासाठी घरं प्रशस्त असावी वा आपली अभ्यासाची स्वतंत्र खोली असावी, असे नाही. तो घरातला एखादा छोटासा कोपराही असू शकतो, जिथे आपलं मन अभ्यासात रमून जाईल. आवश्यक त्या विषयाची पुस्तकं जवळ ठेवावी. पाण्याची बाटली आणि काहीतरी खायला जवळं ठेवावं. टीव्ही, मोबाईल यांचा वापर उगाचच व्यर्थ करू नये. लक्ष विचलित होईल, अशा इतरही गोष्टी बाजूला ठेवू नये.
४) अभ्यासासाठी आवश्यक गोष्टी व्यवस्थित ठेवाव्यात. पेन, पेन्सिल, पेपर, फाईल्स, वह्या सर्व व्यवस्थित लावून ठेवले की, मन शिथील होते. आनंदात राहते. वातावरण स्वच्छ आणि नीट ठेवले की, मनाची एकाग्रता वाढत जातेे.
५) आसनस्थिती योग्य असावी. पाठीचा कणा सरळ ठेवावा. जेणेकरून आपण जागृत राहतो. बेडवर लोळत लोळत अभ्यास शक्यतो करू नये. मनाची जागृत अवस्था आपण योग्य पद्धतीने बसलो, तरच सांभाळली जाते व आपलं लक्षही अभ्यासात लागतं.
६) लक्ष केंद्रित करून अभ्यास करणं आवश्यक आहे. आपण किती तास अभ्यास करतो, यापेक्षा व्यवस्थित लक्ष देऊन अभ्यास करतो की नाही, हे अधिक महत्त्वाचे! खरेतर तल्लीन होऊन अभ्यास करायची सवय असली की वेळ कमी लागतो आणि तो स्मरणात व्यवस्थित राहतो. यासाठी मन शांत ठेवायचे. झोप व्यवस्थित घ्यायची. परीक्षेच्या आदल्या रात्री विद्यार्थी खूप जागरण करतात. त्यामुळे त्यांना दुसर्या दिवशी पेपर लिहिताना मन एकाग्र करता येत नाही आणि झालेला अभ्याससुद्धा आठवत नाही म्हणून झोप पूर्ण घ्यावी. योगासने वा प्राणायम करायची सवय असल्यास ती करावी. हलके जेवण वेळेवर घ्यावे. विद्यार्थ्यांनी उपाशी राहणे टाळावे.
७) अभ्यासाची उजळणी करत राहावी.
८) साधारण ४०-४५ मिनिटे अभ्यास करून विश्रांती घ्यावी. त्यामुळे मेंदू थकणार नाही. स्मृती बळकट होईल.
९) मनाला विसावा आवश्यक आहे. त्यासाठी काही मिनिटे व्यायाम वा योगासने करावीत किंवा बाहेर फिरून यावे. कुटुंबाबरोबर वा मित्र-मैत्रिणींबरोबर विरंगुळ्याच्या गप्पा माराव्यात. संगीत ऐकावे, गाणी ऐकावीत वा जमत असल्यास गाऊन पाहावीत. आकाश, झाडं, पक्षी, फुलं या नैसर्गिक गोष्टींमध्ये थोडावेळ मन रमवावे. रम्य मन अभ्यासाला कंटाळत नाही.
१०) वेळेचा सदुपयोग महत्त्वाचा आहे. अभ्यासात वेळेचे व्यवस्थापन ज्या विद्यार्थ्यांना करण्यास जमते ते सामान्यपणे तणावग्रस्त होत नाही.
एकंदरीत मन परीक्षेच्या संकल्पनेशी आणि प्रक्रियेशी सुरेलपणे जुळले असेल, सकारात्मक असेल आणि मनात आत्मविश्वास असेल, तर परीक्षा फक्त एक चढायची पुढची पायरी असते.