पन्नास मिनिटांचा फूसका बार! : साडेतीन नावांचा उल्लेखही नाही!

15 Feb 2022 17:52:50

Sanjay Raut 
 
 
मुंबई : मंगळवार, दि. १५ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ४ वाजता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेना भवनात पत्रकार परिषद आयोजिक केली होती. यावेळी अनिल देशमुख यांच्याजागी तुरुंगात जाणाऱ्या भाजपच्या साडेतीन नावांचा उल्लेख ते करणार होते. मात्र पन्नास मिनिटांच्या पत्रकार परिषदेत यासंबंधी त्यांनी काहीच चर्चा केली नसल्याचे दिसून आले.
 
 
 
माझ्या जवळच्या व्यक्तींवरच ईडीची धाड
जेव्हा मी मविआघाचं सरकार पडणार नाही असं म्हणायचो तेव्हा ईडीच्या धाडीचं सत्र माझ्या जवळच्या व्यक्तींवर सुरु व्हायचं. माझ्या नातेवाईकांसह मित्रपरिवारालाही ईडीच्या धाडींना सामोरं जावं लागत होतं. माझ्या मुलीच्या लग्नात सुध्दा मेहंदी आणि नेल पॉलिश वाल्यांची चौकशी ईडीकडून करण्यात आली. त्यांना तिहार जेलमध्ये टाकण्याची धमकीही देण्यात आली. इडीचे एजंट वसुली एजंट बनले आहेत.
 
 
 
राकेश वाधवान हा नील सोमय्याचा पार्टनर
पीएमसी बँक घोटाळा प्रकरणातला आरोपी राकेश वाधवान याचा भाजपशी थेट आर्थिक संबंध आहे. राकेश वाधवान हा किरीट सोमय्यांचा मुलगा नील सोमय्याचा पार्टनर आहे. निकॉन इन्फ्रा ही नील सोमय्याची कंपनी आहे. त्यांनी वाधवानला ब्लॅकमेल करत जमीनीसोबत ८० ते १०० कोटी घेतले आहेत. राकेश वाधवानच्या खात्यातून एकूण २० कोटी गेले आहेत.
 
 
 
वनमंत्र्यांच्या घरच्या लग्नात जंगलाची थीम
दोन वर्षांपूर्वी भाजपच्या सरकारातील वनमंत्र्यांच्या घरी लग्न होतं. वनमंत्री असल्याने लग्नाची थीम ही जंगलाची करण्यात आल होती. त्यावेळी तिथे वापरलेलं साधं कार्पेट हे साडे नऊ कोटींचं होतं. या लग्नात वनमंत्र्यांनी केलेला अवाढव्य खर्च ईडीला कधी दिसला नाही.
 
 
 
याआधी असं घाणेरडं राजकारण झालेलं नाही
छत्रपतींच्या या राज्यात याआधी असं घाणेरडं राजकारण कधी झालेलं नाही. उद्धव ठाकरे आणि परिवाराच्या रोज काही ना काही बातम्या उठवायच्या. या बातम्या जो सांगतो ना तो मोठा दलाल आहे. किरीट सोमय्या हा माणूस मराठी द्वेष्टा आहे. त्यानेच मुंबईतील शाळांमध्ये मराठी भाषेची सक्ती केल्यानंतर कोर्टाचे दरवाजे ठोठावले होते.
 
 
Powered By Sangraha 9.0