जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ व थोर मानवतावादी विचारवंत ‘पद्मविभूषण’ डॉ. रघुनाथ माशेलकर यांचा आज रविवार, दि. १ जानेवारी रोजी ८१व्या वाढदिवस. त्यानिमित्ताने त्यांच्या यशस्वी कारकिर्दीचा अल्पपरिचय करुन देणारा हा लेख...
लेखाचे शीर्षक वाचून जरा वेगळं वाटेल, पण खरं सांगायचं तर काही घटना या स्वप्नवत वाटाव्या अशाच घडतात. आपण जरी निमित्तमात्र असलो तरी ती घटना कायमस्वरूपी आनंद देणारी असते. असाच अनुभव डॉ. माशेलकर सरांना भेटल्यावर कायम येतो. गेली सहा दशके ज्यांनी आपले आयुष्य विज्ञान आणि समाजाच्या सेवेसाठी समर्पित केले आहे, असे ज्येष्ठ संशोधक, शास्त्रज्ञ, पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर सर वयाची ८० वर्ष पार करून ८१व्या वर्षांत पदार्पण करत आहेत. सहस्त्रचंद्रदर्शन पाहणारे सर आजही सतत कार्यमग्न आहेत आणि त्यांची प्रत्येक कृती प्रेरणादायी आहे. म्हणूनच म्हणावेसे वाटते की, दुर्दम्य आशावाद म्हणजे डॉ. माशेलकर!
डॉ. रघुनाथ माशेलकर यांची ओळख वैज्ञानिक अशी आहेच, पण ते केवळ वैज्ञानिकच नाही, तर एक विचारवंतदेखील आहेत. गांधींजींवर आधारित ’टाईमलेस इंस्पिरेटर’ हे पुस्तक संपादित करणार्या डॉ. माशेलकरांनी सतत तरुणांना प्रेरणा देण्याचं काम केले आहे. प्रचंड ऊर्जेचेधनी असलेल्या सरांची याही वयात सतत नवनवीन काहीतरी करण्याची जिद्द बघून अचंबित व्हायला होते. डॉ. माशेलकर हे आज भारतातील आघाडीच्या १२ संशोधकांपैकी एक. त्यांना उद्योगक्षेत्र, शिक्षणक्षेत्र आणि सरकार यांच्याकडूनही तितकाच मान मिळतो. ‘टाटा’ समूहापासून ‘रिलायन्स’ समूहापर्यंत अनेक आघाडीच्या कंपन्यांच्या संचालक मंडळावर ते तज्ज्ञ संचालक आहेत. जगातील ३५ हून अधिक विद्यापीठांनी त्यांना ‘डॉक्टरेट’ दिली आहे. ‘माशेलकर समिती’ या नावाने ओळखल्या जाणार्या १२ वेगवेगळ्या ज्वलंत प्रश्नांवरील समित्या त्यांच्या अध्यक्षतेखाली नेमून सरकारने त्यांच्यावर विश्वास दर्शवला आहे.
दि. १ जानेवारी, १९४३ रोजी गोव्यातल्या एका लहानशा माशेल या गावात डॉ. रघुनाथ माशेलकरांचा जन्म झाला. त्यांना सर्वजण लहानपणी लाडाने रमेश म्हणत. डॉ. माशेलकर सहा वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांना देवाज्ञा झाली. कालांतराने डॉ. रघुनाथ माशेलकर आई अंजनी माशेलकरांसोबत मुंबईत स्थायिक झाले. गिरगावातील एका चाळीत ते राहू लागले. महापालिकेच्या शाळेत शालेय शिक्षण सुरू झाले. त्यावेळी त्यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. एका भाषणात डॉ. माशेलकरांनी आपल्या लहानपणीचा एक प्रसंग सांगितला आहे. त्यावरून आपल्याला त्यांच्या परिस्थितीची कल्पना येऊ शकते. सातवी उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना युनियन हायस्कूलमध्ये प्रवेश घ्यायचा होता. पण, त्यांच्याकडे प्रवेश घेण्यासाठी पैसे नव्हते. प्रवेशासाठी लागणारी रक्कम फक्त २१ रुपये होती, पण ती गोळा करण्यासाठी त्यांना अनेक कष्टांना सामोरे जावे लागले. शेवटी त्यांच्या आईने एका मोलकरणीकडून २१ रुपये उसने घेतले आणि त्यांना शाळेत प्रवेश मिळाला.
