मुरबाड शहरी नगराध्यक्ष आपल्या दारी

19 Feb 2022 12:21:14

Thane
मुरबाड : मुरबाड नगर पंचायतीच्या नगराध्यक्षपदी भाजपच्या रामभाऊ दुधाळे यांची निवड होताच त्यांनी ‘नगराध्यक्ष आपल्या दारी’ हा उपक्रम हाती घेतला आहे. नागरिकांची शासकीय जाचातून सुटका करण्यासाठी हे अभियान हाती घेतल्याने नागरिकांची नगर पंचायतीमधील परवड थांबून कामे सोपी झाली आहेत.
 
नुकत्याच पार पडलेल्या मुरबाड नगरपंचायत निवडणुकीत भाजपने बहुमत प्राप्त केले होते. एकेकाळी ग्रामपंचायतीत शिपाई असलेले राम दुधाळे यांची नगराध्यक्षपदी, तर मोनिका मनोज देसले यांची उपनगराध्यक्षपदी वर्णी लागली. त्यानंतर दुधाळे यांनी लागलीच कामाला सुरुवात करुन, नगर पंचायतीमध्ये नागरिकांना भेडसावणार्‍या अडचणी त्यांना कार्यालयात येऊ न देता त्यांच्या प्रभागात जाऊन सोडवण्याचा निर्णय घेतला. जन्म-मृत्यू दाखले विनामूल्य घरपोच देण्यात येणार आहेत. व्यापार्‍यांची व्यावसायिक करातून होणारी लूट थांबवली जाणार असून फक्त १०० रुपये कर आकारणी केली जाईल. पाणीपट्टी थकबाकीदारांना दिलासा देताना नळ जोडणी न तोडण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
 
नगर पंचायतीच्या पायर्‍या झिजविण्याची गरज नाही
 
त्याचबरोबर मुरबाड तालुक्यातील पत्रकारांसाठी पत्रकार कक्षही उभारण्याचा मानस रामभाऊ दुधाळे यांनी व्यक्त केला आहे. मुरबाडकरांनी आपल्या समस्या मला किंवा माझ्या सहकारी नगरसेवकांना थेट फोनद्वारे कळविल्या, तरी त्याची दखल घेतली जाईल. नगरपंचायतीच्या पायर्‍या झिजविण्याची गरज नाही. हे रामराज्य असल्याने न्याय मिळेलच, फक्त आपल्या समस्या आमच्यापर्यंत यायला हव्यात, असे दुधाळे यांनी सांगितले.
 
Powered By Sangraha 9.0