एका भव्य कलाकृतीची छोटीशी झलक : Pawankhind trailer review
10-Feb-2022
Total Views |
फर्जंद आणि फत्तेशिकस्त या चित्रपटांना प्रेक्षकांकडून मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर तब्बल अडीच वर्षांनंतर शिवाष्टकेमधील पुढील भाग 'पावनखिंड' प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांचा महिमा सांगणाऱ्या शिवाष्टकेमधील तिसरा भाग असणाऱ्या 'पावनखिंड' या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते.
साधारण एक वर्षापूर्वी या चित्रपटाची पहिली झलक 'जंगजौहर' या नावाने प्रेक्षकांना पहायला मिळाली होती. त्यानंतर काही तांत्रिक कारणांमुळे या चित्रपटाचे नाव बदलून 'पावनखिंड' ठेवण्यात आले. परंतु मागील दोन वर्षांपासून सुरु असणाऱ्या कोरोना प्रभावामुळे गेल्या वर्षभरात चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अनेकदा बदलण्यात आली. मात्र आता अखेर शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मुहूर्त ठरला आहे. आणि चित्रपटाला अवघा एक आठवडा असताना आज या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाल्यानंतर अवघ्या ६ तासांमध्ये या ट्रेलर ने २ लाख २९ हजार व्ह्यूजचा टप्पा पार केला आहे.
इतिहासातील आपल्या सर्वांच्याच परिचयाच्या असणाऱ्या घोडखिंडीच्या युद्धावर हा चित्रपट आधारित असणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर पाहत असतानाच चित्रपटावियषयीची आपली उत्सुकता वाढल्या शिवाय राहत नाही. फर्जंद आणि फत्तेशिकस्त या चित्रपटांतील बरेचसे कलाकार या चित्रपटामध्येसुद्धा असणार आहेत हे तर आपल्याला या चित्रपटातील लाँच करण्यात आलेल्या गाण्यांवरून समजलेच होते. परंतु या चित्रपटाच्या ट्रेलरमधून आपल्याला एक गोष्ट समजते ती म्हणजे या चित्रपटात आपल्याला उज्ज्वला जोग, क्षिती जोग, प्राजक्ता माळी, माधवी निमकर, दीप्ती केतकर, अजिंक्य ननावरे, वैभव मांगले, संतोष जुवेकर यांसारखे मराठीतील अन्य कलाकारही दिसणार आहेत.
चित्रपटाचा ट्रेलर म्हणजेच चित्रपटाची छोटीशी झलक असते. या ट्रेलवरूनच चित्रपटात काय असणार आहे किंवा आपल्याला काय पाहायला मिळणार आहे याची एक साधारण कल्पना आपल्याला मिळते. परंतु पावनखिंडचा ट्रेलरच इतका भव्य आहे कि यावरूनच आपण अंदाज लावू शकतो कि दिग्दर्शक दिगपाल लांजेकर आणि त्याच्या टीमने आपल्यासाठी किती भव्य कलाकृती या चित्रपटाच्या माध्यमातून बनवली आहे. याशिवाय सिनेमाची सिनेमॅटोग्राफी देखील या चित्रपटाला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जाणार हे ट्रेलरमधून जाणवतेच आहे.
फर्जंद आणि फत्तेशिकस्त या दोन्ही चित्रपटांचे संगीत हे देखील या चित्रपटाची एक वेगळीच ओळख होती. आणि पावनखिंडचा ट्रेलर पहिल्यांनंतर इथे एक गोष्ट अधोरेखित करू शकतो ती म्हणजे या चित्रपटाचेही संगीत या चित्रपटाची ओळख आहे. ट्रेलर पाहत असताना ऐकू येणारे पार्श्वसंगीत तुमच्या अंगावर काटा आणल्याशिवाय राहणार नाही. एकंदरीतच चित्रपटाची स्टार कास्ट, म्युजिक, सिनेमॅटोग्राफी, लोकेशन या सर्वांची झलक ट्रेलरमधून पहिल्यांनंतर या चित्रपटाविषयीची असणारी उत्सुकता ही मात्र शिगेला पोहचल्याशिवाय राहणार नाही हेच खरं...