रुग्णसेवा करणारी एकता

06 Feb 2022 20:24:26

Ekta Gawande
 
  
अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेऊन सध्या टाटा रुग्णालयाच्या वाराणसी येथील शाखेत ‘रेडिओलॉजी’ विभागात साहाय्यक वैज्ञानिक अधिकारी ‘ग्रेड ब’ या पदावर काम करणार्‍या एकता अरूण गावंडे एक प्रकारे रुग्णसेवा करीत आहे. पण ‘करिअर’चा हा टप्पा गाठताना तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. तिच्या खडतर जीवनप्रवासावर टाकलेला हा प्रकाश.
 
 
एकता गावंडे यांचे बालपण भुसावळ येथे अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत गेले. तिचे पहिली ते चौथीचे शिक्षण मध्य रेल्वे, मराठी शाळा येथे झाले. त्यानंतर दहावीपर्यंतचे शिक्षण श्री संत गाडगे महाराज विद्यालय येथून पूर्ण केले. महाविद्यालयीन शिक्षण विज्ञान शाखेतून महिला महाविद्यालयात घेतले. तिने बारावीपर्यंतचे शिक्षण भुसावळ येथे पूर्ण केले. एकताच्या घरापासून जवळच तिचे मामा बी. यु. वानखेडे आणि मामी साधना वानखेडे या राहत होत्या. त्यांना मामा आणि मामीचा मोठा आधार होता. अभियांत्रिकी क्षेत्रात पुढील शिक्षण घेण्याची एकताची खूप इच्छा होती. त्यासाठी तिच्या मामेभाऊ-बहिणींनी प्रोत्साहनदेखील दिले. त्यासाठी पहिला ‘कॅपराऊंड’देखील दिला होता. पण आर्थिक परिस्थिती आणि ‘सीईटी’मध्ये उत्तम कामगिरी बजाविता न आल्याने तिने तो नाद सोडला. तसेच अभियांत्रिकीला ‘गव्हर्नमेंट कोटा’तून नंबर लागला असता, तरी परिस्थितीमुळे ते शिक्षण घेणे परवडले नसते. म्हणून मग मुंबईत तरी पुढील शिक्षण पूर्ण करावे, या उद्देशाने नातेवाईकांच्या माध्यमातून बिर्ला महाविद्यालयात प्रवेश घेतला. अभियांत्रिकी नाही, तर किमान मुंबईला तरी शिक्षण घ्यावे. जेणेकरून पुढील ‘करिअर’चे अनेक मार्ग निघतील, अशी त्यामागील आई वडिलांची भावना होती. एकताने पुढे बी.एससी बायोटेक्नॉलॉजीचे शिक्षण घ्यायला सुरुवात केली. एकताला शासकीय वसतिगृहात कल्याण येथे प्रवेश मिळाला. नवीन शहर, नवीन आयुष्य यात पुढील शैक्षणिक प्रवास सुरू झाला.
 
 
 
बी.एससीच्या दुसर्‍या वर्षाला असतानाच तिची मैत्रीण प्रमिलाने एकताची ओळख ‘विद्यादान साहाय्य मंडळा’शी करून दिली. एकताची ओळख गीता शाह यांच्यासोबत झाली. एकताची गरज आणि शैक्षणिक पात्रता पाहून गीता यांनी ‘विद्यादाना’चे दरवाजे उघडून दिले. एकताची तिच्या पालक कार्यकर्त्या जयश्री सोमण यांच्याशी ओळख झाली. त्यांनी तिला वेळोवेळी मार्गदर्शन, साथ आणि पाठिंबा दिला. बी.एससी बायोटेक्नॉलॉजीच्या शेवटच्या वर्षाला एकता नापास झाली. शाळेत कायम हुशार मुलगी म्हणून ओळख असलेल्या एकतासाठी ही खूपच लाजिरवाणी गोष्ट होती. दुसरीकडे आपण ’विद्यादाना’ला कसे तोंड दाखविणार अशी मनात भीती निर्माण झाली होती. एकता या गोष्टीमुळे खूपच ‘डीप्रेशन’मध्ये गेली होती. पण आई-वडील आणि पालक कार्यकर्त्या जयश्री सोमण, गीता यांनी तिला धीर दिला. एकताला एक वर्ष वाया गेले, तरीसुद्धा पुन्हा जोमाने अभ्यासाला लागण्याचा सल्ला त्यांनी तिला दिला. हळूहळू एकता ही ‘डीप्रेशन’मधून बाहेर आली.
 
