या लेखाच्या आजच्या उत्तरार्धात फुटबॉलच्या माध्यमातून स्वामी विवेकानंदांनी सांगितलेले गीतासार आणि फुटबॉलविषयी अशाच काही रंजक गोष्टींची माहिती करुन घेणार आहोत.
धुरंधरांचे फुटबॉल प्रेम..
सगळ्या मैदानी क्रीडाप्रकारात (इन डोअरची सुविधा असली तरी तो क्रीडाप्रकार शेवटीएक ’मैदानी’च) फुटबॉल लोकमान्य होता, आहे व असेलही. या फुटबॉलच्या भारतीय स्वातंत्र्यपूर्व काळाबद्दल वाचन करत असताना मला समाजकारणातली दोन धुरंधर व्यक्तिमत्त्वं आठवत होती, ती म्हणजे स्वामी विवेकानंद, आणि महात्मा गांधी. स्वामी विवेकानंद म्हटले की, पश्चिम बंग डोळ्यापुढे येते. बंगाली बाबू विलक्षण फुटबॉलवेडा. विवेकानंदांबद्दल बोलण्याअगोदर मला आठवते ती आमची जनजाती कल्याण आश्रमाच्या खेलकूद आयामाची पश्चिम बंगमधील सालबाडी येथील २०१९ जूनची भेट. रोज आम्ही तेथील कोणत्या ना कोणत्या वाड्या-वस्त्यांना स्थानिक कार्यकर्त्यांबरोबर भेट देत असू. अशा प्रत्येक ठिकाणी जाण्यासाठी बाहेर पडलो की मुलं-मुली खेळताना दिसत. ते सगळे एकजात फुटबॉल खेळतानाच दिसायचे, क्वचित चुकूनमाकून एखाद्या ठिकाणी बॅट-बॉल दिसायचा. तेव्हा पाऊस होता तरी आम्ही गेलो होतो तेथेही पावसात चिखल पाण्यात ती मुलं-मुली स्वच्छंदीपणे फुटबॉल खेळत होती. त्यांना बघताच आमच्यातल्या काही जणांना राहावलं नाही आणि आम्ही त्यांच्यात थोडावेळ फुटबॉल खेळून घेतले. असो.
कोलकात्यातील तो एक सामना...
स्वातंत्र्यपूर्व काळातील ही घटना आहे. कोलकात्यातील फुटबॉलप्रेमी आणि देशप्रेमी बंगाली बाबूंनी जनसामान्यावरील होणार्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठीच खेळण्याचं ठरवलं आणि त्यांनी त्यांच्या फुटबॉल खेळातून त्यांच्यामधील विद्रोह दाखविण्याचा निर्धार केला. कोलकातामधील या ऐतिहासिक फुटबॉल सामना बघण्यासाठी तेव्हा लोक खूप दूरवरून आले होते. एवढंच नव्हे, तर ‘ईस्ट इंडिया’ कंपनीला भारतीय फुटबॉल चाहत्यांना लोहमार्गे आणण्यासाठी एका विशेष गाडीची मागणीही याच संघातर्फे करण्यात आली होती. स्वातंत्र्य लढ्यात प्राणपणाने लढण्याची तयारी तेव्हा सगळे दाखवत होते, यात कोणीच मागे नव्हते. शेतकरी, मजूर आणि अगदी क्रीडापटूही. तेव्हाच्या त्या सामन्यात नेत्रदीपक असा विजय प्राप्त केला होता आणि इतिहासातून पुढच्या अनेक पिढ्यांसाठी एक आदर्श घालून दिला होता. ‘ईस्टर्न यॉर्कशीप रेजिमेंट विरुद्ध मोहन बगान’ असा तो सामना होता. त्या काळातील ६० हजार भारतीय प्रशंसक तो सामना बघताना आनंदाने भारावून गेले होते. त्यांचा आनंद त्यांच्या चेहर्यावरती झळकत होता.
