खान-पुतीन भेट; अमेरिकेकडून पाकिस्तान नॅशनल बँकेला ५५ दशलक्ष डाॅलरचा दंड

26 Feb 2022 16:02:07
pakisthan



कराची -
पूर्व युक्रेनमध्ये रशियन सैन्याने केलेल्या 'विशेष लष्करी कारवाई' दरम्यान रशियामध्ये पाहुणचार घेत असलेले पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना अमेरिकेने मोठा धक्का दिला आहे. अमेरिकेच्या 'यूएस फेडरल रिजर्व'ने 'नॅशनल बँक ऑफ पाकिस्तान' (NBP) आणि तिच्या न्यूयॉर्क शाखेला ५५ दशलक्ष यूएस डाॅलसचा दंड ठोठावला आहे. या संदर्भात प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, यूएस फेडरल रिझर्व्ह आणि न्यूयॉर्क स्टेट डिपार्टमेंट ऑफ फायनान्शिअल सर्व्हिसेसने मनी लॉन्ड्रिंगविरोधी नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल हा दंड ठोठावला आहे.

फेडरल रिझर्व्हने पाकिस्तानला २०.४ दशलक्ष अमेरिकन डाॅलरचा दंड ठोठावला आहे, तर न्यूयॉर्क स्टेट डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेसने नॅशनल बँक ऑफ पाकिस्तानला ३५ दशलक्ष यूएस डाॅलरचा दंड भरण्यास सांगितला आहे. ४ मार्च, २०२१ रोजी केलेल्या चौकशीच्या आधारे जारी केलेल्या आदेशात असे नमूद केले आहे की, नॅशनल बॅंक ऑफ पाकिस्तानने 'उणिवा' दुरुस्त करण्यासाठी १६ मार्च, २०१६ रोजी अधिकाऱ्यांसोबत लेखी करार केला होता. तथापि, अलीकडील तपासणीत असे आढळून आले आहे की, पाकिस्तानी बॅंक 'लिखित करारातील प्रत्येक तरतुदींचे पूर्णपणे पालन करण्यात' अपयशी ठरले आहे.

नॅशनल बँक ऑफ पाकिस्तान अमेरिकेच्या कायद्यांचे पालन करण्यात अयशस्वी ठरल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. यूएस फेडरल रिझर्व्ह कॉर्पोरेट गव्हर्नन्स आणि व्यवस्थापन निरीक्षण सुधारण्यासाठी पाकिस्तानी बॅंकेला आदेश देते. रिझर्व्ह बँकेने पाकिस्तानी बॅंकेला दिेलेल्य आदेशानंतर ६० दिवसांच्या आत त्यांच्या शिफारसी लागू करण्यास सांगितले आहे. इम्रान खान बुधवारी (२४ फेब्रुवार, २०२२) दोन दिवसांच्या रशिया दौऱ्यावर पोहोचले. मात्र, मॉस्कोमध्ये आल्यानंतर काही तासांतच रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी पूर्व युक्रेनमध्ये 'विशेष लष्करी कारवाई' करण्याचे आदेश दिले. सध्याच्या परिस्थितीत व्लादिमीर पुतिन आणि इम्रान खान यांच्या भेटीचा धोरणात्मक अर्थ काढला जात आहे. नंतर व्लादिमीर पुतिन यांनी क्रेमलिनमध्ये पंतप्रधान खान यांच्याशी वन-ऑन वन बैठक घेतली.


Powered By Sangraha 9.0