डॉन करीम लाला कसा बनला गंगुबाईचा भाऊ ?

    09-Feb-2022
Total Views |
 
karim lala
 
 
"लाला को घर बस्ते हुए देखना पसंद है, उजाडते हुए नाही" हा डायलॉग बोलतानाचा अजय देवगणचा पठाणी लुक तर गंगुबाई काठियावाडीचा ट्रेलर पाहताना तुम्ही पहिलाच असेल. या चित्रपटात अजय देवगण लालाची भूमिका साकारताना तर आपल्याला दिसणार आहेच पण अजय देवगण साकारत असलेला लाला नक्की आहे कोण? लाला आणि गंगुबाईचा काय संबंध? या प्रश्नांची उत्तर आपण आज जाणून घेऊयात.
 
 
अजय देवगण साकारत असलेला लाला म्हणजेच मुंबईच्या तीन कुख्यात माफिया डॉन पैकी एक असलेला करीम लाला. साधारण १९५० च्या दशकात मुंबईवर करीम लालाचे राज्य होते. दारूचे अड्डे चालवणे, खंडणी वसूल करणे यांसारख्या कामांसाठी करीम लाला प्रसिद्ध होता. खरं तर करीम लाला हा मूळचा मुंबईचा नाही. त्याचा जन्म अफगाणिस्तानमधील शेगल जिल्ह्यातील समलम या गावी झाला. करीम लालाचं मूळ नाव अब्दुल करीम शेर खान. त्यानंतर साधारण १९२० च्या दशकात करीम लाला आपल्या कुटुंबासोबत मुंबईच्या भेंडी बाजारमध्ये स्थायिक झाला. सुरवातीला रोजंदारीवर काम करणारा लाला हा एक दिवस सावकार आणि व्यावसायिकांसाठी कंत्राटी अवैध वसुली करणाऱ्या पठाणांमध्ये सामील झाला आणि त्या गॅंग साठी तो एजंट म्हणून काम पाहू लागला.
 
 
त्यानंतर लाला पठाण गॅंग चा प्रमुख बनला आणि तो त्याच्या कुख्यात बेकायदेशीर कामांसाठी मुंबईत प्रसिदध झाला. १९५० चे दशक म्हणजे मुंबईतील माफियांचे युगच होते. त्यावेळी हाजी मस्तान आणि वरदराजन नावाचे आणखी दोन गुंड मुंबईत कार्यरत होते. तिघांचीही कामे सुरळीत व्हावी म्हणून लालाने तिघांमध्ये मिळून मुंबईचे तीन भाग करण्याचा करार केला.
पण मग करीम लाला आणि गंगुबाईचा संबंध काय? तर असं बोललं जात कि, शौकत खान जो करीम लालाचा खास माणूस होता त्याची गंगुबाईवर वाईट नजर होती. गंगुबाईचा विनयभंग आणि बलात्कार करण्यासाठी शौकत खान नेहमी कामाठीपुरामध्ये जात असे. शौकत खान इतका क्रूर होता कि गंगुबाईला मान्य नसतानाही फक्त गंमत म्हणून गंगुबाईला ओढत खोलीमध्ये घेऊन जात असे.
 
 
पण एक दिवस गंगूबाईने मदतीसाठी करीम लालाचा दरवाजा ठोठावला. त्यावेळी तिला आपल्या दारात पाहून करीम लाला देखील आश्चर्यचकित झाला. त्याने आपल्या माणसांना तिला एका वेगळ्या खोलीत नेण्यास सांगून तो तिथे येईपर्यंत तिला अन्न आणि सुरक्षा पुरवली. तेव्हा गंगूबाईंनी असे गृहीत धरले की कदाचित लाला आपल्या पाहुण्यांसमोर तिच्याशी बोलायला लाजत आहे आणि म्हणून तिने तिला दिलेले अन्न देखील खाण्यास नकार दिला होता.
 
 
दिवसभराच्या प्रतीक्षेनंतर जेव्हा करीम लाला तिला भेटायला गेला तेव्हा गंगूबाईंनी संपूर्ण घटना त्याला सांगितली. त्यानंतर तेथून निघताना लालाचे लक्ष तिला दिलेल्या ताटावर गेले आणि तिने काहीच का खाल्लं नाही असं त्याने विचारलं, गंगूबाईंनी उत्तर दिलं की मला सर्वांसमोर पाहून माझ्याशी बोलण्यास जर तुम्हाला लाज वाटत असेल तर तुमच्या वस्तुंना स्पर्श करून त्या घाण करण्याची चूक मी नाही करू शकत.
 
 
त्यानंतर करीम लालाने तिला आश्वासन दिल की जे काही तिच्यासोबत या आधी घडलं ते पुन्हा घडणार नाही. तसेच जर शौकत खान पुन्हा कामाठीपुरामध्ये आला तर त्याबद्दल लवकरात लवकर आपल्याला कळव असेही करीम लालाने गंगुबाईला सांगितले. त्यावर दुसऱ्या दिवशी जेव्हा शौकत खान कामाठीपुऱ्यात गेला तेव्हा एका संदेशवाहकाकडे संदेश पाठवत आपल्या परिस्थितीची माहिती तिने लालापर्यंत पोहचवली . त्यानंतर जराही वेळ न घालवता लालाने कामाठीपुरामध्ये जाऊन शौकत खानला अर्धमेल होई पर्यंत मारहाण केली.
 
 
या घटनेनंतर गंगूबाईने करीम लालाच्या मनगटावर राखी म्हणून एक धागा बांधला आणि याआधी इतर कोणीही तिच्याशी इतक्या सन्मानाने बोलले नाही असे त्याला सांगितले. गंगुबाईचा गोड स्वभाव पाहून करीम लालाने तिला त्याक्षणापासून स्वतःची बहीण मानले आणि सर्वांना गंगूबाईचे रक्षण करण्याचेहि निर्देश दिले. त्याचबरोबर तिला मुंबईतील कामाठीपुरामधील सर्व रेड लाईट एरियाची जबाबदारीही सोपवली.