फुटबॉलच्या माध्यमातून स्वामी विवेकानंदांचे गीतासार...
स्वामी-भगवद्गीता-फुटबॉल हे अनोखे त्रिकूट म्हणजे पश्चिम बंगसहीत आपल्या समस्त क्रीडाजगताला मिळालेली एक मेजवानीच जणू. स्वामी विवेकानंद हे शालेय विद्यार्थ्यांसमोर कोलकात्यातील एका समारंभात (बहुदा तो शाळेचा क्रीडा महोत्सव असावा) आपले विचार प्रकट करत होते. त्यावेळी फुटबॉल आणि श्रीमद्भगवद्गीता यांचा विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत होणार्या उपयोगाबद्दल सांगून गेले होते. श्रीमद्भगवद्गीतेकडे फक्त ऐहिक, पारलौकिक, आध्यात्मिक, धार्मिक अशा साचेबद्ध दृष्टिकोनातून न बघता त्याचा युवकांच्या फुटबॉलसारख्या खेलकूदशी निगडित अन्य क्रीडाप्रकाराबद्दलही बघितले पाहिजे. स्वामी विवेकानंदांनी बरोबर तेच मर्म उपयोगात आणत फुटबॉलच्या माध्यमातून युवकांची व राष्ट्राची उन्नती करण्यासाठी त्याचा सुयोग्य वापर केला. त्या गीतेबद्दल आत्ता येथे सांगायचे झाले, तर मार्गशीर्ष शुद्ध एकादशीला श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली तो ’गीते’चा जन्मदिवस ३ डिसेंबरच्या शनिवारी आपण समस्त हिंदूंनी साजरा केला.
अनेकजण गीता पाठ करतात, वाचतात, ऐकतात. पण, तेवढ्यानेच भागणार नाही. तिचा अर्थ जाणून, उमजून आपल्या आयुष्यात उतरविणे, गीतेतील एखादा योग आचरणात आणणे महत्त्वाचे असते. गीता ही फुटबॉलसहीत सगळ्याच क्रीडापटूंना आपल्या आयुष्यातील जय-पराजयाला कसे स्वीकारायचे हे सांगते. खेळाडू शारीरिक व मानसिकदृष्ट्या अत्यंत बलिष्ठ होण्यासाठी गीता मार्गदर्शक ठरते. आपल्या गुणांनुसार स्वभावतःच आपल्या वाट्याला आलेले किंवा आपण निवडलेले कर्म आपण कर्तव्यबुद्धीने कसे पार पाडतो, हे समजावून देताना आपण मनाची एकाग्रता वाढवण्यात गीता उपयोगी पडते. फुटबॉलच फक्त नव्हे, तर कोणत्याही क्रीडा स्पर्धेत मनासारखा खेळ नाही झाला, तर छोट्या छोट्या गोष्टींतून निर्माण होणारे नैराश्य, त्यातून उत्पन्न होत हवीशी वाटणारी, पण अंतिमतः लाभदायक नसलेली व्यसनाधीनता यावर गीतेत समर्पक उतारे आढळतात. नीति-अनीति न बघता खेळताना आपण काय करत आहोत, नियमांना डावलून मैदानावर केलेली कृती, आपण काय खातपित आहोत, आपली ऋतुचर्या, दिनचर्या कशी आहे या व अशा गोष्टींवर आपले यशापयश अवलंबून असते.
