आता ‘खरं प्रेम’ काय असतं? लोक काय काय करतात, ते सिद्ध करायला? तर मुळातच आपण प्रेमाचा एक त्रिकोणी सिद्धांत समजून घ्यायला पाहिजे. तसे प्रेमाचेही अनेक सिद्धांत आहेत. वैयक्तिक नात्यातल्या प्रेमाच्या दृष्टिकोनातून रॉबर्ट स्टर्नबर्ग यांनीं त्रिकोणी सिद्धांत मांडला आहे. त्यानुसार प्रेमात आत्मीयता, आवेग वा आर्तता आणि बांधिलकी हे तीन घटक महत्त्वाचे ठरतात.
बहुतेक माणसं जगात ‘त्या’चा सतत शोध घेत राहतात. ‘त्या’बद्दल बोलत राहतात. ‘त्या’ची इच्छा करत राहतात. ‘त्या’च्या बाह्य स्वरूपात व्यक्त होण्यापेक्षा अनेकांना ‘त्या’ची खोल अनुभूती आतून जाणवत असते. असा ‘तो’ जगातला सगळ्यात महान सद्गुण आहे, त्याला सरळसाध्या परिचित आणि प्रसिद्ध भाषेत ‘प्रेम’ असं म्हणतात. प्रेम खूप मनोहारी आणि तितकंच ते गुंतागुंतीचे आहे. खासकरून प्रणयात सुचवलेले प्रेम सुंदर असे कोडे आहे, ते समजावणेसुद्धा खूप कठीण आणि कवी गुलजार यांच्या काव्यात्मक भाषेत सांगायचे म्हटले तर...
हमने देखी हैं इन आँखोंकी
महकती खुश्बू।
हाथ से छुके इसे रिश्तोंका इल्जाग न दो॥
सिर्फ एहसास हे रूह से महसूस करो।
प्यार को प्यार ही रहने दो
कोई नाम न दो॥
खरं आहे, प्रेमाची भाषा खर्या अर्थाने ज्याने प्रेम केलं आहे, त्यालाच कळते. मग ते आईच्या हृदयातलं प्रेम असेल वा देशासाठी कुठलाही त्याग करू शकणार्या देशभक्ताचे प्रेम असेल. प्रेम ही माणसाला जाणवणारी सर्वात तीव्र भावना आहे. ती जसे अतीव आनंद आणि सुख देणारी भावना आहे, तशीच वियोगात तडफणार्यासाठी कडेलोट करणार्या दुःखाचीही भावना आहे.
‘खरं प्रेम’ काय असतं, यावर कित्येक शतके चर्चा होत राहिल्या. ज्यांचा विश्वास नाही, असे लोक ‘खरं प्रेम अस्तित्त्वात नाही’ असं शपथेवर सांगतात. भावूक प्रेमिक ‘कुछ कुछ होता हैं’ याची अनुभूती घेत ते अनंत काळासाठी अस्तित्त्वात होते आणि राहील, याची खात्री देत राहतात.
दरवर्षी ‘व्हॅलेंटाईन डे’ हा प्रेमाचा जणू प्रकटीकरणाचा दिवस साजरा केला जातो. त्यात भावूकतेपासून बाजारीकरणापर्यंतच्या अनेक छटा असतात. जसा दिव्याचा प्रकाश आपण रोजच पाहतो, पण दिवाळी मात्र दिव्यांच्या रोषणाईने साजरी करतो, तसेच प्रेमाची अभिव्यक्ती आणि अस्तित्व त्या दिवशी लोकं साजरं करतात. त्यात काही गैर आहे, असं म्हणता येणार नाही. प्रत्येकाला या सुंदर भावनेला कसं अनुभवावं, हे ठरविता येतं. आज शास्त्रसुद्धा ‘खरं प्रेम’ अस्तित्वात असतं आणि ते आयुष्यभर टिकू शकतं, असं सुचवतं. बर्याच जणांना असा प्रश्न पडतो की, आपण प्रेमात तर पडलो, पण आपल्याला ‘खरं प्रेम’ खरंच सापडलं आहे का? खरंच कसं कळणार कोणाला की, आपल्या मनात उफाळणार्या जिव्हाळ्याच्या मोहक भावना खरं प्रेम आहे का?
