अमेरिकेच्या ‘अपोलो-११’ने मानवनिर्मित मिशन शक्य करुन दाखविले. अशाप्रकारच्या अशक्यप्राय गोष्टी शक्य करुन दाखवत मानवाने रचलेल्या इतिहासावर अनेक ग्रंथ आणि खंड लिहिता येतील. तो असा कुठला घटक आहे, ज्यामुळे एखादी गोष्टी शक्य होईल की नाही, हे सांगता येईल.
''Start by doing what is necessary, then what is possible and suddenly you are doing the impossible.'' हे वाक्य खूप सुंदर आणि समजण्यास सोपेही आहे. कृतीत आणतानासुद्धा या वाक्यात अभिप्रेत असलेली संकल्पना मनाला पटणारी आहे. ज्याची गरज भासते, त्या गोष्टी दैनंदिन जीवनासाठी व जगण्यासाठी आवश्यक असतात. जसे की, आपले अन्न, पाणी, निवारा आणि सुरक्षा. आपण याच गोष्टी करण्यास मानव म्हणून पहिल्यांदा शिकलो. हळूहळू इतर गोष्टी विकसित होत गेल्या. आधुनिक जगात आपण ज्या तांत्रिक विकास झालेल्या गोष्टी पाहतो, त्या अशक्यतेतून निर्माण झालेल्या आहेत. त्यामध्येविजेचा शोध आहे. विमानाचा शोध आहे. इंटरनेटचा शोध आहे. ‘कोविड’ काळातसुद्धा आपण पहिल्या ज्या गोष्टी केल्या, ज्या आवश्यक होत्या. आपल्याला स्वतःला ज्या विषाणूपासून वाचवायचं होते, त्यासाठी प्रथम आपण आपले विलगीकरण केले. मास्क वापरले आणि ‘दो गज दूरी’ ठेवली. कारण, तेही आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी करणे आवश्यक होते. त्यानंतर आपण अशक्य गोष्ट कमीत कमी काळात करून दाखवली. ती म्हणजे, ‘कोविड’ची लस पृथ्वीतलावर आणली. ‘कोविड’ विषाणूच्या काळातील ही प्रगमनशील वाटचाल आपण पाहिली, तर मानवाच्या अचाट शास्त्रीय प्रगतीचा आवाका वैचारिक पातळीवर सहज समजण्यासारखा आहे.
आपल्याला कोणी असं सांगितलं की, आपण या जगात काहीही करू शकतो, तर किती मज्जा येईल नाही! वॉल्ट डिस्ने यांनी म्हटलेच आहे की, “अशक्यप्राय गोष्ट करून पाहण्यातच खरी मजा आहे.” लहान मुलांची दुनिया, परिकथा, ‘सुपरमॅन’, अनैसर्गिक शक्ती असलेली दुसर्या ग्रहावरची माणसे अशी असल्याने त्यांचा दृष्टिकोन तसा अशक्यतेतून काहीतरी करण्याचा असतो. हळूहळू आपण आपला दृष्टिकोन वास्तविकतेकडे आणतो. आपल्याला काय शक्य आहे आणि काय करणे अशक्य आहे, याचे मंथन करू लागतो. अर्थात, आपली वैचारिक वाटचाल आपण काहीही करणे शक्य आहे. यावरून अशक्यप्राय गोष्टीही जगात असतात. इथपर्यंत प्रवास कसा केला जातो, यावर चांगलीच चर्चा रंगू शकते. पण, सामन्यतः आपले वैचारिक संगोपन आपल्या मातापित्यांनी कसे केले आहे, आपले शालेय जीवन कसे होते, आपण सोशल मीडियाने किती प्रभावित झालो आहोत, या गोष्टींचा प्रभाव आपल्यावर होत असतो. आपली वैचारिक जडणघडण आणि परिवर्तन या गोष्टी आपल्या सभोवतालच्या परिस्थितीशी निगडित आहेत. शिवाय आपल्याबद्दल इतरांना असणारी अपेक्षा वा आपली स्वतःचीअपेक्षा, यावर आपल्या जीवनातील शक्य-अशक्यची ‘फिलॉसॉफी’ आपण जगत जातो.
जगात एक असा दाखला आहे, ज्याला ‘पिग्मॅलियन इफेक्ट्स’ असं म्हणतात. यानुसार आपल्याबद्दलच्या अपेक्षांनुसार माणसं आपलं कार्य, उत्तम तर्हेने करत जातात. म्हणजे आपल्या आयुष्यात आपल्याला मार्गदर्शन करणारी, रस्ता दाखवणारी माणसं असतात. ते आपले पालक असतात, शिक्षक असू शकतात, आध्यात्मिक गुरु असू शकतात. राजकीय नेतेही असू शकतात. याची अनेक उदाहरणे इतिहासात आहेत. अहिंसेतूनही एखाद्या देशाला स्वातंत्र्य मिळवता येऊ शकते, हा अशक्यप्राय पराक्रम अनेकांना वाटला, पण आपल्या राष्ट्रपिता महात्मा गांधींनी हे सिद्ध करुन दाखविले. चंद्रावर मनुष्यजातीला पाऊल टाकता येईल, ही केवळ अशक्यप्राय कल्पना होती. अमेरिकेच्या ‘अपोलो-११’ने मानवनिर्मित मिशन शक्य करुन दाखविले. अशाप्रकारच्या अशक्यप्राय गोष्टी शक्य करुन दाखवत मानवाने रचलेल्या इतिहासावर अनेक ग्रंथ आणि खंड लिहिता येतील. तो असा कुठला घटक आहे, ज्यामुळे एखादी गोष्टी शक्य होईल की नाही, हे सांगता येईल. विल्यम शेक्सपिअर यांनी एका ठिकाणी म्हटले आहे की, “जगात एखादी गोष्ट चांगली किंवा वाईट अशी नसतेच, पण विचारांमुळे ती तशी ठरते.” याचा अर्थ माणसाची वैचारिक प्रक्रिया व दृष्टिकोन यामुळे त्याच्या आयुष्याची निष्पत्ती ठरत असते. म्हणजे ‘आपण एखादी गोष्ट प्राप्त करू शकू का,’ या प्रश्नार्थक विचारापेक्षा ‘आपण ती कशी प्राप्त करू शकू,’ या वैचारिक प्रश्नांतून खरोखर प्राप्तीच्या योग्य मार्गाकडे नेऊ शकते. यामुळे आपण पूर्वी कधी विचारात न घेतलेल्या वा प्रयत्न करुन न पाहिलेल्या गोष्टींचा विचार वा मनन करण्यास प्रवृत्त होतो.
मग आपण आपला वैचारिक प्रवाह वा दृष्टिकोन कसा बदलू शकतो? आतापर्यंत जे काही वर वर पाहता आपल्याला अशक्यप्राय वाटते, ते शक्यतेच्या दुर्बिणीतून कसे पाहता येईल, याचा विचार पुढील लेखात करुया.
- डॉ. शुभांगी पारकर