आपण नित्यनियमित व्यायाम आपलं शरीर तंदुरुस्त राखलं, शरीराला पोषकाहार घेतला, सकाळी लवकर उठून रात्री लवकर वेळेवर झोपलं, वेळच्यावेळी सगळं आवरलं तर वेळेचे व्यवस्थापन आपल्याला ज्या क्षेत्रात भरारी घ्यायची आहे, ते आपण सर्व शक्तिनिशी करू शकतो. आयुष्यात अनपेक्षित गोष्टी घडल्याने आपण दु:खी होतो. गीता हेच सांगते की, तुम्ही सर्व शक्तीनिशी प्रयत्न करा, तुम्हाला यश नक्की मिळेल, नाहीतर दु:खी न होता त्या घटनांचे विश्लेषण करा, चुका दुरूस्त करत, पुन्हा प्रयत्नशील व्हा. दुःखी होत प्रयत्न सोडू नका. फुटबॉल हा सामूहिक खेळ आहे. गटाला सोबत घेऊन खेळत असल्यामुळे सर्वांना एकत्र घेऊन काम करण्याची सवय लागते. आपला फुटबॉलसारखा खेळ हा सांघिक खेळ असून त्यातील यश हे आपल्या एकट्याचं नसून ते संघभावनेने प्राप्त केलेले असल्याने त्यात अनेकांचा वाटा आहे, हे ध्यानात ठेवा, असे भाव मनी ठेवलेत, तर आपल्यात अहंभाव येणार नाही, अन्यथा ध्येय तुमच्यापासून दूर जात राहील.
स्वर्ग-नरक, ऐहिक सुखांबद्दलच फक्त गीता सांगते असे नाही किंवा जनमानसापासून दूर अरण्यात राहणार्या तपस्वी लोकांबद्दलच गीता सांगते असे नाही. स्वामी विवेकानंद हे शालेय विद्यार्थ्यांसमोर कोलकात्यातील एका समारंभात आपले विचार प्रकट करत होते. त्यावेळी फुटबॉल आणि श्रीमद्भगवद्गीता यांचा विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत होणार्या उपयोगाबद्दल सांगून गेले होते. ते म्हणाले होते की, “फुटबॉल खेळल्यावर तुम्ही स्वर्गप्राप्तीच्या जवळ जाता आणि श्रीमद्भगवद्गीता शिकलात व ती अंमलात आणायचा प्रयत्न केलात, तर अशा प्रकारे तुम्हाला स्वर्ग प्राप्त केल्याचे समाधान प्राप्त होईल.” फुटबॉल हे एक उदाहरण म्हणून घेताना स्वामींनी सगळ्याच क्रीडा प्रकारातील खेळाडूंना मार्गदर्शनपर भाषणात मोलाचे ज्ञान देऊ केले आहे, असा हा योगी पुरुष फुटबॉलकडे फक्त एक क्रीडाप्रकार म्हणून न बघता फुटबॉल आपल्याला स्वर्गीय आनंद कसा देतो, हे सांगत असायचा. शालेय स्तरापासून हा नरेंद्र दत्त एक फुटबॉलपटू म्हणून आपली एक वेगळी ओळखही देऊन गेला आहे. तसे म्हटले तर पश्चिम बंगालची ‘फुटबॉल पंढरी’ म्हणून ओळख आहे. त्या लोकप्रिय खेळाचा हा खेळाडू फुटबॉलच्या प्रतिथयश अशा मोहन बगान या ’क्लब’चा ज्येष्ठ सभासदही होता. त्याच दि. १५ ऑगस्ट, १८८९ साली स्थापन झालेल्या ’मोहन बगान अॅथलेटिक क्लब’च्या स्मृतिप्रीत्यर्थ भारत सरकारने मोहन बगान वर टपाल तिकीट काढले होते. हा नरेंद्र काही सामने या संघाकडून खेळला आहे.
फुटबॉल’ने घडवलेले स्वामी...
