पालिकेकडूनचं आदित्य ठाकरेंचे 'स्वप्नभंग!'

21 Feb 2022 14:12:31

aditya cycle track
 
 
मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तानसा जलवाहिनीच्या दोन्ही बाजूंनी ३९ किलोमीटरचा सायकल ट्रॅक बनविणे हा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा ड्रिम प्रोजेक्ट आहे. मात्र सध्या या प्रकल्पाचे काम रखडले असल्याचे पहायला मिळत आहे. आत्तापर्यंत या प्रकल्पावर १२५ कोटी रुपये खर्च करण्यात आले असून हा प्रकल्प मार्च २०२१ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, अजूनही या प्रकल्पाचे काम कासवगतीने सुरू असल्यामुळे पालिकाच ठाकरेंचा ड्रीम प्रोजेक्ट रखडवत असल्याचे चित्र दिसत आहे.
 
मुंबईला पाणीपुरवठा करणारी तानसा जलवाहिनी ही प्रामुख्याने मुलुंड ते धारावी आणि घाटकोपर ते शीव या भागांमध्ये पसरलेली आहे. या जलवाहिनीच्या दोन्ही बाजूला १० मीटर पर्यंत असणारे अनाधिकृत बांधकाम हटविण्याचे निर्देश उच्च न्यायालयाकडून देण्यात आले होते. ही जलवाहिनी पालिकेच्या नऊ प्रशासकीय विभांगातून जात असल्याने न्यायालयाच्या आदेशानंतर मुलुंड, भांडूप, सहार, वाकोला, हुसेन टेकडी, खार पूर्व, माहीम, धारावी, घाटकोपर,कुर्ला पूर्व, आणिक डेपो या विभांगात कारवाई करण्यात आली. ही कारवाई झाल्यानंतर पालिकेने पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी दोन्ही बाजूंना संरक्षण भिंती देखील उभारल्या आहेत.
 
अतिक्रमण हटवल्यानंतर मोकळ्या जागेचा नागरीकांना उपयोग व्हावा म्हणून पालिकेने पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात 'हरितवारी जलतीरी' हा महत्तवकांक्षी प्रकल्प हाती घेतला. २०१८ साली सुरू झालेला हा प्रकल्प २०२१ मध्ये पुर्ण होणे अपेक्षित होते. मात्र मुदत पूर्ण होऊन एक वर्ष उलटून गेले तरी अद्याप हा प्रकल्प अपूर्णच आहे. या प्रकल्पावर आत्तापर्यंत १२५ कोटी कोटी खर्च केले असून आणखी ४५ कोटींची तरतूद सध्याच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.
 
Powered By Sangraha 9.0