आरोग्याचा मार्ग आणि कुपोषण

    01-Mar-2022
Total Views |
 

arogya 
 
 
अन्न जर कमी प्रमाणात वा चुकीच्या प्रमाणात दिले गेल्यास त्याचा मुलांच्या शारीरिक व मानसिक वाढीवर परिणाम होतो. परिणामी, आजार जास्त बळावल्यास त्याचे पर्यवसान अकाली मृत्यूमध्येदेखील होऊ शकते. अनेक खेड्यांमध्ये आढळणारे भूकबळीचे मृत्यू हे तीव्र कुपोषणामुळे झालेले असतात.
 
बर्‍याच रुग्णालयांमध्ये किंवा दवाखान्यांत लसीकरणाच्या वेळेस दिल्या जाणार्‍या कार्डमध्ये एक आलेख दिलेला असतो. वयाच्या पाच वर्षांपर्यंतच्या वजनाची यामध्ये नोंद ठेवण्याची या आलेखात व्यवस्था असते. त्याचप्रमाणे या आलेखावर चार काळ्या आडव्या रेषा असतात. या चारही रेषा मिळून होणार्‍या मार्गास ‘आरोग्याचा मार्ग’ असे समर्पक नाव आहे. अशा कार्डावर एक दृष्टिक्षेप टाकल्यास मुलाच्या आरोग्यविषयक, कुपोषणाविषयी व लसीकरणसंबंधी माहिती मिळते. त्याचप्रमाणे मुलाच्या जन्माच्या वेळेची माहिती, औषधांची असलेली अ‍ॅलर्जी, वरचे अन्न भरविण्यास सुरू केल्याची तारीख, पाच वर्षांपर्यंत झालेला मोठा आजार याबद्दलदेखील माहिती चटकन मिळू शकते. कुपोषण व त्याची तीव्रता याचेदेखील निदान या आलेखावरून करता येते. उदाहरणार्थ- मुलाचे वजन हे पहिल्या दोन आडव्या रांगेमध्ये असल्यास ते वजन चांगले समजले जाते. ते दुसर्‍या रांगेच्या खाली असल्यास अल्प प्रमाणात कुपोषण किंवा कमी वजन असे निदान केले जाते. हेच वजन जर तिसर्‍या किंवा चौथ्या आडव्या रेषेखाली असल्यास अनुक्रमे मध्यम व तीव्र कुपोषण असे निदान केले जाते. अशा मुलांमध्ये कुपोषणाचे कारण शोधून त्याप्रमाणे इलाज केला जातो.
याप्रकारचे कार्ड म्हणजे पाच वर्षांखालील मुलांचा आरोग्याचा ‘पासपोर्ट’ आहे, असे म्हटल्यास गैर ठरणार नाही. दुर्दैवाने अशा कार्डाचा पालकांकडून व्यवस्थित सांभाळ होत नाही. कार्ड हरवले, कार्ड फाटले, दुसरे बनवून द्या इत्यादी अनेक सबबी पालकांकडून देण्यात येतात. या सर्व कारणांमुळे डॉक्टरदेखील असे कार्ड व्यवस्थित भरण्याकडे दुर्लक्ष करतात. पालकांनी सहकार्य दिल्यास व डॉक्टरांनी थोडेसे जास्त लक्ष घातल्यास असल्या कार्डमध्ये पाच वर्षांच्या खालील मुलांच्या आरोग्यासंबंधी अनेक गोष्टी नोंद करून ठेवता येतात. अशा कार्डावरून एक नजर फिरविल्यास डॉक्टरांनादेखील मुलाच्या सध्याच्या आजाराबद्दल व आरोग्याबद्दल पटकन अंदाज येतो व त्याप्रमाणे पालकांना सल्ला देता येतो.
पहिल्या वर्षी दर १५ दिवसांनी व एक ते पाच वर्षांपर्यंत दर महिन्यास डॉक्टरांकडे जाऊन मुलाची तपासणी करून हे कार्ड भरून घ्यावे. अर्थात, हे करत असताना प्रत्येक वेळेस डॉक्टरांचे शुल्क देण्यास विसरू नये. फक्त वजन करणे हे या तपासणीचे लक्ष नसून मुलाच्या आरोग्याचा आढावा घेणे, हा मुख्य हेतू आहे. यासाठी डॉक्टरांना माफक शुल्क देण्यास पालकांची काही हरकत नसावी.
