भारताच्या गरजा युरोप ठरवू शकत नाही; परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी ठणकावले

06 Dec 2022 12:29:17

जयशंकर
 
 
 
 
 
नवी दिल्ली : “युरोपीय महासंघाने रशियाकडून भारताच्या सहापट तेलाची आयात केली आहे. त्यामुळे भारताच्या ऊर्जा गरजांविषयी आणि रशियाकडून तेल आयात करण्याविषयी युरोपीय महासंघाने भारताच्या गरजा ठरवू नये,” अशा शब्दांत परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी ठणकावले आहे.
 
 
 
 
जर्मनीच्या परराष्ट्रमंत्री अ‍ॅनालेना बेअरबॉक या भारत दौर्‍यावर आल्या आहेत. त्यांनी सोमवारी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्यासोबत विविध विषयांवर चर्चा केली. त्याचप्रमाणे दोन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषदेसही संबोधित केले. यावेळी भारत रशियाकडून आयात करत असलेल्या तेलाविषयीच्या प्रश्नास उत्तर देताना परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर म्हणाले की, “युरोपीय महासंघाने फेब्रुवारी ते नोव्हेंबर या काळात दहा देशांच्या एकत्रित आयातीहून जास्त जीवाश्म इंधन आयात केले आहे. युरोपीय महासंघाची तेल आयात भारताच्या तेल आयातीपेक्षा सहापट जास्त आहे. नैसर्गिक वायू भारत आयात करत नाही. मात्र, युरोपीय महासंघाने तर रशियाकडून अनंतपट नैसर्गिक वायू आयात केला आहे. ‘रशिया फॉसिल फ्युएल ट्रॅकर’ या संकेतस्थळावर कोणता देश रशियाकडून किती आयात करत आहे, याची माहिती तेथे उपलब्ध आहे. त्यामुळे भारताची ऊर्जा गरज आणि भारताने कुठून ऊर्जा खरेदी करावी, हे सांगण्याचा अधिकार युरोपला नाही, असे एस. जयशंकर यांनी ठणकावून सांगितले आहे.
 
 
 
 
 
 
भारत आणि जर्मनीने ऊर्जा, व्यापार आणि हवामान बदलासह द्विपक्षीय सहकार्य अधिक दृढ करण्यावर तपशीलवार चर्चा केली आणि सर्वसमावेशक स्थलांतर आणि गतिशीलता भागीदारी करारावर स्वाक्षरी केली. ज्यामुळे लोकांना एकमेकांच्या देशात अभ्यास करणे, संशोधन करणे आणि काम करणे सोपे होईल. हिंद - प्रशांत महासागर क्षेत्र, युक्रेन संघर्ष, अफगाणिस्तानातील परिस्थिती, पाकिस्तानशी संबंधित मुद्दे आणि सीरियातील परिस्थिती यासह प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर दोन्ही देशांनी विचारविनिमय केला.
 
 
 
 
परराष्ट्रमंत्री एस जयशंकर म्हणाले की, “भारत आणि जर्मनी यांच्यातील दहा करारांवर स्वाक्षरी करणे हे अधिक समकालीन द्विपक्षीय भागीदारीच्या आधाराचे मजबूत संकेत आहे. त्याचवेळी, ज्या वेळी जग कठीण परिस्थितीचा सामना करत आहे, तेव्हा आपण एकत्र पुढे जाणे महत्त्वाचे आहे,” असे जर्मनीच्या परराष्ट्रमंत्री अ‍ॅनालेना बायरबॉक यांनी नमूद केले आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0