नैराश्यात तरुणांना प्रेरणा देण्यासाठी हा चित्रपट : दिगपाल लांजेकर

05 Dec 2022 19:04:42

pola
 
पोलादपूर : "हा एक आगळा वेगळा सोहळा आहे. शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्यासमोर जसाच्या तसा आणण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. मी जास्तीत जास्त संदर्भ आधार जोडून हा चित्रपट तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. शिवाजी महाराजांवर अनेक चित्रपट सध्या येतात कारण त्यातून नव्या पिढीला प्रेरणा मिळते. या चित्रपटातूनही ती प्रेरणा देण्याचा आमचा प्रयत्न आहे." असे दिग्दर्शक दिगपाल लांजेकर पत्रकारांशी बोलताना बोलले.
 
दिगपाल लांजेकरांच्या शिवाष्ट्कातील पाचवा चित्रपट ' सुभेदार ' तानाजी मालुसरेंच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाचा श्रीगणेशा करण्यापूर्वी संहितेचे पूजन त्यांच्या जन्मगावी आणि कर्मभूमीवर करण्यात आले. या सोहळ्यासाठी चित्रपटातील मुख्य भूमिका साकारणारे कलाकारही उपस्थित होते. अभिनेता अजय पुरकर या चित्रपटात तानाजीच्या भूमिकेत दिसत आहेत तर अभिनेता समीर धर्माधिकारी शेलार मामांची भूमिका करत आहेत. अभिनेत्री स्मिता शेवाळे सावित्री म्हणजे तानाजीच्या पत्नीची भूमिका करत आहेत.
 
 
 
अजय पुरकर आपल्या भूमिकेबद्दल बोलताना म्हणाले, "मी तानाजीची भूमिका केली आहे. परंतु या चित्रपटाच्या माध्यमातून तानाजीचे अंतरंग साकारायचे आहे, त्यामुळे या चित्रपटासाठी मला विशेष तयारी करावी लागली. वजन कमी करावे लागले, सिन वाचताना मनाला भिडतात त्यामुळे जीव तोडून मेहेनत करावीशी वाटते. या सर्व प्रक्रियेत मालुसरे कुटुंबीयांची मोलाची साथ लाभली."
 
समीर धर्माधिकारी मामांची भूमिका साकारत आहेत, त्यांनी तेवढ्याच मायाळू भाषेत मामांचे व्यक्तिमत्व सांगितले. "शेलार मामा म्हणजे माया. मामा आपल्या भाचरांवर जशी माया करतो तशी माया हा मामा तानाजीवर करतो. तेवढा भक्कम आधार मी आहे. दिगपाल जसा आमच्यासाठी आहे तसा मी या चित्रपटात तानाजीच्या पाठीशी आहे."
 
अभिनेत्री स्मिता आपल्या भूमिकेविषयी बोलताना म्हणाली, "ही भूमिका साकारणं आव्हानात्मक असेल. सगळ्यांनी मिळून भाषेचा लहेजा ठरवावा लागेल, या चित्रपटातून नेमकी भूमिका मला करता येन महत्वाचं वाटतं. आज माझ्या मुलाला या इतिहासाबद्दल काही माहिती नाही. तो पुस्तकं वाचत नाही. त्याच्यासमोर मला ही कलाकृती ठेवायची आहे तर त्या भूमिकेला तेवढा न्याय देणं मला गरजेचं वाटतं."
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0