लासलगावात ‘लव्ह जिहाद’ विरोधात हिंदू संघटना आक्रमक

04 Dec 2022 17:14:06
 
लासलगाव
 
 
 
 
लासलगाव : नाशिक जिल्ह्यातील लासलगावमध्ये शनिवारी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, रा. स्व. संघ, सनातन संस्था, बाबा अमरनाथ सोशल ग्रुप आणि सकल हिंदू समाजाच्यावतीने ‘लव्ह जिहाद’ विरोधात विराट हिंदू मूक मोर्चा काढण्यात आला. ‘लव्ह जिहाद’, ‘धर्मांतर बंदी कायदा’ राज्यासह देशभरात लागू करण्यात यावा, श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताब पूनावाला या नराधमाला फाशीची शिक्षा देण्यात यावी, गोवंश हत्या बंदी कायद्याची कठोर अंमलबजावणी व्हावी, त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजीमहाराजांचा अवमान करणार्‍या प्रत्येक व्यक्ती, संघटना, राजकीय पक्षावर कठोर कारवाई करण्यात यावी, यांसह विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला.
 
 
लासलगावमधील विविध हिंदू संघटनांच्यावतीने महंत जनेश्वर महाराज, भारत माता आश्रम बोकडदरे, निशा पाटील भिरूडे यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील बाबा अमरनाथ मंदिर, एसटी डेपो येथून सकाळी 11 वाजता मूक मोर्चास प्रारंभ झाला. यावेळी विविध राजकीय पक्ष, हिंदू संघटना मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चात महिला व युवतींचा सहभाग लक्षणीय होता. विविध मागण्यांचे फलक घेऊन मोर्चेकरी भगवे ध्वज, भगव्या टोप्या आणि गळ्यात मफलर परिधान करून सहभागी झाले होते. छत्रपती शिवाजी महाराज चौकात मागण्यांचे निवेदन लासलगाव पोलीस ठाण्याचे साहा. पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांना सकल हिंदू समाजाच्यावतीने देण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज चौकात सामूहिक राष्ट्रगीतानंतर या मोर्चाचा समारोप करण्यात आला.
 
 
 
Powered By Sangraha 9.0