आरोग्याच्या मार्गाबद्दल थोडीशी माहिती घेतल्यानंतर आता वळूया कुपोषणाकडे. मुलाची शारीरिक आणि मानसिक वाढ ही अन्नावर अवलंबून आहे. हे अन्न मुलांच्या गरजेप्रमाणे व सकस असल्यास मुलांची वाढ व्यवस्थित होते. हेच अन्न जर कमी प्रमाणात वा चुकीच्या प्रमाणात दिले गेल्यास त्याचा मुलांच्या शारीरिक व मानसिक वाढीवर परिणाम होतो. अशा मुलाची वाढ खुंटते, त्यांची प्रतिकारशक्ती कमी होते. ते वारंवार आजारी पडतात. आजारपण बळावण्याची व त्याचा उपद्रव होण्याची शक्यतादेखील अशा मुलांमध्ये अधिक असते. आजार जास्त बळावल्यास त्याचे पर्यवसान अकाली मृत्यूमध्येदेखील होऊ शकते. अनेक खेड्यांमध्ये आढळणारे भूकबळीचे मृत्यू हे तीव्र कुपोषणामुळे झालेले असतात.
मुलांमध्ये कुपोषण हे मुख्यत्वे वजनावरून ठरविले जाते. पाच वर्षांखालील मुलांमध्ये ते ‘आरोग्याचा मार्ग’ या कार्डावरून ठरविले जाते. पाच वर्षांवरील मुलांमध्ये त्या वयासाठी असलेले सरासरी वजन बघून ठरविले जाते. उंची, डोक्याचा घेर, दंडाचा घेर, शरीराच्या विविध भागांवरील चरबी यानेदेखील कुपोषणाची तीव्रता ठरविता येते.
अशा मुलांमध्ये व्हिटॅमिन्सची कमतरता असते व त्याचीदेखील विविध लक्षणे दिसू लागतात. उदा. डोळ्यांमध्ये माशांच्या खवल्याप्रमाणे थर जमा होणे, रातांधळेपणा येणे, तोंड येणे, केस राठ व रखरखीत होणे, यकृतास सूज येणे व अंगावर वेगवेगळ्या प्रकारचे पुरळ उठून त्वचा कोरडी होणे इत्यादी लक्षणे दिसू लागतात. अशा मुलांमध्ये शरीरातील रक्ताचे प्रमाण व रोगप्रतिकारशक्ती कमी होऊन वारंवार सर्दी, खोकला होणे, उलट्या, जुलाब होणे, जंतांचा प्रादुर्भाव होणे, बालक्षय रोग, त्वचारोग यांचे प्रमाण वाढते.
कुपोषणाची मुख्य कारणे
१) गरिबी : गरिबी हा आपल्या देशाचा सर्वात मोठा शत्रू आहे. मुख्यतः ग्रामीण भागामध्ये कमी प्रतीचे व कमी प्रमाणात मिळणारे अन्न हे कुपोषणाचे व बालमृत्यूचे मुख्य कारण आहे. या परिस्थितीस कारणीभूत तुम्ही-आम्ही की आमचे पुढारी आहेत, हा स्वतंत्र लेखाचा विषय ठरू शकेल. सुदैवाने अतिगरिबीमुळे होणारे कुपोषण शहरी मुलांमध्ये आढळून येत नाही. मात्र, अशा शहरी कुटुंबामध्येदेखील कमी व मध्यम प्रमाणात मुलांचे कुपोषण दिसून येते. त्याची कारणे पुढीलप्रमाणे असू शकतात.
२) मुलांच्या आहाराविषयी चुकीच्या समजुती.
३) मुलांकडे जास्त दुर्लक्ष करणे किंवा अति लाड करणे : शहरांमध्ये बर्‍याचशा मुलांचे आईवडील नोकरी करणारे असतात. अशा वेळेस दिवसभर ही मुले ‘बेबी सीटर’च्या देखरेखीखाली असतात. ‘बेबी सीटर’चा निष्काळजीपणादेखील कुपोषणाला कारणीभूत ठरू शकतो.
४) मुलांमधील आजार ः बालक्षयरोग, गोवर - कांजण्या यासारखे साथीचे आजार, दमा, उलट्या, जुलाब इत्यादी आजारांमुळेदेखील कुपोषण उद्भवू शकते. गुटगुटीत असणारे मुल गोवर, कांजण्या, काविळ यासारख्या आजारानंतर अशक्त दिसू लागते.
कुपोषणाचे निदान हे मुख्यत्वेकरून सरासरी वजनावरून करण्यात येते. याचे तीन प्रकार आहेत.
१) सौम्य कुपोषण ः सरासरी वजनाच्या ७५ ते ९० टक्के वजन.
२) मध्यम कुपोषण ः सरासरी वजनाच्या ६० ते ७४ टक्के वजन.
३) तीव्र कुपोषण ः सरासरी वजनाच्या ६० टक्के वजनापेक्षा कमी वजन.
वजनाबरोबरच वर सांगितलेली लक्षणे दिसणे हे कुपोषणाचे निदान करण्यासाठी आवश्यक आहे. काहीही आजार नसलेले पण वजनाने कमी असलेल्या मुलांबद्दल विशेष काळजी करण्यासारखे नसते. पण, मूल जर वारंवार आजारी पडत असेल व वजनसुद्धा कमी असेल तर कुपोषणाचे कारण कळण्यासाठी काही चाचण्या करणे आवश्यक ठरते. या चाचण्या पुढीलप्रमाणे...