खरंच महत्त्वाचा प्रश्न आहे. ‘खरं प्रेम’ म्हणजे नक्की काय? एका लाल गुलाबाऐवजी 100 गुलाबं देणारा खरं प्रेम करतो का? दहा रुपयांच्या गुलाबाऐवजी सगळ्यात महागडं अत्तर देणारा खरं प्रेम करतो का? आपल्यावर प्रेम करणारा एखादी सुंदर प्रेम कविता आपल्यासाठी लिहितो, तेव्हा तो खरं प्रेम करतो का? हातावर ब्लेड मारून रक्ताने रूमालावर ‘मी तुझ्यावर अतीव प्रेम करतो’ किंवा ‘आय लव्ह यू’ असं लिहून देतो, तेव्हा त्याचं प्रेम ‘सुपरडूप्पर’ खरं असतं का? किंवा ‘प्यार किया तो डरना क्या’ असं सार्या जगासमोर कुणाच्या सत्तेला न जुमानणारं प्रेम सगळ्यात खरं असतं का? कसं ठरवायचं? आता ‘खरं प्रेम’ काय असतं? लोक काय काय करतात, ते सिद्ध करायला? तर मुळातच आपण प्रेमाचा एक त्रिकोणी सिद्धांत समजून घ्यायला पाहिजे.
तसे प्रेमाचेही अनेक सिद्धांत आहेत. वैयक्तिक नात्यातल्या प्रेमाच्या दृष्टिकोनातून रॉबर्ट स्टर्नबर्ग यांनीं त्रिकोणी सिद्धांत मांडला आहे. त्यानुसार प्रेमात आत्मीयता, आवेग वा आर्तता आणि बांधिलकी हे तीन घटक महत्त्वाचे ठरतात. आर्तता किवा आवेग हा भावनिक उत्तेजितपणाशी संबंधित आहे. हा आवेग एखाद्या माणसासाठी व कार्यासाठी असू शकतो. या आवेगात रुमानियतही आहे आणि प्रचंड नियंत्रणाचा भाग आहे. आपण जी गोष्ट व कृती करतो, त्याविषयी एक मालकीहक्कांची जाणीव यात आहे. त्यामुळे आपण ‘डर’ या चित्रपटात जो वाहत गेलेला हिरो आहे, तसा प्रकारही प्रेमात पाहतो. या आवेगाला जर आत्मियता लाभली, तर ते प्रेम एका वेगळ्याच उंचीवर पोहोचतं.
यात एखाद्या व्यक्तीबद्दलचा लळा आहे, म्हणून त्या प्रेमात प्रेमासाठी नि:स्वार्थपणाची प्रवृत्तीही दिसून येते, पण शेवटी प्रेमात बांधिलकी महत्त्वाची ठरली. कारण, बांधिलकीत छिच्छोरपणा नसतो. त्यात एक जाणीवपूर्वक प्रेरणा असते. त्यात एखाद्यासाठी समर्पण करण्याची वचनबद्धता असते. त्यात स्वार्थत्याग करण्याची इच्छा असते. हे प्रेम-प्रेमिकांचे असते. आईचे असते. मैत्रीत असते. वरील तीन घटकांमधून जी काही ताकद प्रेमाला मिळते, त्यानुसार प्रत्येकाची अनुभूती वेगवेगळी असते. यातील एकाच घटकांवर अवलंबून असलेले प्रेम कधीकधी कमी काळ टिकते, जगते. परंतु, तीनही घटक व्यवस्थित जुळले की, प्रेमात एक स्थिरता दिसून येते.
- डॉ. शुभांगी पारकर