युवकांना गीता आणि फुटबॉलचे परस्परसंबंध समजायला जेव्हा विवेकानंद लागले तेव्हा त्यातील एका युवकाने निश्चय केला की गीता आत्मसात करण्याच्या योग्यतेचा मी होऊन दाखवीन. त्या युवकाने फुटबॉल आणि शारीरिक व्यायाम व योग साधनेद्वारे स्वतःला बलशाली बनवले आणि समाज व देशसेवेत आपल्याला वाहून घेतले. सहा महिन्यांनंतर तो युवक स्वामी विवेकानंदांना नमस्कार करण्यास गेला. त्यावर प्रसन्न होऊन ते म्हणाले की, आता तू खरोखरच गीता समजून घेतली आहेस. स्वामींनी त्या युवकाला आपल्याजवळ आश्रमात ठेवून घेतले आणि दिक्षा देताना त्याला सांगितले ‘सुनो युवक! गीता, वीरों और त्यागियों का महाग्रंथ हैं। इसलिए जो व्यक्ती वीरत्व और सेवा भाव से भरा नहीं होगा, वह गीता के गूढ़ श्लोकों को और कृष्ण-अर्जुन संवाद का रहस्य नहीं समझ सकता और न ही वास्तविक जीवन से उसका निहितार्थ समझ सकता हैं।’ ज्या युवकाने विवेकानंदांकडून अशी दिक्षा घेतली त्याने कोलकात्यात ’गीता प्रचार मंडळा’ची स्थापना केली आणि गीतेवरील काव्यादी विचारांचे बंगालीत भाषांतर केले व त्याचा प्रचार व प्रसार तो करू लागला; त्या बंगाली फुटबॉल खेळाडूचे व श्रीमद्भगवद्गीताप्रेमी युवकाचे नाव होते सतेंद्र बॅनर्जी.तर असे हे बॅनर्जी, डे, राय, दास हे तिकडचे म्हणजे बंगालचे झाले. तसा मोहन बगानही आपण बघितला आता आपण ’मोहन’दास स्मरु.
असाही एक महात्मा...
आफ्रिका, महात्मा हे शब्द ऐकले की मोहनदास करमचंद गांधी हे नाव आपल्या तोंडी येते. पण, आफ्रिकेतील एक फुटबॉलपटूदेखील महान काम करत त्या जनतेत तो ‘महात्मा’ ठरत आहे. सादिओ माने या नावाचा आफ्रिकेतल्या सेनेगल येथील एका गावात जन्मलेला एक फुटबॉलपटू. त्याच्या पायातले बूट आणि त्याचा मोबाईल बघितल्यावर आपला विश्वासच बसणार नाही की हा खेळाडू आपल्या खेळाने सगळ्यांना मंत्रमुग्ध करून टाकत असेल आणि तो आपल्या खेळाद्वारे महिन्याला कित्येक कोटी रुपये कमवत असेल. एवढे पैसे आहेत, तर बूट बदलत का नाही व नवा मोबाईल का घेत नाही? यावर त्याचा विचार आहे की, “मी माझ्या बूट व फोनपेक्षा जास्त आपल्या देशातील गरिबांकडे आणि माझ्या क्रीडा नैपुण्यावर अधिक लक्ष देतो.” आपल्या मुलाखतीत तो अभिमानाने सांगत असतो की, “मी याप्रमाणे हजारो फोन विकत घेऊ शकतो.
परंतु, मला दहा फेरारीस, दोन जेट विमाने आणि २० डायमंड घड्याळांची खरंच गरज आहे का? मला या सगळ्याची काय आवश्यकता आहे? मी गरिबी पाहिली आहे. मला शाळेत जाता आले नाही. हेच कारण आहे की, मी माझ्या देशात शाळा बांधल्या, ज्यामुळे माझ्या देशातील मुलांना अभ्यास करणे शक्य होईल. त्याचबरोबर मी फुटबॉल स्टेडियमदेखील तयार केले आहे. ज्याचा येथील मुलांना फायदा होईल.” सादिओ माने कुठूनतरी मिळालेले, टाकून देण्याच्या अवस्थेला आलेले बूट घालून एक युवक तेथे चालू असलेल्या फुटबॉलच्या क्रीडाशिबिरात जाऊन तेथील प्रशिक्षकांना जाऊन भेटला आणि ‘मलापण खेळायला घ्याल का...’ असा हट्ट धरून बसला होता. त्या प्रशिक्षकाने, “बरं, ठीक आहे, दाखव बरं मला तू कसं फाटक्या बूटांनी खेळतोस ते.” असे ऐकता सादिओ माने आपले कौशल्य दाखवत राहिला अन् सगळे अचंबित राहिले. फुटबॉलच्या माध्यमातून करणारा एक समाजसेवक तेथे तयार झालेला आपल्याला दिसतो.
