फसवे लोक, फसवे आंदोलन!

    18-Feb-2022   
Total Views |

nana Patole
महाराष्ट्रातील आणि खासकरून मुंबईतील काँग्रेसची अवस्था म्हणजे ‘अप्पा मारी गप्पा’ अशीच झालेली दिसते. कारण, काँग्रेसचे काही रिकामटेकडे लोक उगाच आंदोलनाचे वगैरे हत्यार उपसतात आणि प्रत्यक्ष आंदोलनाची वेळ आली की, तोंड लपवून बिळात दडी मारतात. काही दिवसांपूर्वीच याचा प्रत्यक्ष प्रत्यय आला, जेव्हा देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील ‘सागर’ या शासकीय निवासस्थानाबाहेर काँग्रेस कार्यकर्ते पंतप्रधानांच्या विधानाचा निषेध करण्यासाठीच्या आंदोलनाला जमणार होते. पण, या ‘सागर’ बाहेर भाजप नेते आणि कार्यकर्त्यांच्या लाटेची चाहूल लागताच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेसने हे आंदोलनच बासनात गुंडाळले. आता प्रदेशाध्यक्ष म्हणून नानांनी तर या आंदोलनाचे सक्षम नेतृत्व करणे अपेक्षित होते. पण, या काँग्रेसी सत्ताधार्‍यांनीही ‘पोलिसांनी रस्त्यात अडवले, मग आमच्यामुळे मुंबईकरांची गैरसोय नको’ वगैरे बहाणेबाजी करत आंदोलन आवरते घेतले. आता मुळात जिथे आंदोलनच झाले नाही, तिथे काल नाना या आंदोलनाचा म्हणे पुढचा टप्पा घोषित करूनही मोकळे झाले. नाना म्हणाले, “महाराष्ट्राने कोरोना पसरवला असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत करून महाराष्ट्राची बदनामी केली. हा महाराष्ट्राचा घोर अपमान आहे, या अपमानाबद्दल पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्राची माफी मागावी.” आता या मागणीसाठी शिवजयंतीदिनी मोदींना महाराष्ट्राची माफी मागायला सांगणारी, आपल्या पापाचे प्रायश्चित करावे, अशा आशयाची म्हणे हजारो पत्र काँग्रेस कार्यकर्त्यांतर्फे देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत मोदींना पाठवणार आहेत. म्हणजेच काय तर राज्यात सत्ताधारी असूनही काँग्रेसची भाजपच्या विरोधात आंदोलन करण्याइतपतही ताकद मनगटात नाही. म्हणूनच आता आंदोलनाला कार्यकर्तेही फिरकत नाही म्हटल्यावर पत्रांचा घाट घालण्यापर्यंत चार पावलं काँग्रेसला मागे टाकावी लागली. त्यामुळे आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर ‘हायकमांड’ला खूश करण्यासाठी नानांनी कितीही आंदोलनाचे सोंग रचले, तरी उपयोग शून्यच! कारण, काँग्रेसची आंदोलनं ही मुळी जनतेसाठी नसून ती राजकीय पोळी भाजून घेण्यासाठीचाच एक केविलवाणा प्रयत्न असतो, हे वारंवार सिद्ध झाले आहेच. तेव्हा, अशा या फसव्या लोकांच्या फसव्या आंदोलनांना विरोधकच काय तर जनताही भीक घालणार नाही, हेच खरे!

स्वबळाचे गळते बळ!

एकीकडे आंदोलने तावातावाने घोषित करून मोक्याच्या क्षणी पळ काढायचा आणि दुसरीकडे मुंबईत पालिकेच्या निवडणुका मात्र स्वबळावर लढण्याची ‘भाईगिरी’ करायची, अशी ही काँग्रेसची नौटंकी. त्यातच गेल्या वर्षभरापासून तर नाना आणि भाईंचा जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी नुसता स्वबळाचाच जप सुरू होता. पण, आता जसजशा पालिकेच्या निवडणुका दृष्टिपथात दिसू लागल्या तसतसे काँग्रेसचे स्वबळाचे बळही गळताना दिसते. काही दिवसांपूर्वीच मुंबई काँग्रेसचे नगरसेवक आणि पदाधिकार्‍यांची बैठक पार पडली. पण, ही बैठक स्वबळाच्या स्वनियोजनासाठी नव्हे, तर काँग्रेसने शिवसेनेशी जुळवून घ्यावे आणि एकत्रित निवडणुका लढवाव्या, हाच अजेंडा घेऊन संपलीही. जर राज्यात शिवसेनेसोबत मांडीला मांडी लावून सत्ता उपभोगतोय, तर पालिका स्तरावर त्यांच्या विरोधात लढणे राजकीयदृष्ट्या सोयीचे ठरणार नाही, असा काही नगरसेवकांनी सूर आळवला, तर काही नगरसेवकांनी मात्र शिवसेनेला सोबत घेतले, तर अल्पसंख्याक मतं ‘हात’ची जातील, म्हणून चिंताही व्यक्त केली. त्यामुळे मुंबई काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते-पदाधिकारी-नगरसेवक यांच्यामध्येच एकवाक्यता नसल्याचे स्पष्ट होते. देशपातळीवर काँग्रेसला कानाकोपर्‍यात जसे गटबाजीने पोखरले तीच गत मुंबईचीही. आधी कामत गट, गायकवाड गट आणि देवरा गटांत रस्सीखेच होती, तर आताही चेहरे बदलले असले तरी परिस्थिती ‘जैसे थे’च आहे. त्यातच मुंबईतील जिल्हा काँग्रेस अध्यक्ष, ब्लॉक अध्यक्ष आणि इतरही बरेच पदाधिकारी वर्षानुवर्षे त्याच पदावर ठाण मांडून आहेत. त्यामुळे काँग्रेसचे कागदोपत्री तळागाळात जाळे असले तरी ते निष्क्रियच, मरगळलेले आणि नेतृत्वहीनच म्हणावे लागेल. त्यातच मुंबईतील प्रभाग फेररचना ही शिवसेनेच्या पथ्यावर पडणार, अशी चर्चा असल्याने आपल्या व्होटबँकेचे वर्गीकरण होईल, याच भीतीने काँग्रेसचेही धाबे दणाणले आहेत. शिवाय राष्ट्रवादी, शिवसेना यांच्याशी आघाडीत लढलो, तर काँग्रेसच्या हाती किती जागा लागतील, बंडखोरीचा किती फटका बसेल, हा प्रश्नही काँग्रेससमोर ‘आ’ वासून उभा ठाकला आहे. त्यातच नानांनी काल मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन महाविकास आघाडीतील त्रुटींवरुन रडगाणे गायल्यानंतर, काँग्रेसच्या गेले काही महिने न कुरकुरणार्‍या खाटेचा पुन्हा आवाज आला तरी तो आला तसा नेहमीप्रमाणे विरुनही जाईल, हे वेगळे सांगायला नको!
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

विजय कुलकर्णी

 एम.सी.जे पर्यंत शिक्षण. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (फीचर्स) या पदावर कार्यरत. मुंबईतील बीएमएम महाविद्यालयांमध्ये पत्रकारितेतील विषयांसाठी व्हिजिटिंग फॅक्लटी म्हणून कार्यरत. चालू घडामोडी, सामाजिक विषय, युवा पिढीला आवडेल असे लेखन आणि वृत्तपत्रातील मांडणी आणि सजावटीमध्ये विशेष रुची