एका अभूतपूर्व इतिहासाचा अनुभव म्हणजे "पावनखिंड"
19-Feb-2022
Total Views | 306
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मोहिमा, त्यांच्या युद्धनीती, स्वराज्यस्थापनेत त्यांच्यासोबत असणारे शिलेदार यांच्या पराक्रमांच्या गोष्टी ऐकतच आपण मोठे झालो आहोत. आजही या गोष्टी आपल्या कानावर पडल्या तर अंगावर रोमांच उभे राहते. महाराजांच्या अनेक गोष्टी आपण पाठ्यपुस्तकात वाचल्या आहेत. एवढंच काय तर आपण या गोष्टी नाटक, चित्रपट आणि मालिकांच्या माध्यमातूनही अनुभवल्या आहेत. पण तरीही प्रत्येक शिवभक्ताच्या मनाला त्या तितक्याच आकर्षित करतात. परंतु गोष्टी सांगणे आणि आणि त्या तितक्याच प्रभावीपणे पडद्यावर मांडणे यात खूप फरक आहे. हा पण सध्या तंत्रज्ञानाचा वापर करून या गोष्टींमधील थरार आणि रोमांच पडद्यावर जिवंत करणे शक्य झाले आहे. आणि प्रचिती आपल्याला दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी त्याच्या शिवाष्टके या चित्रपटांच्या मालिकेतील फर्जंद आणि फत्तेशिकस्त या दोन्ही चित्रपटांमधून नक्कीच येते. याच मालिकेतील तिसरे पुष्प म्हणजेच तिसरा चित्रपट "पावनखिंड" हा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
शिवाजी महाराज आणि त्यांच्या शिलेदारांनी लढलेल्या प्रत्येक मोहिमांची आखणी त्यांनी कशाप्रकारे केली असेल? त्यावेळी नक्की काय काय झाले असेल?प्रत्यक्षात यासर्व घटना नक्की कशाप्रकारे घडल्या असतील? या सर्व गोष्टींची मांडणी दिग्दर्शकाने पावनखिंडमध्ये उत्तमरीत्या केली आहे. पावनखिंडीची कथा हि तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे. हि कथा नरवीर बाजीप्रभू देशपांडेंची तर आहेच पण त्यासोबतच हि कथा फुलाजीप्रभू देशपांडे, रायाजी बांदल, शंभूसिंह जाधव, शिवा काशीद आणि बांदल सेनेतील त्या ६०० मावळ्यांची देखील आहे.
चित्रपटाच्या सुरवातीलाच महाराजांचे एक वाक्य आहे. "या राज्याभिषेकामागे बलिदानाची फार मोठी परंपरा आहे". जेव्हा पण आपण महाराजांचा इतिहास आठवतो तेव्हा जसे आपल्याला गड किल्ले किंवा त्यांच्या मोहिमां आठवतात तसेच आपल्याला आठवतात ते त्यांचे शिलेदार. महाराजांच्या खांद्याला खांदा देऊन लढलेल्या या सर्व शिलेदारांबद्दल बोलताना एक नाव प्रामुख्याने घेतलं जात ते म्हणजे बाजीप्रभू देशपांडे. पन्हाळ्याला सिद्धी जौहरचा वेढा पडलेला असताना हा वेढा फोडण्यासाठी बहिर्जी नाईकांनी आखलेली योजना, हि योजना यशस्वी व्हावी आणि शत्रू बेसावध होऊन महाराजांना पन्हाळ्यावरुन निसटता यावे म्हणून हसतहसत मृत्यूच्या दारी जाणारे शिवा काशीद, महाराजांसाठी स्वतःच्या प्राणांची आहुती देणारे रायाजी बांदल आणि पूर्ण बांदल सेना, तोफांचे आवाज ऐकू येईपर्यंत पावनखिंडीत आपले प्राण रोखून धरत शत्रूशी लढणारे बाजीप्रभू देशपांडे या सर्वांच्या पराक्रमांचे जिवंत स्वरूप म्हणजेच पावनखिंड हा चित्रपट.
चित्रपटाची कथा हि तर आपल्या सर्वांना माहिती आहेच. पण तरीही आपल्याला चित्रपटगृहात खिळवून ठेवते ते या चित्रपटाचे संवाद आणि चित्रपटाची पटकथा. "पांडुरंगासोबत त्याच्या भक्तांचं जसं नाव घेतलं जातं तसं तुमच्यासोबत आमचं नाव घेतलं जाईल " असे अनेक संवाद आपल्याला या चित्रपटात ऐकायला मिळतात. आणि प्रत्येक संवाद ऐकत असताना आपल्या अंगावही रोमांच उभे राहिल्याशिवाय राहणार नाही. या चित्रपटाची कथा-पटकथा-संवादही खुद्द दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरनेच लिहिली असल्यामुळे आपल्याला जे मांडायचे आहे त्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करून ते उत्तमपणे दिग्दर्शित देखील केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची कथा म्हटल्यावर त्यात त्यांनी बांधलेले अभेद्य गडकिल्ले आले, महाराजांचे मावळे आणि शिलेदार आले, एवढंच नाही तर महाराजांवर श्रद्धा ठेवून त्यांच्यावर जीव ओवाळून टाकणारी महाराजांची रयत आली. अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टींचे भान दिग्दर्शकाने ठेवले आहे.
चित्रपटाची आणखीन एक जमेची बाजू म्हणजे चित्रपटाचे छायांकन. अतिशय अप्रतिमरीत्या या चित्रपटाचे छायांकन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे पन्हाळा ते विशाळगडापर्यंत पोहचण्याचा जो प्रवास शूट करण्यात आला आहे तो प्रेक्षक म्हणून पाहत असताना आपल्याला एक प्रकारचे समाधान देऊन जाते. चित्रपटाचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे चित्रपटातील कलाकार. या चित्रपटातील सर्वच कलाकारांनी आपापल्या भूमिकांना योग्य न्याय दिलेला आहे. पण या चित्रपटातून आपल्या भूमिकांची एक विशेष छाप आपल्या मनावर उमटवतात ते म्हणजे वैभव मांगले, आस्ताद काळे, क्षिती जोग, उज्वला जोग आणि प्राजक्ता माळी. एवढंच नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारा चिन्मय मांडलेकर, जिजाऊंची भूमिका साकारणारी मृणाल कुलकर्णी, रायाजी बांदलांची भूमिका साकारणारा अंकित मोहन, बहिर्जी नाईकांची भूमिका साकारणारा हरिष दुधाडे आणि बाजीप्रभुंची भूमिका साकारणारे अजय पुरकर यांनी फक्त आपापल्या भूमिका साकारल्या नाहीयेत तर ते या भूमिका जगले आहेत असेच चित्रपट पाहताना प्रत्येक क्षणाला आपल्याला जाणवते. त्यामुळे या अभूतपूर्व इतिहासाचा अनुभव हा चित्रपटगृहात जाऊनच घ्यावा हे नक्की.