लहानपणापासून फक्त गणित आणि विज्ञानच नाही, तर त्यांना इतर विषयातील पुस्तकांच्या वाचनाची प्रचंड आवड होती. वयाच्या या टप्प्यावर असतानासुद्धा आजही सतत वाचन सुरू आहे. लहानपणी पुस्तकं विकत घेण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते, गिरगावातील ‘मॅजेस्टिक बुकस्टॉल’मध्ये जाऊन ते पुस्तकं उसनी घेत आणि तिथंच वाचून परत करत. डॉ. माशेलकर बोर्डाच्या परीक्षेत राज्यात ११वे आले होते. पण, पुढील शिक्षण कसं घ्यायचं, हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला. शिक्षण सोडण्याचादेखील विचार त्यांच्या मनात येऊन गेला. पण, त्यांच्या आईनं त्यांना धीर दिला. त्याबरोबरच ‘सर दोराबजी टाटा ट्रस्ट’ची स्कॉलरशिप त्यांना मिळाली आणि त्यांनी जय हिंद कॉलेजमध्ये पुढील शिक्षण घेतलं.
डॉ. माशेलकरांच्या रूपाने एका शास्त्रज्ञाचा प्रवास सुरू होता. मुंबईतल्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी’मध्ये ‘केमिकल इंजिनिअरिंग’ला त्यांनी प्रवेश घेतला. ‘केमिस्ट्री’मध्ये त्यांनी ‘पीएच.डी’देखील मिळवली. त्यांच्या या कार्याकडे पाहून त्यांना लंडनच्या सॅलफोर्ड विद्यापीठाची शिष्यवृती मिळाली. ती शिष्यवृत्ती घेत डॉ. माशेलकर लंडनमध्ये असताना राष्ट्रीय रसायन शाळेचे (छउङ) संचालक डॉ. बी. डी. टिळक यांनी एक निरोप पाठवला. ‘काउंसिल ऑफ सायंटिफिक अॅण्ड इंडस्ट्रियल रिसर्च’चे (उडखठ) महासंचालक डॉ. नायुदम्मा यांना जाऊन भेटा, असे त्यांनी म्हटले होते. टिळकांच्या सांगण्यानुसार, ते नायुदम्मा यांना जाऊन भेटले. “तुम्ही भारतामध्ये जाऊन विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात काम करा,” असे त्यांनी माशेलकरांना सांगितले. अवघ्या २ हजार, १०० रुपये पगारावर डॉ. माशेलकर नोकरीवर रूजू झाले.
“संशोधनाच्या क्षेत्रात काम करायचं असेल, तर पैशांकडे पाहून चालत नाही. हे व्यापक कार्य आहे. त्यातून आपण जास्तीत जास्त लोकांच्या उपयोगाचं काम करू शकतो, ही भावना महत्त्वाची आहे,” असे ते कायम सांगतात. १९८९ मध्ये त्यांनी राष्ट्रीय रसायनशास्त्र प्रयोगशाळेच्या संचालकपदाची सूत्रं हाती घेतली. तब्बल ११ वर्षं त्यांनी या प्रभावी संस्थेचे नेतृत्व केले. मूलभूत संशोधनाला उद्योजकेतेची सांगड घालून कार्य करण्याचा सल्ला त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना दिला. त्यातूनच औद्योगिक क्षेत्रात काम करणार्या संशोधकांची फळी निर्माण झाली. १९९५ मध्ये त्यांनी ‘काऊंसिल ऑफ सायंटिफिक अॅण्ड इंडस्ट्रियल रिसर्च’ या संस्थेची सूत्रं हाती घेतली. देशात असलेल्या ४० वेगवेगळ्या संशोधन संस्थांना त्यांनी एकत्र आणलं आणि संशोधन क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणला.
