चोर चोर मौसेरे भाई...

09 Feb 2022 12:00:36

Pak-China
 
 
 
पाकिस्तान आणि चीनची मैत्री म्हणजे ‘तेरी मेरी यारी, खड्ड्यात गेली दुनियादारी!’ असेच म्हणता येईल. कारण, ‘कोविड’ महामारीनंतर जगाने चीनकडे अंगुलीनिर्देश केले तरी पाकिस्तान मात्र आर्थिक आणि सामरिक मजबुरीपोटी तोंड दाबूनच बसला. चीनचीही काहीशी तशीच गत. अमेरिकेसह जागतिक वर्तुळात कोरोनामुळे चीनची छी-थू झाली खरी, पण तरीही पाकिस्तान मात्र चीनचे गोडवे गाण्यातच गुंग होता. त्यामुळे ‘तू माझी पाठ खाजव, मी तुझी’ अशीच काहीशी स्वार्थाच्या दर्पाने भरलेली चीन-पाकिस्तान या दोन्ही देशांची मैत्री. त्यांच्या अशा या जीवाभावाच्या मैत्रीची कवने गावी तितकी कमीच म्हणा. असो, तर आपले मित्र शी जिनपिंग यांना भेटण्यासाठी इमरान खान यांनी नुकताच चीनचा दौरा केला आणि नेहमीप्रमाणे पोकळ आश्वासने पदरात पाडून रिकाम्या हाताने खान मायदेशीही परतले. पाकिस्तानला चीन किती इज्जत बहाल करतो, हे वेगळे सांगायला नको. यापूर्वीच्या इमरान खान यांच्या दौर्‍यांतूनही त्याचा वेळोवेळी प्रत्ययही आलाच. यंदाही चार दिवसांच्या त्यांच्या दौर्‍यात अगदी शेवटच्या दिवशी चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी खान यांना दर्शन दिले. बीजिंगच्या हिवाळी ऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्याला खान यांनी हजेरी लावली. तसेच चीनमधील राजकीय आणि काही व्यावसायिक मंडळींच्या भेटीगाठीही घेतल्या. त्यामुळे पाकिस्तानातील ऊर्जाक्षेत्र, पेट्रोकेमिकल्स, माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात चिनी कंपन्यांसाठी पायघड्या घालण्याचेच उद्योग खान यांनी केले.
 
 
 
पण, ज्या पाकिस्तानात चिनी कामगार, कर्मचारी यांच्या सुरक्षेची कोणतीही हमी नाही, तिथे या चिनी कंपन्या नव्याने कितपत गुंतवणूक करायला धजावतील, ही शंकाच! हीच परिस्थिती लक्षात घेता, पाकिस्तानातील चिनी प्रकल्पांच्या, त्यांच्या कामगारांच्या सुरक्षेसाठी बीजिंगहून सैन्य तैनात करावे लागले. त्यामुळे चिनी कंपन्यांना पाकिस्तानच्या बाजारपेठा आकर्षित करत असल्या तरी अद्याप सुरक्षेचा मुद्दा मात्र कायम आहेच. त्यातच इमरान खान चीनला काही हिवाळी ऑलिम्पिकच्या सोहळ्यासाठी नक्कीच गेले नव्हते. पाकिस्तानची डळमळीत अर्थव्यवस्था लक्षात घेता, त्यांनी चीनकडे तबब्ल तीन अब्ज डॉलर्सची भीक मागितल्याचेही काही माध्यमांनी वृत्त दिले. शेवटी, ‘कटोराकिंग’ इमरान खान यांच्याकडून दुसरी अपेक्षाही नाहीच म्हणा. आता एवढा मागण्यांचा पाऊस पाडल्यानंतरही पाकिस्तानच्या पदरी काहीच पडले नसले तरी इमरान खान यांनी जिनपिंग आणि चीनची खुशमस्करी करण्याच्या संधीचा पुरेपूर लाभ घेतला.
 
 
 
चीनच्या ‘वन चायला पॉलिसी’ला पाकिस्तानचे समर्थन असल्याचेही इमरान खान यांनी यावेळी दोन्ही देशांच्या संयुक्त निवेदनातून स्पष्ट केले. तसेच दक्षिण चीन समुद्रातील चीनच्या अरेरावीचेही पाकिस्तानने अगदी जाहीर समर्थन केले. पण, यामुळे दक्षिण आशियाई देशांशी असलेल्या संबंधात मिठाचा कडा पडू शकतो, याचा विचार मात्र इमरान यांच्या ध्यानीमनीही नसावा. कारण, पदरी काही तरी पाडायचे म्हटल्यावर चीनची अशी चाटुगिरी करण्याची खान यांची जुनीच खोड म्हणा. चीनच्या जागतिक धोरणांवर कौतुकवर्षाव केल्यानंतर जिनपिंग खूश होऊन आपल्या फाटक्या झोळीत चार पैसे टाकतील, म्हणून पाकिस्तानचे हे हतबुद्ध पंतप्रधान खरंतर कुठल्याही पातळीवर जाऊ शकतात. पण, हेही नसे थोडके म्हणून की काय, शिनजियांगमधील उघूरांवरील अत्याचाराचेही इमरान खान यांनी निलाजरे समर्थनच केले.
 
 
 
एरव्ही जगातील कुठल्याही कोपर्‍यात मुसलमानांवरील अत्याचार, ‘इस्लामोफोबिया’ याविरोधात कंठशोष करणार्‍या इमरान खान यांना मात्र उघूरांचा नरसंहार कदापि मान्य नाही. यावरुनच मुस्लीम जगताचे नेतृत्व करण्याचे स्वप्नरंजन करणार्‍या पाकिस्तानचा दुटप्पी खरा चेहरा जगासमोर यावा. म्हणजे उघूर मुसलमानांचे चीनने रक्त सांडले तरी बेहत्तर, पण तरीही इमरान खान यांचे डोळे काश्मीरकडेच लागलेले. म्हणूनच काश्मीरचे रडगाणे जिनपिंग यांच्यासमोर गायल्यानंतरही हा प्रश्न एकतर्फी नव्हे, तर संयुक्त राष्ट्रांच्या ठरावानुसार सोडवण्याचाच सल्ला चीनने पाकिस्तानला दिला. म्हणजे एकूणच काय तर तुम्ही तुमचे बघा, पण आमच्या प्रकल्पांची कामं मात्र सुरळीत ठेवा. इमरान खान यांना वाटले, चीनच्या भारताशी सुरु असलेल्या संघर्षाच्या आगीत तेल ओतून काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला, तर चीनही काश्मीर प्रश्नात उडी घेईल आणि पाकिस्तानचा लाभ होईल. पण, इमरान खान यांची ही मागणी व्यवहारी चीनने धुडकावून लावत, पाकिस्तानला आपली पायरी दाखवून दिली. पण, त्यातून शिकेल तो पाकिस्तान कुठला म्हणा!
 
 
Powered By Sangraha 9.0