भारतात विशेषत: मोठ्या शहरांत ‘सायबर’ गुन्ह्यांचे प्रमाणही फार वाढले आहे. म्हणून ‘मोबाईल बँकिंग’ व्यवहार करताना नेमके काय करावे आणि काय करू नये, हे सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रत्येक ग्राहकास माहीत हवे. त्यादृष्टीने बँकांकडून, माध्यमांतर्फेही वारंवार मार्गदर्शन केले जात असले तरी अजूनही बरेच डिजिटल बँकिंग सेवेचा लाभ घेणारे ग्राहक या गैरव्यवहारांना बळी पडतात. त्यामुळे डिजिटल बँकिंग करताना नेमकी काय खबरदारी घ्यावी, याची माहिती देणारा हा लेख...
१) आपला इंटरनेट/मोबाईल बँकिंग पासवर्ड नीट जपायला हवा. कारण, चांगला पासवर्ड असेल, तरच आपले खाते आणि बँकेबरोबर करीत असलेल्या व्यवहारांची माहिती सुरक्षित राहू शकते आणि हीच गोष्ट ‘पिन’लाही लागू आहे. २) पासवर्ड कोणालाच सांगू नका किंवा कितीही निकड असली आणि व्यक्ती कितीही जवळची असली, तरीदेखील सांगू नका. हे सांगण्यामुळे घोटाळा झाला तर त्याला तुम्हीच जबाबदार असाल. ३) मोबाईल किंवा ई-मेलद्वारे पासवर्ड किंवा तशी कोणतीही गोपनीय माहिती पाठवू नका. ४) पासवर्ड कुठेही लिहून ठेवू नका. कोणाच्या हाती लागला, तर तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते. ५) आपल्या खात्याचा तपशील दाखविणारे ‘बँक स्टेटमेंट’ अधूनमधून तपासत राहा. कारण, काही चुकून रक्कम जमा झालेली असेल किंवा वजा झालेली असेल, तर ते कळू शकते, बँका बर्याच वेळा अशा चुकीच्या ‘एन्ट्री’ खात्यात करतात, ही चूक जेवढी लवकर तुमच्या लक्षात येईल, तेवढ्या लवकर तुम्ही ती सुधारू शकता. ६) मोबाईल चोरीला गेला किंवा हरवल्यास तत्काळ बँकेला कळवा आणि पोलीस ठाण्यामध्ये जाऊन तक्रार करा. ७) आपला ‘आयपीआयएन’ क्रमांक हा वारंवार बदलत राहा, हे सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक आहे. ८) पैसे ट्रान्सफर करताना नाव व बँकेचे खाते क्रमांक बरोबर आहे, याची दोन-तीन वेळा खात्री करून घ्या. १०० टक्के खात्री पटल्यानंतरच पैसे ट्रान्सफर करा. ९) कोणतीही गोपनीय माहिती कधीच कोणाला सांगू नका. कागदाच्या चिटोर्यावर किंवा डायरीत लिहू नका. १०) कोणतेही अनोळखी संकेतस्थळ उत्सुकतेने उघडू नका. त्यातून तुमच्या मोबाईलमध्ये ‘व्हायरस’ शिरण्याची शक्यता असते. ११) सोशल मीडियाचा वापर करताना आपली माहिती दुसर्यांना विनाकारण देऊ नका. १२) बँकेतून फोन आला, मग तो खरोखर असो की फसवा असो, फोनवर कोणतीही गोपनीय माहिती देऊ नका. शक्यतो बँकेत जाऊन आलेला फोन खराच होता का, याची खातरजमा करुन घ्या. १३) काही जण आपली महत्त्वाची माहिती क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, पासपोर्ट व अन्य आपल्या मोबाईलवर ‘स्टोअर’ करताना असे करणे चुकीचे व आर्थिक नुकसान करणारे ठरू शकते. १४)‘ब्ल्यूटूथ’ सहसा सार्वजनिक जागी वापरू नका. कारण, तिथे तुमची खासगी महत्त्वाची असलेली माहिती ट्रान्सफर होऊ शकते. मोबाईलवरून बँकिंग व्यवहार करणे जरी सोयीचे असले, तरी एकप्रकारे ते फार जोखमीचे आहे. त्यामुळे अतिसावधानता ही बाळगायला हवीच.
इंटरनेट बँकिंग
आता संगणकाने सर्व बँका जोडल्या गेल्या असल्यामुळे कुठेही व कुठल्याही शाखेत व्यवहार करता येतात. ‘डिजिटल क्रांती’मुळे हे चित्र बरेचदा बदललेले आहे. ‘एटीएम’ने भारतात प्रवेश केला. या यंत्रणातून कुठूनही बँक ग्राहकाला त्याच्या खात्यातील रक्कम मिळू लागली. ‘डिजिटल बँकिंग’ कागदविरहित ग्राहक अत्यंत वेगवान सहज व सुलभतेने व्यवहार करू शकतात. ‘डिजिटल बँकिंग’ म्हणजे पर्यायाने ‘इंटरनेट बँकिंग’ किंवा ‘ऑनलाईन बँकिंग.’