भारताला संधी कधी?
भारताला ‘फिफा’ विश्वचषकात खेळण्याची संधी कधी मिळेल? आपले क्रीडाप्रेमी किती वेळ ताटकळत राहणार? आपल्या संघाचे वाट बघणे कधी संपणार, का अजूनही ’आप कतार में हैं, कृपया प्रतीक्षा करें..’ हेच ऐकत बसायचं? काही दिवसांपूर्वीचे ’आप कतार मे हैं’ हा एका वृत्तपत्रात वाचलेला मथळा माझ्या मनात घर करून बसला होता. त्या मथळ्यात ’कतार’ म्हणजे आखाती देशातील ‘फिफा’ विश्वचषकाच्या स्पर्धा सुरू होण्याआधाची उलटी मोजणी संपायचा प्रतीक्षेशी निगडित असलेला तो देश होता. नाही म्हणायला १९५०च्या ब्राझीलच्या फुटबॉल विश्वचषकात कसा का होईना, पण आपला नंबर लागला होता. पण, सहभागी मात्र होता आलं नव्हते. त्या पहिल्यावहिल्या विश्वचषकात खेळण्याच्या संधीबाबत दोन कथा सांगितल्या जातात.
असे सांगतात की, विश्वचषक पात्रता फेरीतल्या भारताच्या गटात भारतासोबत बर्मा (म्यानमार) आणि फिलिपाईन्स हे देश होते. पण, बर्मा आणि फिलीपाईन्सने पात्रता फेरीमधून आपली नावं मागे घेतली. त्या परिणामस्वरूप ब्राझीलमध्ये भारत न खेळताच पात्र झाला होता. तो चषक मिळवण्याच्या स्पर्धेत भारतीय संघ ब्राझीलमध्ये दाखलही झाला होता. पण, आंतरराष्ट्रीय संघटनेने भारताला परवानगी दिली नाही. त्यासाठीचा ‘फिफा’च्या नियमाने भारतीय खेळाडूंचे पाय खेचले. खेळाडूच्या पायात खेळाचे बूट असल्याखेरीज खेळता येणार नाही, या नियमाकडे दुर्लक्ष झाले. भारतीय खेळाडूंना अनवाणी फुटबॉल खेळायचं होतं. पण, ‘फिफा’ला ते मान्य नव्हतं. त्या काळात बरेचसे फुटबॉलपटू पायावर जाड पट्टी गुंडाळून खेळायचे.
पुण्यात शिक्षण घेतलेला गेला बेल्जियम संघाबरोबर..
जरी एखादा भारतीय, फुटबॉल खेळाडू म्हणून ‘फिफा’ विश्वचषक स्पर्धेत उतरुन भारताचे प्रतिनिधित्व करू शकला नसला तरी ४८ वर्षांच्या एका भारतीयाने ‘फिफा’ विश्वचषक स्पर्धेत सहभागी होण्याची कामगिरी बजावली आहे. पुण्यातील ‘कैवल्यधाम योग प्रशिक्षण केंद्रा’तून शिक्षण घेतलेला विनय मेनन हा बेल्जियम संघाचा योग प्रशिक्षक म्हणून ‘फिफा’ विश्वचषक स्पर्धेत सहभागी झाला होता. बेल्जियम संघाचा हा प्रशिक्षक शरीर, मन, आत्मा याचे संतुलन राखण्याचे कार्य प्रत्येक बेल्जियम फुटबॉलपटूला शिकवत त्यांना सक्षम करत त्यांच्या कामगिरीला वृद्धिंगत करण्याचे काम करत होता. एर्नाकुलम जवळील चेराई नावाच्या गावचा विनय मेनन याने पुदुच्चेरी विश्वविद्यालयातून शारीरिक शिक्षण अभ्यासक्रमातून ‘एम्.फील’ ही पदवी प्राप्त केली आहे. दुबई येथील एका पंचतारांकित रिसॉर्टमध्ये योग प्रशिक्षक म्हणून कार्य केलेल्या विनय मेनन याने योग’द्वारे अनेक विदेशी फुटबॉल संघांना आपली सेवा देऊ केली आहे.
