0
भगवद्गीता जिहाद शिकवते, असे जावई शोध लावणाऱ्यांसोबत तुमचं इलू इलू ही मर्दानकी आहे का?
आशिष शेलारांचा उद्धव ठाकरे गटाला सवाल
मुंबई : "कानडी मुख्यमंत्री सीमाभागासाठी लढतात, महाराष्ट्रांच्या गावांवरही दावा ठोकतात. इथे महाराष्ट्र सरकारचे शेलारमामा नेभळटासारखे फक्त अरे ला कारे बोलत आहेत." या टीकेला प्रत्युत्तर देताना भाजप नेते आशिष शेलार यांनी एक पत्रक काढून उ. बा. ठा. गटाचा चांगलाच समाचार घेतला आहे. आशिष शेलार यांनी म्हटले की, " 'कर्नाटकने आरे केले तर आम्ही कारे करु' हा महाराष्ट्राने दिलेला इशारा यांनी नेभळट ठरवला... वा रे मर्दा."
"मुळात विरोधी पक्षाने नरसिंह अवतार धारण करण्यासाठी, या अवताराला बोलावण्यासाठी एका "प्रामाणिक" भक्त प्रल्हादाची गरज असते. तुमच्याकडे नारायण..नारायण जप करणारा भक्त प्रल्हाद आहे का? तुमच्याकडे आता भक्तप्रल्हाद ही नाही, नारायण ही नाही. आणि हो, तुमच्यात आता रामच उरलेला नाही. कधी काळी राम मंदिर आणि राम वर्गणीची खिल्ली उडवली होतीस ना? आता भक्तप्रल्हाद होऊ पाहताय?" असे सवाल आशिष शेलार यांनी ठाकरे गटाला केला आहे.
श्रद्धाच्या हत्येवर साधी हळहळही नाही, याविषयी बोलताना शेलार म्हणाले, "तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वशंजाकडे पुरावे मागता, तो काय तुमचा मर्दपणा होता का ? प्रभू राम झालाच नाही... भगवत गिता जिहाद शिकवते असे महान जावई शोध लावणाऱ्या काँग्रेस सोबत इलू इलू जे तुमचे सुरु आहे, ती मर्दानकी आहे का?"
"अहो महाराष्ट्रातील श्रध्दा वालकर नावाच्या लेकीचे 35 तुकडे केले जातात तेव्हा जो पक्ष साधी हळहळ सुध्दा व्यक्त करीत नाही ना, त्याला नेभळटपणा म्हणतात. देशाचे तुकडे करायला निघालेल्या पीएफआयवर आमच्या सरकारनेबंदी घातल्यानंतर त्याचे साधे समर्थन ही न करणे हे नेभळटपणाचे लक्षण नाही का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वातंत्र्य लढ्यात योगदान काय? हा प्रश्न विचारणे म्हणजे तुम्हाला मर्दानकी वाटते काय? असा सवाल शेलार यांनी यावेळी उपस्थित केला.