'सपा' उमेदवाराच्या कुटुंबीयांनीच घरावर लावला भाजपचा झेंडा; काय आहे प्रकरण ?

22 Feb 2022 15:58:28
uttarpradesh



लखनऊ -
उत्तर प्रदेशमध्ये सध्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत. अशा परिस्थितीत समाजवादी पक्षाचे नेते नारद राय यांच्या बाबतीत घडलेला एक किस्सा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय झाला आहे. कारण, सपाकडून निवडणूक लढणाऱ्या नारद राय यांच्या घरावर भाजपचा झेंडा फडकत आहे.



नारद राय यांच्या एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये ते बलिया येथील आपल्या घरासमोर समर्थकांसह उभे आहेत आणि घराच्या छतावर भाजपचा झेंडा पाहून रडत आहेत. व्हिडिओमध्ये नारद म्हणत आहेत की “या लोकांना आमच्या घराला आग लावायची आहे...हे आमचे घर आहे. ज्यांनी आमच्या घरावर भाजपचा झेंडा लावला... ज्यांनी आमचे हृदय तोडले... मी कोणाचाही वाईट विचार केला नाही, माझे वाईट होत आहे... माफ करा... माफ करा." त्यानंतर नारद ढसाढसा रडू लागतात. त्यांच्या हातामधील माईक खाली पडतो आणि ते देखील बेशुद्ध होतात. यानंतर, व्हिडिओमध्ये त्यांचे समर्थक नारद राय जिंदाबाद-जिंदाबादच्या घोषणा देताना ऐकू येतात.

या घटनेला नारद राय यांच्या घरातील राजकीय मतभेद कारणीभूत असल्याचे म्हटले जात आहे. कारण, नारद यांचे त्यांच्या सख्ख्या भावाशी राजकीय मतभेद आहेत. परिणामी त्यांचे भाऊ त्यांच्या विरोधात प्रचार करत आहेत. नारद राय यांच्या घरावर लाववेला भाजपचा ध्वज त्यांच्या भावाने लावला आहे. नारदांच्या विरोधात त्यांच्याच समाजातील अनेक लोक आहेत.
Powered By Sangraha 9.0