मुंबई : स्वराज्य भूमी कोकण महोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडलं. यावेळी बोलत असताना फडणवीस यांनी रिफायनरी प्रकल्पाबद्दल भूमिका मांडली. यावेळी रिफायनरी प्रकल्प कोकणात आणणार सांगताना ते म्हणाले, "कोकणी माणूस हा अतिशय सरळ आणि निर्मळ आहे. कोकणातील आंबा सर्वाधिक गोड आहे की माणूस. पण जर एखाद्याशी पंगा घेतला तर सोडत नाही. कोकणात एकही प्रदूषणकारी प्रकल्प आम्ही आणणार नाही." अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
पुढे बोलताना ते म्हणाले, "मी मुख्यमंत्री असताना कोकणासाठी अनेक योजना सुरू केल्या. पण अडीच वर्षात या सर्व योजना बंद झाल्या. पण मला आश्चर्य याचे वाटते की, ज्यांना कोकणाने भरभरून दिले त्यांच्या नेतृत्वात कोकणावर अन्याय झाला. पण चिंता करू नका आता कोकणाचे सुपुत्र मुख्यमंत्री आहेत आणि मी अर्थमंत्री आहे त्यामुळे कोकणचा विकास होईल." असं म्हणत फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला.
रिफायनरीबद्दल बोलताना फडणवीस म्हणाले, "पाच हजार एकर ग्रीनरी त्याच कॅम्पसमध्ये होईल अशी आम्ही रिफायनरी आणत आहोत. काही लोकांनी चुकीच्या पद्धतीने सांगितले. यांना कोकण मागास ठेवून राजकारण करायचे आहे. पण आम्ही कोकणाचा विकास करणार आहोत. नऊरत्नाची खाण असलेल्या कोकण भूमिका मी वंदन करतोय. कोकणचे सुपुत्र ज्यांना म्हणता येईल असे आमचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहे. कोकणाचे खरे दर्शन या महोत्सवानिमित्त आपल्याला पाहायला मिळत आहे. या महोत्सवाचा मूळ उद्देश हा कोकणचा विकास हा आहे. हा महोत्सव आयोजित करून विविध संकल्पना मांडण्याचा प्रयत्न केला." अस फडणवीस म्हणाले.