‘शिवाजी पार्क’मध्ये स्मृतिस्थळे न उभारण्याच्या मागणीला स्थानिकांकडून पाठिंबा

13 Feb 2022 20:35:35

Prakash Belwade
 
 
 
मुंबई : शहरातील प्रसिद्ध शिवाजी पार्क मैदानाचा वापर केवळ खेळासाठीच करण्यात यावा, याठिकाणी थोर व्यक्तिंची स्मारके उभारणे आणि अंत्यसंस्कार करण्यासाठी या मैदानाचा वापर करण्यात येवू नये, या मागणीला स्थानिक रहिवाश्यांकडून देखील मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते प्रकाश बेलवाडे यांनी रविवार, दि. १३ फेब्रुवारी रोजी दै. ‘मुंबई तरुण भारत’ला दिली.
 
 
 
“मुंबईत शिवाजी पार्क हे मैदान सर्वत्र खेळाचे मैदान म्हणून प्रचलित आहे. केवळ खेळाचे मैदान म्हणूनच नाही, तर अनेक अनेक नागरिक याठिकाणी मोकळ्या हवेत फेरफटका मारण्यासाठी येत असतात. परंतु, येथे काही थोर व्यक्तींचे अंत्यसंस्कार कण्यात आल्याने या परिसराला अनेकदा छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. अशा वेळी स्थानिकांच्या फिरण्यावर मर्यादा येतात. अंत्यसंस्कारानंतर मुलांना दोन दिवस मैदान खेळण्यासाठी बंद करण्यात येते. याठिकाणी अनेक वर्षांपासून प्रदूषणाचीही समस्या आहेच. तसेच २००९ साली न्यायालायाने शिवाजी पार्क स्मारक खेळासाठीच वापरले जावे, असेही स्पष्ट केले आहे. त्यामुळे शिवाजी पार्कची ओळख बदलली गेली, तर ते न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघनदेखील ठरू शकते. त्यामुळे याठिकाणी थोर व्यक्तिंचे अंत्यसंस्कार करण्यात येवू नये, तसेच त्यांची स्मृतिस्थळे उभारण्यात येवू नये, या मागणीसाठी मुंबई उच्च न्यायालयात नुकतीच जनहित याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने ती स्वीकारलीही आहे, लवकरच यावर सुनावणी होणार आहे. या जनहित याचिकेला येथील स्थानिक नागरिकांचाही मोठ्या प्रमाणात पाठिंबा आहे,” असे ते म्हणाले.
 
 
 
Prakash Belwade1
 
 
Powered By Sangraha 9.0