 
 
बी.एससी बायोटेक्नॉलॉजीचे शिक्षण घेत असतानाच एकताला तिच्या मामांनी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’ची टाटा रुग्णालयाची ‘पीजी डिप्लोमा इन अ‍ॅडव्हान्स इमेजिंग टेक्नोलॉजी’ची जाहिरात सुचवली. मामांनी एकताला ‘एंट्रन्स एक्झाम’ दे असा सल्ला दिला. ही परीक्षा चांगल्या मार्क्सनी उत्तीर्ण झाल्यास तुला चांगला फायदा होईल, असे ही मामाने सांगितले होते. ही परीक्षा देताना एकताला बी.एससीच्या अभ्यासाचा ही फायदा झाला. पदवीचीही परीक्षा ती उत्तीर्ण झाली. पुन्हा तिचा ‘टाटा रुग्णालय’ आणि वसतिगृह असा प्रवास सुरू झाला. रेडिओलॉजी तिला उत्तम जमण्यासारखे होते. एकता ‘टाटा’चा कोर्स खूप ‘एन्जॉय’ करत शिकत होती. तिसर्‍या वर्षाला ‘इंटर्नशिप’ किंवा नोकरी एकता शोधत होती. नोकरी कशी शोधतात, याविषयीही तिला फारसे ज्ञान नव्हते. ‘नोकरी डॉट कॉम’ वर प्रोफाईल टाकली की, नोकरीसाठी फोन येतात एवढेच तिला माहिती होते. एकताला तिच्या कुटुंबीयांसोबत आयुष्य घालवायचे होते. खूप वर्षे वसतिगृहात काढली होती. त्यामुळे आता तिला घराची ओढ लागलेली होती. काही महिन्यांनंतर एकताला नोकरीसाठी फोन येऊ लागले होते.
  
 
कांदिवलीच्या एका रुग्णालयातून पहिली ‘ऑफर’ आली. त्याठिकाणी वसतिगृहात राहण्याची सोय करून देतील, असे सांगितले. त्यानंतर ‘न्यूक्लिअर हेल्थकेअर’ची ‘ऑफर’ आली. पगारदेखील चांगला होता. सगळे नियोजनाप्रमाणे सुरू होते. एकताने नोकरी मिळाल्याचे घरी फोन करून सांगितले. कुटुंबीयांनाही मुंबईला बोलवून घेतले. कुटुंबीयांनाही आनंद झाला. भाड्याच्या घरात किती दिवस राहायचे म्हणून डोंबिवलीला स्वत:च घर पाहिले. प्रवासाचा त्रास होता, पण तो फक्त मला एकटीला होणार असल्याने लगेचच घर खरेदी केल्याचे एकता सांगते. एकता सध्या ‘एमआर’, ‘सिटीस्कॅन’ यासारखी कामे करते. एकप्रकारे हीदेखील रुग्णसेवाच आहे. टाटा रुग्णालयाची वाराणसी येथील शाखा महामना पंडित मदनमोहन मालवीय कॅन्सर सेंटर आणि होमी भाभा कॅन्सर रुग्णालय येथे २०१९ पासून एकता कार्यरत आहे. ‘विद्यादान साहाय्य मंडळा’च्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असते. एकताला तिच्या पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरूण भारत’कडून हार्दिक शुभेच्छा.
 
 
Powered By Sangraha 9.0