वारकरी संप्रदायामुळे भारतीय संस्कृती ही संपूर्ण विश्वात आदरणीय

28 Feb 2022 12:16:20

KOSHYARI
 
 
 
मुंबई : “भारतीय संस्कृती ही संपूर्ण विश्वात आदरणीय असून यामध्ये महाराष्ट्रातील भागवत संप्रदाय अर्थात वारकरी संप्रदायाचे मोठे योगदान आहे. जगाच्या कल्याणासाठी पथदर्शक ‘पसायदान’ हे आपल्या सर्वाकरिता संप्रदायाने दिलेला ठेवा आहे,” असे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले. ‘चित्रमय समता वारी’ या पुस्तिकेचे अनावरण राजभवन, मुंबई येथे रविवार, दि. २७ फेब्रुवारी रोजी करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते.
 
 
समता वारी देशातील तरुणाईकरिता प्रेरणादायी
“संत चोखामेळा अध्यासन केंद्र, पुणे व वृंदावन फाऊंडेशन, पुणे यांच्यावतीने वारकरी संप्रदायातील समता, मानवता, बंधुता अन सामाजिक लोकशाही या मूल्यांच्या उत्कर्ष अन संवर्धनसाठी ’चोखोबा ते तुकोबा - एक वारी समतेची’ या उपक्रमाचे आयोजन प्रतिवर्षी१ जानेवारी ते १२ जानेवारीपर्यंत करण्यात येते, हे राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीने हिताचे आहे. समाज माध्यमातून जातीय विद्वेशी, प्रचार थांबवून तरुण पिढीला सकारात्मक विचार देण्यासाठी, रचनात्मक कार्यास प्रेरित करुन राष्ट्र उभारणीच्या कार्यात त्यांचा हातभार लागला पाहिजे, या हेतूने ही समता वारी निघत आहे. महाराष्ट्रातील वारकरी संतांनी सांगितलेल्या समता अन् बंधुभावाचा विचार घेऊन निघत असलेली समता वारी देशातील तरुणाईकरिता प्रेरणादायी राहील.
 
 
'चित्रमय समता वारी' ही पुस्तिका समाजमनात समता व बंधुता मूल्यांचा जागर करुन राष्ट्रीय एकात्मतेला बळकटी देईल,” असा विश्वास राज्यपालांनी यावेळी व्यक्त केला. याप्रसंगी जगद्गुरु तुकोबाराय यांचे वंशज हभप शिवाजीराव मोरे महाराज, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते निलेश गद्रे, विश्व दलित परिषदेचे अध्यक्ष तथा माजी खासदार सुनील गायकवाड, अण्णाभाऊ सोशल फोरमचे प्रा. विनोद सूर्यवंशी, कल्याण पाटील, ‘समता वारी’ निमंत्रक सचिन पाटील आदी उपस्थित होते.
 
 
Powered By Sangraha 9.0