भारतात सर्वप्रथम ‘इंटरनेट बँकिंग’ सुविधा पुरविणारी बँक म्हणजे ‘आयसीआयसीआय बँक.’ या बँकेने सर्व प्रथम १९९६ मध्ये ‘इंटरनेट बँकिंग’ सुविधा ग्राहकांसाठी उपलब्ध केली. आता 26 वर्षांनंतर बहुतेक बँका ‘ऑनलाईन बँकिंग’ सुविधा ग्राहकांना पुरवित आहेत. ‘धनादेश’चे ‘एनकोडिंग’ करणे, ही या क्षेत्रातील ‘डिजिटल’ परिवर्तनाची सुरुवात. आता खात्यातील शिल्लक जाणून घेणे, पैसे ट्रान्सफर करणे, पैसे भरणे वा काढणे, पासबुक बाळगणे-भरणे, ही अशी कामे बँकेत न जाता हातातल्या मोबाईलवरून कुठूनही करता येतात. रोखरक्कम व धनादेश भरण्यासाठी काही बँकांनी मशीन्स बसविली आहेत. पासबुक भरून घेण्यासाठी बँकांमध्ये मशीन्स आहेत. त्यामुळे ग्राहकाला शाखेत जाऊन कोणाही कर्मचार्याशी संपर्क न साधता हे व्यवहार करता येऊ शकतात. कॅशिअरच्या सोयीसाठी ‘कॅश सॉर्टिंग’ मशीन्सही बँकांमध्ये उपलब्ध असतात. धनादेश तपासणीकरिता ‘डिजिटल लॅम्प’ ही सुविधा असते. ‘डिजिटल’ बँकांचीही काही ठळक उदाहरणे द्यायची, तर ‘इंटरनेट बँकिंग’, ‘मोबाईल बँकिंग’, ‘वॉलेट बँकिंग’, ग्राहक सेवा, ‘डिजिटल कॅश’, ‘एटीएम’, ‘एसएमएस’ व ‘आयव्हीआर’ ‘इंटरनेट व्हॉईस रिस्पॉन्स कॉलिंग’ इतर होत
‘डिजिटल बँकिंग’चे फायदे
अ. कमीत कमी वेळ.
ब. कोणत्याही ठिकाणाहून कोणत्याही वेळी बँकेचे खाते तपासता येते.
क. सुरक्षित व रोकडविरहित व्यवहार.
बँकांकडे असलेल्या संगणकीकरण ‘सीबीएस’ प्रणालीमुळे ग्राहक कुठूनही खात्यात उलाढाल करू शकतो. एनईएफटी/आरटीजीएस या सुविधांमुळे पूर्वीसारखे ‘डिमांड ड्राफ्ट’ घेणे जवळजवळ बंद झाले आहे. एनईएफटी/आरटीजीएसमुळे ज्याच्या खात्यात पैसे जमा करावयाचे आहे. त्याच्या खात्यात ते त्याच दिवशी जमा होतात. एनईएफटी/आरटीजीएस वापरासाठी ११ ‘डिजीट अल्फान्युमरिक’ (शब्द व संख्या दोन्ही) कोड वापरला जातो. आतील पहिली चार अक्षरे ही बँकेच्या नावासाठी वापरली जातात. पाचवे शून्य असते आणि अंतिम सहा अक्षरे ही त्या बँकेच्या शाखेची दर्शक असतात. ‘एनपीसीआय’ ही ‘रिटेल पेमेंट सिस्टीम’साठी काम करते. ‘युपीआय’ ही तत्काळ ‘मनी टान्सफर’ करणारी सिस्टीम असून, दोन व्यक्तींच्या बँक खात्यात व्यवहार करण्यासाठी मुख्यत्वे वापरली जाते.
एकंदरीत बँकिंग क्षेत्रातील सर्व स्तरांवर अत्यंत तीव्रतेने बदल होत आहेत. ‘डिजिटल बँकिंग’ हे ‘इलेक्ट्रॉनिक बँकिंग’, ‘सायबर बँकिंग’, ‘होम बँकिंग’ किंवा आभासी बँकिंग या नावानेही ओळखले जाते. यामध्ये विविध बँकिंग उपक्रमांचा समावेश आहे, जे कुठूनही वापरता येतात. ‘डिजिटल बँकिंग’चे जसे फायदे आहेत, तसे तोटेही आहेत, जे दुर्लक्षून चालणार नाहीत. ‘इंटरनेट’द्वारे आपल्या खात्याची सर्व माहिती ‘हॅक’ केली जाऊ शकते. आपल्या मोबाईलवर विविध प्रकारचे संदेश येतात, यांस आपण प्रतिसाद दिला, तर एका क्षणात आपले खाते रिकामे होऊ शकते. यासाठी असे संदेश तत्काळ ‘डिलीट’ करायचे किंवा असी संभाषणे तत्काळ बंद करावीत, तसेच तो क्रमांक तत्काळ ‘ब्लॉक’ करावा.
