मुंबई : अभिनेत्री तुनीषा शर्मा आत्महत्या प्रकरणी अभिनेता शिजान खान जबाबदार असून त्यास कठोर शिक्षा करावी अशी तुनीषा शर्मा यांच्या आईची तीव्र भावना आहे.तुनीषा शर्मा या तरुण अभिनेत्री मुलीच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या दोषी आरोपीस फाशीची शिक्षा करावी अशी मागणी आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केली आहे.
मयत अभिनेत्री तुनीषा शर्मा यांच्या कुटुंबियांची मीरा रोड येथील निवासस्थानी आज केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांत्वनपर भेट घेतली. यावेळी दिवंगत अभिनेत्री तुनीषा शर्मा यांच्या मातोश्री ; मामा आणि काका असे कुटुंबीय उपस्थित होते. अभिनेत्री तुनीषा शर्मा हीच तिच्या आईची एकमेव आधार होती. तुनीषा च्या वडिलांचे काही वर्षांपूर्वीच निधन झाले आहे.त्यामुळे अभिनेत्री तुनीषा शर्मा ची आई निराधार झाली आहे. त्यांना महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून २५ लाखांची मदत करावी तसेच रिपब्लिकन पक्षातर्फे ३ लाख रुपयांची सांत्वनपर मदत ना.रामदास आठवले यांनी यावेळी जाहीर केली.
तुनीषा आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी तसेच या प्रकरणी विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांची नियुक्ती करावी अशी मागणी ना.रामदास आठवले यांनी केली आहे.या बाबत लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले.
दिवंगत अभिनेत्री तुनीषा शर्मा यांचे अभिनेता शिजान खान यांच्या सोबत केवळ ३ महिन्यांपासून ओळखीचे संबंध होते. ३ महिने त्याने तुनीषाला जाळ्यात ओढण्याचे प्रयत्न केले. त्या नंतर तुनीषाला शिजान चे इतर महिलेशी संबंध असल्याचे कळल्यामुळे ती खचली. त्याने लग्नाला नकार दिल्यामुळे तुनीषाने हताश होऊन आत्महत्या केल्याचा आरोप तुनीषा च्या आईने केल्याची माहिती .रामदास आठवले यांनी दिली आहे.
एका तरुण वयाच्या मुलीला अभिनेत्रीला तिचे आयुष्य बहरण्याआधीच संपविण्यास जबाबदार व्यक्तीला फाशीची शिक्षा दिली पाहिजे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषीला फाशी द्यावी अशी मागणी ना.रामदास आठवले यांनी केली असून या प्रकरणी स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांशी ना.रामदास आठवले यांनी चर्चा केली. यावेळी रिपाइं चे मीरा भाईंदर जिल्हा अध्यक्ष देवेंद्र शेलेकर; डॉ विजय मोरे; उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्ष रमेश गायकवाड आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.