विंचूच्या नव्या प्रजातीचा जळगावातून शोध; 'ही' आहेत वैशिष्ट्य

25 Feb 2022 12:28:58
 Scorpion


मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
जळगाव जिल्ह्यातून विंचूच्या (scorpion) नवीन प्रजातीचा शोध लावण्यात महाराष्ट्रातील तरुण संशोधाकांना यश मिळाले आहे. त्याचे नामकरण 'कॉमसोबुथस सातपुराएनसीस' (Compsobuthus satpuraensis) असे करण्यात आले असून 'कॉमसोबुथस' या जातीमधील महाराष्ट्रात आढळलेली ही पहिलीच प्रजात आहे. या संशोधनामुळे संशोधनाच्या दृष्टीने दुर्लक्षित राहिलेल्या विंचवासारख्या जीवाचे महत्व अधोरेखित झाले आहे.


पर्यावरणीय परिसंस्थेत विंचू हे किटकनियंत्रक म्हणून महत्त्वाची भूमिका बजावत असतात. यामधील काही प्रजाती या जहाल विषारी असतात, तर काही प्रजीतींचे विष हे सौम्य प्रकारचे असते. अशाच विषारी असणाऱ्या विंचूच्या नव्या प्रजातीचा शोध जळगाव जिल्ह्यातील सातपुडा डोंगररांगांमधून लावण्यात आला आहे. 'ठाकरे वाईल्डलाईफ फाउंडेशन'चे संशोधक विवेक वाघे, सत्पाल गंगलमाले आणि अक्षय खांडेकर यांनी या प्रजातीचा उलगडा केला. नवीन प्रजात ही 'बुथीडी' कुळातल्या 'कॉमसोबुथस' या जातीमधील आहे. जळगाव जिल्ह्यातल्या यावल तालुक्यातील वाघझीरा आणि खिरोदा या गावात ही प्रजाती आढळून आली आहे. ऑक्टोबर, २०२० मधील सर्वेक्षणादरम्यान संशोधकांना पहिल्यांदा ही प्रजाती आढळून आली होती. साधारण वर्षभर त्यावर संशोधन केल्यानंतर ही प्रजात विज्ञानासाठी वेगळी असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

twf
 
 
तज्ज्ञांकडून या प्रजातीच्या नाविन्याची पुष्टी केल्यानंतर हा शोधनिबंध अमेरिकेतून प्रकाशित होणाऱ्या 'युस्कोर्पिअस' या संशोधन पत्रिकेतून गुरुवारी प्रकाशित करण्यात आला. या संधोधनात महाराष्ट्रातील विवेक वाघे (जळगाव), सत्पाल गंगलमाले (सोलापुर), अक्षय खांडेकर (सांगली) या संशोधकांचा समावेश आहे. या शोधामुळे भारतात अजूनही विंचू आणि एकूणच पर्यावरणीय संशोधनाच्या दृष्टीने फारसे काम झालेले नाही, हे अधोरेखित होते. सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी ही आढळली म्हणून तिचे नामकरण 'कॉमसोबुथस सातपुराएनसीस' (Compsobuthus satpuraensis) असे करण्यात आल्याची माहिती विवेक वाघे यांनी दिली. जगभरात 'कॉमसोबुथस' या जातीच्या ५० प्रजाती आढळून येत असून भारतीय उपखंडातील ही सहावी, भारतातली चौथी तर महाराष्ट्रातील पहीली प्रजाती असल्याचे सांगितले.

प्रजातीमधील वैविध्य
रंग, शेपटीरावरील वैशिष्ट्यपूर्ण दानेदार रचना, पेक्टीनल टीथची संख्या, लांबी व रुंदी यांचे गुणोत्तर, शरीरावरील उठाव यासह इतर अनेक वैशिष्ट्यांसह 'कॉमसोबुथस सातपुराएनसीस' ही प्रजाती आपल्या जातीतील इतर प्रजातीपेक्षा वेगळी ठरते. नवीन प्रजाती इतर विंचवांप्रमाणेच निशाचर असून ती माळराने, झुडपी जंगले, व पानगळीच्या जंगलांमध्ये दगडांच्या आडोश्याने आढळून येते.

 
Powered By Sangraha 9.0