सूर्यनगरमधील संरक्षण भिंती आणि दरडींचा प्रश्न ऐरणीवर

06 Feb 2022 20:35:29

vikroli bmc
मुंबई: विक्रोळीच्या डोंगराळ भागात दरवर्षी दरड कोसळून दुर्घटना होतात. यावर्षी जुलै महिन्यात सूर्यनगरमध्ये घडलेल्या दुर्घटनेनंतर सहा महिन्यानंतरही कोसळलेली संरक्षण भिंत पडझड झालेल्या स्थितीत कायम आहे. 'पावसाळ्यात पाऊस सुरु झाला १० दिवस आधी किंवा दुर्घटना घडल्यावर पालिका प्रशासन येते आणि नोटीस चिटकवून निघून जाते. वर्षभर कोणीही इकडे फिरकत नाही', अशी तक्रार स्थानिकांनी दै. मुंबई तरुण भारतसोबत बोलताना केली आहे.
पूर्व उपनगरातील विक्रोळी पश्चिम येथील सूर्यनगर ही देखील डोंगराळ भागातील वस्ती असून जुलै महिन्यात घरांवर दरड घरावर कोसळून झालेल्या दुर्घटनेत दहा जणांचा मृत्यू झाला होता. आजही नागरिकांशी बोलताना या घटनेची दहशत कायम आहे. मागील दोन ते तीन वर्षांपासून दरड कोसळण्याच्या दुर्घटनांमध्ये वाढ झाली असून घटना घडली त्याभागातील संरक्षणभिंतीचे काम निकृष्ट दर्जाचे आणि अर्धवटच झाले होते. त्यामुळेच ही दुर्घटना झाली, अशी तक्रार स्थानिकांनी केली आहे.
माझा जन्मच इथे झालेला आहे. मागील २-३ वर्षात घर पडण्याच्या, दरड कोसळण्याच्या घटना वाढल्या आहेत. दरवर्षी नितीस देण्याचे कमी स्थानिक प्रशासनाकडून होते. केवळ आम्हाला नोटीस देऊन काय फायदा तुम्ही उपाययोजना काय करतात ते आम्हाला सांगा. दरवर्षी हे लोक नोटीस दरवाजावर चिटकवून निघून जातात. मंदिरांवरपण हे नोटीस चिटकवून जातात. मात्र आमची दुसरीकडे कुठे व्यवस्था करणार हे सांगितलं जात नाही. जेव्हा प्रशासनाला माहिती की २००५-२००६-०७ आणि आता १७ ते १९ या दुर्घटना होत आहेत. अनेक माणसं दगावली. येथील स्थानिक लोकप्रतिनिधींना ओठी अडचण, समस्या सर्व माहिती आहे मात्र कोणालाही आमच्या सुक्षिततेचं काहीही घेणं देणं नाही, अशी उद्दिग्न प्रतिक्रिया स्थानिक रहिवाशी विशालप्रभू तायडे यांनी व्यक्त केली.
नोटीस पूर्वी कधीही येत नव्हती. जेव्हा ही दुर्घटना झाली तेव्हा आम्हाला नोटीस देण्यात आली. माझ्यादेखत २ वेळा अशा दुर्घटना घडल्या आहेत मात्र प्रशासनाकडून कोणतीही ठोस प्रतिक्रिया मिळत नाही. सुरक्षा भिंतीचे काम करू असं सांगितलं जात. मात्र आजपर्यंत कोणतंही काम झालं नाही. या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना सरकारने मदत दिली मात्र आमची घर पडली, वाहून गेली आमचे अद्याप पुनर्वसन झालेच नाही. आज आम्ही परवडत नसतानाही भाडयाच्या घरात राहत आहोत, अशी व्यथा स्थानिक महिलेने मांडली.
वार्ड क्रमांक १२०च्या नगरसेविका राजराजश्री रेडकर यांनी याविषयी सांगितले की, हे काम नगरसेवक फंडातून होत नाही. ही संपूर्ण जमीन कलेक्टर लँड असल्याने आमचा त्यांच्याशी पत्रव्यवहार सुरु आहे. हे काम म्हाडा किंवा एमएमआरडीएच्या माध्यमातूनच केलं जाते. त्यामुळे एमएमआरडीएसोबत संरक्षणभितींच्या बांधणीबाबत पत्रव्यवहार केलेला आहे. मी स्वतःहा नगरसेवक म्हणून आणि आमचे स्थानिक आमदार हे याविषयीचा पाठपुरावा करत आहेत. खासदार मनोज कोटक यांच्याशी आम्ही पत्रव्यवहार केला. तर त्यांनी सांगितलं की, मानखुर्दपर्यंत ईशान्य मुंबईमध्ये एकूण ३५ असे विभाग आहेत जिथे दरड कोसळण्याची आणि संरक्षण भिंतींची समस्या आहे. या ३५ फाईल मनोज कोटक यांनी म्हाडाला पाठवल्या आहेत. मात्र म्हाडा ने या ३५ फाईल रिजेक्ट केल्या आहेत. याचे कारण म्हाडा खासदारांनाही सांगत नाही तर ते आम्हाला काय सांगणार? आमची मागणी आहे की, केवळ संरक्षण भिंत नको तर त्याच्यावर जाळी असायला हवी. स्थानिकांमध्ये कचरा कुठेही टाकू नका यामुळे पाणी तुंबण्याची समस्या उद्भवते असे वारंवार सांगण्यात येते. दत्तकवस्तीचे लोक कचरा घेण्यास जातात मात्र तरीही लोक कचरा बाहेर टाकतात. हाच कचरा साठून या संरक्षणभीती पडतात त्यामुळे या दुर्घटना होतात. खासदार मनोज कोटक यांनी प्रशासनाकडे जोर लावल्यास हे काम लवकर होईल असे मला वाटते.
Powered By Sangraha 9.0