इतिहासामध्ये ‘हल्दीघाटी’ची लढाई प्रसिद्ध आहे. पण, डॉ. माशेलकर यांच्यातील जिद्दीला प्रेरणा देणारी विज्ञान क्षेत्रात एक वेगळीच ’हल्दीघाटी’ची लढाई प्रसिद्ध आहे. हजारो वर्षांपासून ज्या हळदीचा वापर भारतीय करत आहेत, त्या हळदीवर अमेरिकेने दावा केला होता. हळदीच्या औषधी गुणांच्या शोधाचं पेटंट अमेरिकेनं आपल्या नावावर केलं होतं. त्यांच्या या दाव्याला माशेलकरांनी आव्हान दिलं होतं. त्यांना आणि त्यांच्या सहकार्यांना सलग १४ महिने न्यायालयीन लढा द्यावा लागला. हा प्रश्न फक्त हळदीचाच होता असं नाही, तर यामुळे स्वामित्व हक्क कायद्यात मोठे बदल घडले. या विजयामुळे पेटंट वर्गीकरणाच्या पद्धतीत सुधारणा करण्यात आली. या न्यायालयीन लढ्यानंतर अनेक माध्यमांनी त्यांचा गौरव ’हल्दीघाटीचा योद्धा’ म्हणून केला. पण, देशासाठी काहीतरी करता आले, हीच त्यांची देशाप्रती असलेली भावना लक्षात येते.
२०१४ साली ‘पद्मविभूषण’ हा सन्मान देऊन भारत सरकारनं त्यांच्या कार्याचा गौरव केला. त्याआधी त्यांना ‘पद्मश्री’ आणि ‘पद्मभूषण’ हे पुरस्कार मिळाले आहेत. त्यांना १९८२ मध्ये ‘शांतीस्वरुप भटनागर पुरस्कार’ मिळाला आहे. इंग्लंडच्या प्रतिष्ठित रॉयल सोसायटीची फेलोशिप त्यांना मिळाली आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातल्या नेतृत्वासाठी त्यांना ‘जे. आर. डी. टाटा कॉर्पोरेट लीडरशिप अॅवार्ड १९९८’ साली त्यांना मिळाला आहे.
“कोणतंही काम केलं तरी त्यात नैपुण्य मिळवा. आपलं काम जास्तीत जास्त लोकांच्या उपयोगाला कसं येईल, याचा विचार करा,” असा संदेश ते तरुणांना देतात. संशोधन क्षेत्रात काम करणार्यांना खूप संधी आहेत, असे ते म्हणतात. “पूर्वीच्या तुलनेत आता तुमच्या हाती खूप सारी साधन संपत्ती आहे. विदेशात शिक्षण घेण्यासाठी किंवा नोकरीसाठी जरूर जा. त्यातून तुम्हाला नवे अनुभव मिळतील. जेव्हा तुम्ही भारतात परत याल तेव्हा या नव्या अनुभवांचा फायदा इथल्या लोकानांच होईल,” असे ते म्हणतात. “देवाने जर त्यांना त्यांची एक इच्छापूर्ती करण्याचे आश्वासन दिले, तर ते काय मागतील?” डॉ. माशेलकर म्हणतात की, “मी देवाकडे पृथ्वीवर जाण्यासाठी फक्त १ दिवस मागेन. २०५० मध्ये जगाचे नेतृत्व करणारा प्रगत भारत देश बघण्यासाठी माझं स्वप्न प्रत्यक्षात उतरलेलं बघण्यासाठी!” नव्या पिढीविषयी, तरुणांविषयी आणि एकूणच भविष्याविषयी माशेलकर कमालीचे आशावादी आहेत.
“भारतीय तरुणांमध्ये खूप क्षमता आहे, भारत हा देशदेखील तरुण आहे. त्यामुळे भारताचं भविष्य उज्ज्वल आहे यात तीळमात्र शंका नाही,” असं ते म्हणतात. आजच्या सोशल मीडियाच्या जगात गुरफटलेल्या तरुणांपर्यंत हा विज्ञान परिमळू पोहोचावा म्हणून हा लेखन प्रपंच आहे. डॉ. रघुनाथ माशेलकर यांना जन्मदिवसानिमित्त मनःपूर्वक अभीष्टचिंतन आणि सस्नेह नमस्कार. जीवेत शरद: शतम्!
सर्वेश फडणवीस