ठाकरे सरकारने आम्हाला मरण्याची परवानगी द्यावी!

23 Feb 2022 12:18:41

aditya
 
 
मुंबई : मुंबईतील बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित अशा बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. वरळी मतदारसंघातील ना. म. जोशी मार्गावरील इमारतींमधील नागरिकांनी पुनर्विकासातील त्रुटी आणि इतर बाबींवरून प्रशासनाला खडे बोल सुनावत राज्यातील सत्ताधारी ठाकरे सरकारला मागण्या मान्य करण्याची विनंती केली आहे. “जर प्रशासनाला पुनर्विकास प्रक्रिया राबविताना आमच्याशी संपर्क साधायचा नसेल किंवा आम्हाला विश्वासात घ्यायचे नसेल, तर ठाकरे सरकारने आम्हाला इच्छा मरणाची परवानगी द्यावी,” अशी उद्विग्न प्रतिक्रिया बीडीडी चाळीतील रहिवाशांनी केली आहे. मंगळवार, दि.२२ फेब्रुवारी रोजी स्थानिक रहिवाशांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडे आपली भूमिका स्पष्ट केली.
 
स्थानिक आमदार फिरकतच नाहीत!
राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड आणि इतर मंडळीसोबत आम्ही याबाबत चर्चा करत आहोत. प्रशासन केवळ या ठिकाणच्या मैदानाचा ताबा घेण्यासाठी अधिक उत्सुक दिसत आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी केवळ मतांची बेगमी करण्यासाठी आमच्याकडे येतात. बाकी आमच्या प्रश्नांकडे लक्ष देण्यासाठी प्रशासनाकडे अजिबात लक्ष नाही. मुलांना खेळण्यासाठी असलेल्या मैदानाचा ताबा घेण्यासाठी प्रशासन इतके उत्सुक का आहे ? याचे उत्तर अद्याप मिळालेले नाही. बिल्डर आणि प्रशासनातर्फे नागरिकांना त्रास देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
- सुनील पावसकर, स्थानिक रहिवासी,
   बीडीडी चाळ, ना. म. जोशी मार्ग
 
प्रशासनाने आम्हाला मरण्याची परवानगी द्यावी
चाळीच्या पुनर्विकास प्रक्रियेत आम्हाला कुठल्याही प्रकारे विश्वासात घेतले गेलेले नाही. स्थानिक आमदार आदित्य ठाकरे हेदेखीलआमच्याशी कुठल्याही प्रकारे संपर्क साधत नाहीत. मतदारसंघातील नागरिक म्हणून आमचे प्रश्न सोडविणे त्यांचे कर्तव्य आहे. मात्र, स्थानिकांच्या प्रश्नाकडे त्यांचे साफ दुर्लक्ष आहे. इमारत पुनर्विकास होत असताना आम्हाला इतर ठिकाणी तात्पुरते स्थलांतरित करण्यात येत आहे. मात्र, त्याबाबत कुठलाही करार अथवा कायदेशीर प्रक्रिया राबवली जात नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे जर स्थानिक असूनही आमचा आवाज ऐकला जात नसेल, तर सरकारने आम्हाला आत्महत्या करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी आम्ही करणार आहोत.
- सुशांत कांबळे, स्थानिक रहिवासी,
   इमारत क्र. ३२
 
 
Powered By Sangraha 9.0