शिवकालीन युद्धकलेचे प्रसारक : अमोल नलावडे

09 Dec 2022 21:27:33
mansa


क्रीडा प्रकारांसह शिवकालीन युद्धकलेची सध्याच्या तरुण पिढीला ओळख व्हावी, यासाठी ते गेल्या दोन दशकांपासून धडपडत आहे. जाणून घेऊया अमोल अरविंद नलावडे यांच्याविषयी...


अमोल अरविंद नलावडे यांचा जन्म सोलापूर जिल्ह्यातील आजोळी अर्थात बार्शी येथे झाला. वडील वकील तर आई गृहिणी. अमोल यांचे प्राथमिक शिक्षण नांदेडच्या गुरूनानक विद्यालयात झाले. गोट्या, विटी-दांडू, लगोरी हे पारंपरिक खेळांची आवड जोपासत त्यांनी पुढे पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण गुजराती हायस्कूलमधून पूर्ण केले. दहावीनंतर त्यांनी अकरावी विज्ञान शाखेला प्रवेश घेतला खरा, पण विज्ञान शाखेत रस नसल्याने त्यांनी बारावीला वाणिज्य शाखा निवडली. पुढे आजोळ असलेल्या बार्शीतील शिवाजी महाविद्यालयातून त्यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी बीए ‘शारीरिक शिक्षण’ विषयातून पूर्ण केले.


स्पर्धा परीक्षांमध्ये निराशा हाती लागल्यानंतर नांदेडमधून ‘बीपीएड’ पूर्ण केले. त्यानंतर दोन वर्षांत ‘एमपीएड’चे शिक्षणही पूर्ण केले. अर्थार्जनासाठी अमोल यांनी व्यायामशाळा सुरू केली. क्रीडा क्षेत्रात काही भरीव काम करण्याच्या उद्देशाने त्यांनी 2001 साली छत्रपती व्यायाम व क्रीडा प्रसारक मंडळाची स्थापना केली. याअंतर्गत त्यांनी गरजू, खेळांची आवड असलेल्या आणि होतकरू मुलासांठी नांदेडमध्ये सुट्ट्यांच्या कालावधीत भाड्याने मैदान घेऊन क्रीडा शिबीर घेण्यास सुरूवात केली. यामध्ये पाच ते 15 वयोगटातील मुलांना घोडेस्वारी, खोखो, कबड्डी, पोहणे, ‘ड्रिल अ‍ॅण्ड मार्च’ अशा विविध खेळांचे प्रशिक्षण दिले जाते. एखाद्या विद्यार्थ्याची परिस्थिती गरीब असली तरीही त्याला शिबिरात प्रवेश दिला जातो.


शिबिरात गट पाडले जायचे, जेणेकरून सांघिक भावना तयार होईल. तसेच, दर दोन दिवसांनी गट प्रमुख बदलला जातो. त्यामुळे प्रत्येकाला नेतृत्व करण्याची संधी मिळते. हंसराज वैद्य यांनीही अमोल यांना मैदान मोफत देत साहाय्य केले. 2003 साली आर्थिक परिस्थिती सावरण्यासाठी त्यांनी बँकेत नोकरी सुरू केली. 2007 पर्यंत नोकरी केली आणि नंतर मनसेत प्रवेश करत पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमात हिरीरीने सहभाग घेऊ लागले. नांदेड जिल्हा सचिवपदाची जबाबदारीही त्यांनी उत्तमरित्या सांभाळली. 2007 साली महापालिका निवडणूक लढवली पण पराभव पदरी पडला. पुढे काही वर्षात पुन्हा क्रीडा क्षेत्रात काम करण्यासाठी त्यांनी राजकीय कामांनाही विराम दिला.


व्यवसाय क्षेत्रात जम बसवण्यास अमोल यांनी सुरूवात केली. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना अनेक बरे-वाईट अनुभव आले. त्यानंतर त्यांनी त्यांच्या सहकार्‍यांच्या मदतीने गरीब विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरू केले. अगदी नाममात्र दरात सबनीस यांनी त्यांना इमारत उपलब्ध करून दिली. परंतु, पैशांअभावी दोन वर्षांतच हा उपक्रमही थांबला. सोशल मीडियाच्या साहाय्याने त्यांना सातारा, सांगली, सोलापूर याठिकाणी सुरू असलेल्या शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिरांविषयी माहिती दिली. मराठवाड्यात विशेषतः नांदेडमध्ये हे शिबीर तितके माहिती नसल्याने अमोल यांनी या शिबिराच्या आयोजनासाठी प्रयत्न सुरू केले.


‘बीपीएड’चे शिक्षण घेतल्याने अमोल यांना त्याविषयीची जुजबी माहिती होती. त्यांनी प्रथम मुलगी सई हिला पोवाड्यांसह शिवकालीन युद्धकलेचे धडे दिले. यानंतर पत्नी डॉ. सीमा यांनाही प्रशिक्षित केले. राहता येथील विजय मोगले यांच्या मदतीने त्यांनी पहिल्यांदा शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले. बंद पडलेल्या वसतिगृहाच्या टेरेसवर या शिबिराचे आयोजन करण्यात आले.शिबिरात लाठी, तलवार चालवणे, दांडपट्टा चालवणे अशा युद्धकलेचे प्रशिक्षण दिले जाते. इतिहासाचे संदर्भ, शस्त्रांविषयी माहिती, इतिहास आणि गनिमी कावा अशा अनेक गोष्टींची माहिती दिली जाते. नांदेडमध्ये पहिल्यांदाच हे शिबीर आयोजित करण्यात आल्यानंतर आता त्याला दिवसेंदिवस प्रतिसाद वाढत आहे. त्यांच्या पत्नी ‘एम.फील पीएच.डी’ असून सध्या त्या प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहे.


आधुनिकतेच्या जमान्यात जुन्या काळाशी सुसंगत व्यायामशाळा 2012 साली बंद करावी लागली. ‘स्वराज्य ट्रेडर्स’ नावाने त्यांनी व्यवसायातही आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. पारंपरिक व्यायाम प्रकारासाठी आवश्यक मुद्दलाची ते भारतभर विक्री करतात. विद्यार्थ्यांची शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक वाढीसाठी शिबिरे फायदेशीर आहेत. शहरात मैदाने कमी आणि दवाखाने जास्त झालेत. शाळेत तर मैदाने उरलीच नाहीत. त्यामुळे शाळेला मैदानाची सक्ती करण्याची मागणी अमोल करतात. अनेकांनी तलवार बघितलेलीही नसते. स्पर्श करायला घाबरणारा विद्यार्थी नंतर सफाईदारपणे तलवार चालवतो, तेव्हाचा आनंद अवर्णनीय असतो.


शिबिरामध्ये मुलींना प्रथम प्राधान्य दिले जात असल्याचे अमोल सांगतात.आई अरूणा, वडील अरविंद नलावडे यांच्यासह के. एस. जाधव यांचे अमोल यांना मोलाचे मार्गदर्शन लाभते. भविष्यात अमोल यांना भारतातील विविध युद्धकलांची माहिती घेऊन त्याचे मुलांना प्रशिक्षण देण्याची इच्छा आहे. तसेच, शिवकालीन युद्धकलेवर ‘पीएच.डी’ करण्याचीही त्यांची इच्छा आहे.
शिवकालीन युद्धकलेची पुढील पिढीला ओळख व्हावी, यासाठी धडपणार्‍या अमोल नलावडे यांना आगामी वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे मनःपूर्वक शुभेच्छा...




Powered By Sangraha 9.0