पाँडिचेरी : संपूर्णपणे स्मार्ट फोनवर चित्रित झालेला भारतातील पहिला चित्रपट

17 Feb 2022 17:13:44
 

pondicherry 
 
 
दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांच्या 'पॉंडिचेरी' या आगामी मराठी चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच सोशल मीडियावर धुमकाळ घातला होता. अभिनेत्री सई ताम्हणकर, अभिनेत्री अमृता खानविलकर आणि अभिनेता वैभव तत्ववादी यांच्या मुख्य भूमिका असलेला ह्या चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांना लागून होती. परंतु आता या चित्रपटाचा अधिकृत ट्रेलर रिलीज झाला आहे. वैभव, सई आणि अमृता या नवीन पिढीतील नात्यांची वैशिष्ट्ये आणि काहीशा खुणा आपल्याला या ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. विविध शहरांमधील पाच पात्र पाँडिचेरीमध्ये आपापल्या आयुष्याला कसे सामोरे जातात याची कथा पॉंडिचेरीमधून आपल्याला उलगडणार आहे.
 
हि कथा पाँडीचेरीसारख्या एका सुंदर आणि निसर्गरम्य अशा शहरात घडणारी मराठी माणसांची गोष्ट असून हा चित्रपट नवीन पिढीच्या विविध नात्यांचे प्रतिनिधित्व आहे. आणि या नवीन पिढीच्या पात्रांचे प्रतिनिधीत्व सई, वैभव आणि अमृता या चित्रपटात आपल्याला करताना दिसणार आहे. नवीन पिढीतील विस्थापित झालेले हे लोक कशा पद्धतीने नवी नाती निर्माण करतात, या सर्वांवर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. कुटुंबाची आणि नात्यांची एक नवीन व्याख्या आपल्याला या चित्रपटातून समजणार आहे. आणि हा प्रवास सई, वैभव आणि अमृता हे तिघे मिळून आपल्यासमोर उलगडणार आहेत. तसेच या चित्रपटाचे खास वैशिष्ट्य म्हणजे संपूर्णपणे स्मार्ट फोनचा वापर करून चित्रित करण्यात आलेला हा भारतातील पहिलाच चित्रपट ठरला आहे. अक्षय बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी, व्हिस्टास मीडिया कॅपिटल कंपनी आणि क्रिएटिव्ह वाईब प्रॅाडक्शन यांनी या चित्रपटाच्या प्रस्तुतीची धुरा सांभाळी असून सचिन कुंडलकर यांनी या चित्रपटासाठी दिग्दर्शनासोबतच लेखन आणि निर्मात्याचीही भूमिका साकारली आहे. हा चित्रपट २५ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
 
"पॉंडिचेरी हा चित्रपट एकंदरीतच विविध विषय घेऊन येतो. चित्रपटाच्या ट्रेलरवरून हा चित्रपट एखादा लव्ह ट्रँगल आपल्याला वाटू शकतो, पण या चित्रपटाची थीम हि त्याही पलीकडची आहे. हा चित्रपट संपूर्णपणे मोबाईलवर चित्रित केला असल्यामुळे तांत्रिक फरक हा स्पष्ट लक्षात येऊ शकतो. पण तांत्रिक फरकाचा समतोल राखण्यासाठी आम्ही चित्रपट खूप काळजीपूर्वक शूट केला असून एक उत्कृष्ट निर्मिती या निमित्ताने केली आहे. यासर्वात फोटोग्राफर मिलिंद जोगच्या कामाची चमक देखील आपल्याला दिसून येते. अनेक अष्टपैलू कलाकारांनी एकत्र येत हा चित्रपट बनवला आहे. ही एक अनोखी भावनिक कथा प्रेक्षकांना नक्कीच आवडेल," असे मत चित्रपटाचे दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांनी मांडले.
 
“प्लॅनेट मराठी हे जगतातील पहिले मराठी ओटीटी प्लॅटफॉर्म असून त्यावर पहिली थिएटर फिल्म ‘जून’ झळकली होती. नेहमीच नवनवीन प्रयोग करण्याच्या प्रयत्नात आम्ही असतो. असाच वेगळा प्रयोग ‘पाँडीचेरी’ च्या माध्यमातूनही करण्यात आला आहे. हा चितपट स्मार्ट फोनवर चित्रीत करून प्रदर्शित करण्यात येणार आहे. अशा पध्दतीची ही पहिली फिचर फिल्म आहे. अत्यंत मोजक्या टीममध्येच केवळ एक महिन्यातच एका उत्तम चित्रपटाची निर्मिती होऊ शकते, याचे हे उत्तम उदाहरण आहे. प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी नेहमीच वेगवेगळे विषय घेऊन येण्याचा आमचा प्रयत्न असतो. असाच एक वेगळा विषय, कथा आपल्याला ‘पाँडीचेरी’ मध्ये नक्कीच पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात अनेक जमेच्या बाजू आहेत. दिग्दर्शक, कथा, कलाकार आणि नैसर्गिक सौंदर्याने खुललेले नयनरम्य ‘पाँडीचेरी’. हा चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच आवडेल आणि याचा अनुभव आपल्या कुटुंबासह चित्रपटगृहात जाऊनच घ्यावा.”
 
Powered By Sangraha 9.0