१) रक्ताचा तपास (Haemoglobin, CBC)
२) लघवी व शौचाचा तपास
३) मांटूज टेस्ट (Mantoux Test)
४) छातीचा एक्स-रे
या चाचण्यांमध्ये जंताचा प्रादुर्भाव, बालक्षयरोग इत्यादी रोगांचे निदान झाल्यास कुपोषणाबरोबर या रोगांसाठीदेखील उपचार सुरु करावा लागतो.
तीव्र कुपोषण व इतर उपद्रव असलेल्या मुलांना रुग्णालयामध्ये दाखल करून उपचार करणे योग्य ठरते, तर सौम्य व मध्यम कुपोषणाची मुले बाह्यरुग्ण तत्त्वावरदेखील उपचार घेऊ शकतात. कुपोषणाच्या उपचारामध्ये आहाराविषयी सल्ला महत्त्वाचा असतो.
आहाराविषयी सल्ला
मुलांच्या सध्याच्या आहाराविषयी सखोल माहिती घेऊन त्यात असलेल्या त्रुटी भरून काढणे आवश्यक असते. यासाठी पालकांचे सहकार्य आवश्यक असते. बर्‍याच वेळा शिशुवर्गात जाणारी मुले अंगावर दूध पितात किंवा बाटलीने दूध पितात. या सवयी लवकरात लवकर मोडून काढणे जरुरी असते. बर्‍याच वेळा दुधात टाकल्या जाणार्‍या पाण्याचे प्रमाणदेखील कुपोषणाला कारणीभूत ठरते. शाळेतील मुलांच्या आहारात फक्त दूध हे मुख्य अन्न असू नये, तर घरातील इतर मोठ्या माणसांच्या आहारात असणारे सर्व घटकांचा कुपोषण असणार्‍या मुलांच्या आहारामध्ये समावेश असावा. साधारणतः कुपोषण असणार्‍या मुलांची भूक चांगली असते. फक्त त्यांच्या सवडीप्रमाणे व मूडप्रमाणे थोड्या-थोड्या वेळाने अन्न भरवणे आवश्यक असते. हे करीत असताना शिस्तीचा बडगा किंवा शिक्षेची भीती दाखवू नये. बर्‍याच वेळा मुलाचे व पालकांचे दुरावलेले भावनिक संबंध हे कुपोषणाला कारणीभूत ठरतात. कुपोषण असून चेहर्‍यावर व हातापायावर सूज असणार्‍या मुलांची भूक मंदावलेली असते. अशा मुलांना खास उपायांची जरुरी असते.
आहारामध्ये दूध, कडधान्ये, अंडी, चणे, शेंगदाणे, फळभाज्या, बटाटे, भात, डाळ, मटण, मासे यांचा समावेश असावा. मात्र, हे सर्व देण्याचे प्रमाण हे मुलाच्या वयाचा विचार करून देणे. जास्त प्रमाणातील अन्न किंवा बळजबरीने भरविणेदेखील त्रासदायक ठरू शकते. याबाबतीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. मोठ्या वर्गातील मुलांमध्ये कुपोषण आढळल्यास त्यांना १५० कॅलरीज् प्रतिकिलो प्रतिदिन असा आहार द्यावा. चॉकलेट, च्युईंगम, केक, बिस्किटे इत्यादी गोष्टी डब्यात देण्यापेक्षा चणे-शेंगदाणे किंवा फळे डब्यात देणे अधिक फायदेशीर ठरू शकते. चणे-शेंगदाण्यांमध्ये पोषक मूल्य अधिक आहेत. मात्र, ती मुलांनी बारीक चावून खाल्ली पाहिजेत.
कुपोषणाचे निदान करताना केलेल्या चाचण्यांमध्ये काही आजार आढळल्यास त्यावरदेखील उपचार त्वरित करावा म्हणजे मुलाचे वजन झपाट्याने वाढू लागेल. उदाहरणार्थ - बालक्षयरोग आढळल्यास त्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने व डॉक्टर सांगतील तितके दिवस औषधे व्यवस्थित चालू ठेवावी. जंतांचा प्रादुर्भाव आढळल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने जंताचे औषध घ्यावे. मात्र, हे औषध वारंवार देऊन अतिरेक करू नये. कुपोषण असलेल्या मुलास लोह, तांबे, जस्त, बी-कॉम्प्लेक्स असलेले टॉनिक नियमित द्यावे. वजनात झालेली वाढ व तब्येतीतील झालेली सुधारणा याचा दर १५ दिवसांनी आढावा घ्यावा.