ऑस्करसाठी 'रायटिंग विथ फायर' ची निवड

09 Feb 2022 14:07:10
 
writing with fire
 
 
मंगळवारी ९४ व्या ऑस्कर पुरस्कारांची नामांकन यादी जाहीर झाली. या नामांकनाच्या शर्यतीत असणाऱ्या 'जय भीम' आणि 'मरक्कर' या दोन चित्रपटांना मागे टाकत 'रायटिंग विथ फायर' या माहितीपटाने आपले स्थान कायम केले आहे. आता हा माहितीपट ऑस्कर च्या शर्यतीमध्ये किती लांबचा पल्ला गाठतो याकडेच सर्व भारतीयांचे लक्ष लागून आहे. 'रायटिंग विथ फायर' हा माहितीपट सुस्मित घोष आणि रिंटू थोमस यांनी दिग्दर्शित केला असून सुनीता प्रजापती, मीरा देवी, श्यामकली देवी यांच्या यात मुख्य भूमिका आहेत.
 
 
दलित महिलांद्वारे चालवल्या जाणाऱ्या एका वृत्तपत्राची आणि हा वृत्तपत्र चालवणाऱ्या महिलांची गोष्ट या माहितीपटात सांगण्यात आली आहे. उत्तरप्रदेशमधील एका छोट्या गावातून या सुरवात झालेल्या या वृत्तपत्राचा डिजिटल क्षेत्रापर्यंतचा प्रवास ९० मिनिटांच्या या माहीतीपटात मांडण्यात आला आहे. उत्तरप्रदेशातील चित्रकूट जिल्ह्यातील करवी या छोट्या गावातील दलित महिलांनी मिळून एक साधारण २००० साली 'खबर लहरिया' हे आठ पानांचे साप्ताहिक वृत्तपत्र सुरु केले. वृत्तपत्रासाठी याच दलित महिला गावागावात फिरुन बातम्या जमा करतात. त्यानंतर २०१२ साली उत्तरप्रदेशमधील माहोबा, लखनउ आणि वाराणसी या शहरात देखील या वृत्तपत्राची विविध भाषेतील साप्ताहिक आवृत्ती सुरु करण्यात आली.
 
 
मुख्य संपादक मीरा जाटव आणि गुन्हे वार्ताहर संगीता या दोघी म्हणजे वृत्तपत्राचे दोन खांब आहेत. हे वृत्तपत्र भारतातील एकमेव महिला प्रकाशित वत्तपत्र असून एकूण ४० ग्रामीण भागातील महिला या वृत्तपत्रासाठी काम करत आहेत. तंत्रज्ञानाच्या या जगात मोबाईल आणि तंत्रज्ञानाशी काही संबंध नसणाऱ्या ग्रामीण भागातील महिलांना मोबाईल आणि व्हिडिओ चालवण्याचे प्रशिक्षण त्यांनी दिले. ज्या भागात महिलांनी पत्रकार व्हावं हे कोणाच्याच स्वप्नात देखील येणार नाही अशा भागात या महिला प्रशासन आणि व्यवस्थेविरुद्ध ज्वलंत समस्या आपल्या लेखणीतून कशा मांडतात हे या माहितीपटातून दिग्दर्शकाने उत्तमरीत्या मांडले आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0