मुंबई : काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘नाय वरण-भात लोंचा कोन नाय कोंचा’ या चित्रपटाचे दिग्दर्शक महेश मांजरेकर व अन्य संबंधित व्यक्तींवर अखेर माहीम पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर चित्रपटामध्ये बालकलाकारांकडून अतिशय टोकाची हिंसा, आक्षेपार्ह दृश्यं करुन घेण्यात आली असल्यामुळे अतिशय अर्वाच्य भाषाही त्यांच्या तोंडी आहेत. दरम्यान, बालकलाकारांकडून आक्षेपार्ह चित्रण केल्याबद्दल चित्रपटाचे दिग्दर्शक, निर्माते व संबंधितांविरोधात कारवाई करण्याकरिता भारतीय स्त्री शक्ती संघटनेच्यावतीने माहीम पोलीस स्टेशनमध्ये लेखी तक्रार दिली होती, त्यानंतर तेथील पोलीस उपायुक्त व पोलीस सहा आयुक्त, मुंबई येथे तक्रार दिली होती.
मात्र त्यावर कुठलीही कारवाई न झाल्यामुळे सदर प्रकरण स्त्रीशक्ती संस्थेच्या सीमा देशपांडे यांनी प्रकाश सालसिंगिकर यांच्या मार्फत कोर्टात दाद मागितली. कोर्टाकडून आदेश देण्यात आल्यामुळे आज संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अत्यंत बिभत्स ट्रेलर व चित्रपट बनवून बालकांचा चुकीचा वापर केल्याने चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर, निर्माते नरेंद्र हिरावत, निर्माते श्रेयस हिरावत, सहनिर्माता विजय शिंदे व अन्य संबंधितांनी केवळ अर्थाजर्नाच्या उद्देशाने हा चित्रपट तयार केला असल्याचे एफ. आय. आर. मध्ये नमूद आहे.
‘नाय वरण-भात लोंचा कोन नाय कोंचा’ या चित्रपटात १३ ते १५ वर्षे वयोगटातील अल्पवयीन मुलांना लैंगिक संबंधांमध्ये गुंतलेले, टोकाची हिंसा करतांना, अर्वाच्य शिव्या व अश्लिल भाषेचा वापर करतांना आणि जवळच्या महिला नातेवाईकांबरोबर अनैतिक संबंध ठेवतांना दाखवले असल्याचे भारतीय स्त्री शक्ती संघटनेने सादर केलेल्या तक्रारपत्रात म्हटले आहे. तक्रारीत असेही नमूद करण्यात आले आहे की, या चित्रपटाच्या माध्यमातून मुंबईतील गिरणी कामगार आणि त्यांच्या कुटुंबातील स्त्रीयांचे अतिशय विकृत चित्रीकरण करण्यात आले आहे. या चित्रपटात भारताच्या पोक्सो (POCSO) सहीत अन्य कायद्यांचे उल्लंघन तर आहे. येत्या काळात पोलीस तपासात काय समोर येते, या सगळ्यांना अटक होते का याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.