मुंबईत मराठी माणसावर बेघर होण्याची वेळ !

17 Feb 2022 17:05:30

mumbai
 
 
 
 
मुंबई : मराठी माणसांचे हक्काचे शहर समजल्या जाणाऱ्या मुंबईत आता मराठी माणसांनाच बेघर व्हायची वेळ आली आहे. मुंबईचे मूळ समजल्या जाणाऱ्या भागांपैकी एक अशा प्रभादेवी परिसरातील काही मराठी कुटुंबं मागील अनेक वर्षांपासून आपल्या हक्काच्या घरासाठी संघर्ष करत आहेत. प्रभादेवी परिसरातील मिठवाला चाळ रहिवाशांना काही कारणांमुळे पुनर्विकासात समाविष्ट करण्यात आलेले नाही. त्यामुळे या चार कुटुंबांवर अक्षरशः बेघर होण्याची वेळ आली आहे. या प्रश्नी संबंधित कुटुंबांनी नुकताच 'दै. मुंबई तरुण भारत'शी विशेष संवाद साधला.
 
 
 
२८ वर्षांपासून पाठपुरावा ; अद्याप यश नाही !
'आमची घरे प्रशासनाने आखून दिलेल्या सीमेच्या काही अंतर आत आणि काही अंतर बाहेर आहेत. त्यामुळे प्रशासनातर्फे तांत्रिक कारणे आणि नियम पुढे करत आम्हाला अपात्र ठरविण्यात आले आहे. आम्ही याच मिठवाला चाळीचे रहिवासी आहोत, मात्र आम्हाला इथून काढण्याचे प्रकार होत आहेत. १९९४ पासून म्हणजेच मागील २८ वर्षांपासून या प्रकरणी आम्ही 'म्हाडा' आणि संबंधित प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहोत, मात्र त्याला कुठलेही यश आलेले नाही.'
- उमेश गंगनाईक, स्थानिक रहिवासी,वॉर्ड क्रमांक १९४
 
 
 
'म्हाडा'च्या निर्णयाकडे आमचे लक्ष !
'आम्ही मागील ४० ते ५० वर्षांपासून या ठिकाणचे रहिवासी आहोत. जर चाळीचा पुनर्विकास होत असेल तर त्यात आमचा समावेश व्हावा अशी आमची मागणी आहे. आम्ही आवश्यक ती सर्व कागदपत्रे संबंधित प्रशासन आणि इमारतीचे मुख्य प्रवर्तक यांचेकडे सुपूर्द केलेले आहेत. प्रवर्तकांनी आम्हाला प्रकल्पात समाविष्ट करण्याची हमी दिलेली आहे, पण अद्याप त्याला 'म्हाडा'तर्फे परवानगी मिळालेली नाही. आम्ही याचा पाठपुरावा करत राहणार आहोत.'
- महेश आर्य, स्थानिक रहिवासी,वॉर्ड क्रमांक १९४
 
 
 
अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करू..!!
'आम्ही म्हाडाकडे याबाबत सातत्याने संपर्क साधत आहोत. इमारतीच्या मुख्य प्रवर्तकांनी देखील या कुटुंबाना आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करून प्रकल्पात सहभागी करण्याचे आश्वासन दिले आहे. आम्ही संबंधित कुटुंबांवर अन्याय होऊ देणार नाहीत अशी आमची भूमिका आहे. जर या कुटुंबाना अपात्र ठरविण्यात आले तर त्या विरोधात कायदेशीर मार्गाचा अवलंब केला जाईल. जर रस्त्यावरील लोकांना घरे दिले जाऊ शकतात तर ता अधिकृत रहिवाशांना घरे देण्यात काय अडचण आहे. पीडित कुटुंबाना या प्रकल्पात सहभागी करून घेतले नाही, तर त्या विरोधात मनसे स्टाईल आंदोलन केले जाईल.'
उमेश गावडे, मनसे शाखाध्यक्ष, वॉर्ड क्रमांक १९४
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0