आपल्या वरिष्ठांचे विचार..
राज चौधरी आणि प्यारेलाल चौधरी या दोन बंधूंनी आपले जीवन क्रीडा क्षेत्राला वाहून घेतले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातील हे बंधू. त्यापैकी क्रीडा भारतीचे मंत्री राज चौधरी यांचे प्यारेलाल चौधरी हे धाकटे बंधू. प्यारेलाल चौधरी यांच्याकडे, पुणे जिल्हा फुटबॉल संघटनेचे उपाध्यक्षपद आणि खजिनदार पद, ‘वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन’ जॉ. सेक्रेटरी पदाबरोबरच महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे सदस्य असे दायित्व आहे, अशा प्रसिद्ध असलेल्या प्यारेलाल चौधरी यांचे विचार जाणून घेण्याची संधी मला मिळाली होती. प्यारेलाल सांगत होते की, जागतिक क्रमवारीत आपण बरेच खाली आहोत हे जरी आपण मान्य केले तरी आता ‘एआयएफएफ’चे पदाधिकारी जवळ जवळ सर्व फुटबॉल खेळाडू झाले असून काही बदल अपेक्षित आहेत.
राष्ट्रीय व राज्य स्तरीय वादंग आता राहिले नसून नवीन कमिटी आल्यावर सुरळीत कार्यभार चालू आहे.देशातील सर्व राज्यांना फुटबॉल प्रशिक्षण साठी २४ लाख प्रती राज्य देण्यात आले आहे.देशाच्या क्रमवारीत बंगाल, केरळ, गोवानंतर महाराष्ट्राचा नंबर लागतो. परंतु, आता यामध्येही बदल दिसू लागला आहे. कोलकत्ता जशी फुटबॉल पंढरी आहे तशी महाराष्ट्राची फुटबॉल पंढरी कोल्हापूर आहे. कोल्हापुरात लीग मॅचेसला ३० हजार फुटबॉलप्रेमी जमतात.
महाराष्ट्रात मुंबई, पुणे, कोल्हापूर, नागपूर, ठाणे या शहरात फुटबॉल चांगल्या पद्धतीने खेळला जात आहे. प्यारेलालजी सांगतात तसे आपण खरंच मनावर घेतले, तर आगामी एक-दोन विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत आपला भारत नक्कीच उतरलेला दिसेल. आज ना उद्या हॉकीसारखे फुटबॉलमध्येही भारत अग्रेसर होताना दिसेल. अपार संयम, सहनशीलता, चिकाटी, सोशिकपणा हे गुण फुटबॉलपटूंना गरजेचे असतात ते आपण अंगी बाणवले, तर सुनील छेत्रीसारख्या फुटबॉल पटूंचे स्वप्न आपण नक्की प्रत्यक्षात उतरवू, ही आम्हाला खात्री आहे. ‘इंडियन सुपर लीग’ सध्या आपले युवक गाजवत आहेतच. ही व्यावसायिक स्पर्धा गाजवत आपली उन्नती करताना दिसणारे युवक कधी पटकन भारताचे नाव विश्वचषकावर कोरतील, हे कळणारही नाही. त्यासाठी आपण या भारतीय युवकांना शुभेच्छा देऊ.
श्रीपाद पेंडसे
(लेखक जनजाती कल्याण आश्रम, पश्चिम महाराष्ट्र प्रांत खेलकूद आयाम प्रमुख आहेत.)