‘सायबर’ गुन्हे दिवसेंदिवस वाढत आहेत. ‘पासवर्ड’ची गुप्तता ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. आपली बँकिंगची माहिती विविध उपकरणांद्वारे पसरू शकते. जशा सोयी निर्माण होतात, त्या पाठोपाठ त्यांचे दुष्परिणामही येतात. आपण त्याचा वापर कसा करणार आहोत, यावर सर्व अवलंबून आहे. यामुळे बँकिंग क्षेत्र अतिशय संवेदनशील झाले आहे. ‘डिजिटल इंडिया’ पाठोपाठ ‘डिजिटल बँकिंग’ फोफावत आहे. पण, त्याचबरोबर मागच्या दाराने त्याचे तोटे वेगाने आत शिरत आहेत, याचाही गांर्भीयाने विचार करणे आवश्यक आहे. ‘डिजिटल’ दुनियेत आपण सुसाट वेगाने धावत आहेत, हा वेग जगाला कुठे घेऊन जाईल? हे भविष्यातच समजेल. ग्राहकांनी मात्र बँकेसारख्या संवेदनशील क्षेत्रात या ‘डिजिटल’ तंत्राचा जपून वापर करणे आवश्यक आहे.
आपल्या मोबाईलवर असलेल्या अॅप्सचा (अॅप्लिकेशन) वापर करणे, ही बाब आता आपल्याला सवयीची होऊन गेलेली आहे. संगीत ऐकायला, शेअर बाजाराचे भाव बघायला, रेल्वेचे तिकीट काढायला, ऑनलाईन खरेदी करायला, चित्रपटाची तिकिटे काढायला व अन्य कामांसाठीही अॅप्सचा खूप वापर होतो. तसेच सर्व बँकांनी आपली अॅप्स विकसित करून खातेदारंसाठी उपलब्ध करून दिली आहेत. विसाव्या शतकाच्या अखेरीस इंटरनेटचा, म्हणजेच माहितीच्या महाजालाचा वापर जगभरात झपाट्याने वाढू लागला. पुढच्या काही वर्षांत मोबाईल फोन आले. थोड्याच वर्षांत तंत्रज्ञानात अधिक प्रगती झाली व ‘स्मार्टफोन’ आहे. आज भारतात सुमारे ६० कोटींहून अधिक ‘स्मार्टफोन’ वापरात आहेत. ‘जन-धन योजने’मुळे आता बहुसंख्य भारतीयांकडे स्वत:चे बँक खाते आहे. त्याचबरोबर इंटरनेटचा वापरही वाढला आहे. मोबाईल फोनवरून इंटरनेट व बँकिंग सुविधांचा लाभ घेण्याचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. परवडणारे इंटरनेट, स्मार्टफोन व बँकिंग अॅप्स या तीन बाबी एकत्र आल्याने बँक जणू सर्वसामान्यांच्या हातातच आली आहे.
अॅप म्हणजे नक्की काय असते? अॅप म्हणजे एक ‘सॉफ्टवेअर प्रोग्राम’ असतो. आपले खाते असलेल्या बँकेचे आपण मोबाईलवर घेतो, ज्याला आपण डाऊनलोड केले असे म्हणतो. तेव्हा बँकिंग सेवा त्या मोबाईल अॅपद्वारे आपल्याला उपलब्ध होतात. अॅपचा उपयोग करून खात्यात किती रक्कम आहे, आपल्या खात्यातून अन्य कुणाला पैसे पाठविले, ‘युटीलिटी’ बिल भरणे, कर भरणे, नवीन चेकबुक मागविणे, ‘मर्चंट बँकिंग’ व्यवहार करणे, विमा, म्युच्युअल फंडची वगैरेची रक्कम भरणे. बचत खात्यातील रक्कम मुदतठेवीत वळती करणे इत्यादी व्यवहार करता येतात. सर्व बँकांचे अॅप्स आपल्या मोबाईलमध्ये ‘प्ले स्टोअर’मध्ये उपलब्ध असतात. बँकेतील खाते ‘अॅक्टिव्ह’ असावे लागते. मोबाईल क्रमांक बँक खात्याला जोडलेला असावा लागतो. बँकेच्या व्यवहारांसाठी योग्य काळजी घेऊन अॅपचा उपयोग केल्यास, आपली खूप सोय होते व वेळ आणि श्रम यांची बचतदेखील होते.