कोकणात समु्द्री कासवांचा जन्मोत्सव; 'या' किनाऱ्यावरुन पिल्ले समुद्रात रवाना

10 Feb 2022 15:29:14
sea turtle



मुंबई (विशेष प्रतिनिधी) - 
 यंदाच्या सागरी कासव विणीच्या हंगामात संरक्षित करण्यात आलेल्या अंड्यांमधून पिल्लांनी डोके वर काढण्यास सुरूवात केली आहे. ही पिल्लं वाळूतून मार्गक्रमण करत समुद्रात रवाना होण्यास सुरुवात झाली आहे. सागरी कासव विणीच्या यंदाच्या हंगामात जन्मास आलेली पहिले पिल्ले दिवेआगर किनाऱ्यावरुन समुद्रात सोडण्यात आली आहेत. ( konkan sea turtle )
 
 
राज्यातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन सागरी जिल्ह्यांमधील काही किनाऱ्यांवर समुद्री कासवे अंडी घालण्यासाठी येतात. ( konkan sea turtle ) यामध्ये 'ऑलिव्ह रिडले' या प्रजातीच्या माद्यांचा समावेश असतो. रायगड जिल्ह्यातील ४, रत्नागिरीमधील १३ आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १३ किनाऱ्यांवर समुद्री कासवे अंडी घालतात. नोव्हेंबर ते मार्च हा सागरी कासवांचा विणीचा हंगाम असतो. यंदाच्या या हंगामात किनाऱ्यावर आढळलेली अंडी कासवमित्रांकडून संरक्षित करण्यात आली होती. या अंड्यांमधून आता पिल्ल बाहेर पडण्यास सुरुवात झाली आहे. ( konkan sea turtle )


 

दिवेआगर आणि श्रीवर्धन किनाऱ्याच्या मधल्या पट्ट्यामध्ये आरवी किनारा आहे. या किनाऱ्यावर डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घरटे सापडले. या किनाऱ्यावर घरट्याच्या देखभालीसाठी कोणीही नसल्याने घरट्यात सापडलेल्या १०० अंड्यांना दिवेआगर किनाऱ्यावर हलवण्यात आले होते. या अंड्यांमधून ४५ पिल्ले बाहेर पडली असून त्यांंना समुद्रात सोडण्यात आल्याची माहिती श्रीवर्धनचे वनपरिक्षेत्र अधिकारी मिलिंद राऊत यांनी दिली. येत्या काळात इतर किनाऱ्यांवर संरक्षित केलेल्या घरट्यांमधून पिल्ले बाहेर पडण्यास सुरुवात होणार आहे. दरम्यान वेळास आणि आंजर्ले किनाऱ्यावर सॅटलाईट काॅलर लावलेल्या 'प्रथमा' आणि 'सावनी' या माद्या देखील आपले मार्गक्रमण करत आहेत. ( konkan sea turtle )


Powered By Sangraha 9.0