गोवंश संरक्षणासाठी झटणारा स्वयंसेवक

30 Dec 2022 20:38:14
Rishikesh Nandkumar Bhagwat


देव, देश, धर्मासाठी कार्य करण्याचा त्याने अल्पवयातच ध्यास घेतला. आतापर्यंत त्याने शेकडो गोवंशांची सुटका केली आहे. जाणून घेऊया गोवंशसंरक्षक ऋषिकेश नंदकुमार भागवत याच्याविषयी...


ऋषिकेश नंदकुमार भागवत याचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील बेलापूर येथे झाला. वडिलांचा केशकर्तनालय आणि दुग्धव्यवसाय होता. एसआरके इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये त्याने आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. पणजोबा, आजोबा ते वडीलसुद्धा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडले गेले असल्याने ऋषिकेशवरही बालपणीच रा. स्व. संघाचे संस्कार झाले. प्राथमिक शिक्षणानंतर त्याने संघशाखेत घोष आणि वादनही शिकून घेतले. त्याची संघाविषयीची जवळीक हळूहळू वाढत गेली. पुढे बेलापुरातील जेटीएस हायस्कूलला त्याने प्रवेश घेतला. वडिलांच्या सल्ल्यानंतर त्याला व्यायामाची आवड निर्माण झाली आणि पानसंडे गुरूजींच्या मार्गदर्शनाखाली त्याने शरीरसौष्ठव स्पर्धांच्या तयारीला सुरूवात केली.

जिल्हास्तरीय अनेक स्पर्धांमध्ये त्याने यश मिळवले. वडिलांचा दुग्धव्यवसाय असल्याने घरी गाईंना विशेष मान होता. दररोज आई गाईची पूजा करून आशीर्वाद घेत असे. हे सर्व पाहून ऋषिकेशलाही गाईविषयी प्रेम वाटे. संघ शाखेतही गाय आपली माता आहे, असे सांगितले जायचे. त्यामुळे त्याने गोरक्षणाविषयी माहिती घेण्यास सुरुवात केली. इयत्ता अकरावीत असताना त्याला मिलिंद एकबोटे यांच्याविषयी आणि त्यांच्या गोरक्षणाच्या कार्याविषयी ऐकायला व वाचायला मिळाले. त्यांच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन त्याने मिलिंद एकबोटे यांनाच आपले गुरू मानले आणि गोरक्षणाच्या कामाला सुरूवात केली.
गाव परिसरात तथा पंचक्रोशीत कुठेही गोहत्या होणार नाही आणि होत असेल, तर ती थांबवण्यासाठी ऋषिकेशने युवकांना एकत्र करत जनजागृती करण्यास सुरुवात केली. प्रारंभी त्याला स्थानिकांकडून बेलापुरातील एका ठिकाणी अवैधपणे कत्तलखाने सुरू असल्याची माहिती मिळाली.

गोरक्षण कार्यात नवखा असल्याने आणि तरुण रक्त व उत्साहाच्या भरात तो अवैध कत्तलखान्याची पोलखोल करण्यासाठी एकटाच केला. यावेळी छायाचित्रे काढल्याने त्याला कत्तलखाना चालकांनी बेदम मारहाण केली. कायद्याच्या ज्ञानाच्या अभावामुळे आणि अपुर्‍या नियोजनामुळे त्याला अपयश आले. परंतु, स्थानिकांच्या मध्यस्थीने त्याचा जीव वाचला. या प्रकारावरून धडा घेत त्याने पुढे आवश्यक त्या सगळ्या गोष्टींची माहिती मिळवली आणि कामाला सुरूवात केली. पदवीच्या पहिल्या वर्षांपर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने पूर्णवेळ गोरक्षणासाठी देण्याचा निर्णय घेतला. पुढे त्याने मिलिंद एकबोटे यांची पुण्यात प्रत्यक्ष भेट घेतली आणि स्वतःला गोरक्षणासाठी झोकून दिले. पुण्यात आपली नोकरी सांभाळून त्याने गोरक्षणाला सुरुवात केली.

सुरुवातीला त्याने 70हून अधिक गोवंशाची सुटका केली आणि मग त्याने मागे वळून पाहिलेच नाही. राहुरीत आठ, लोणीबाजारातून संभाजीनगरला कत्तलीसाठी जाणार्‍या तीन देशी गाईंची सुटका, कोल्हारमध्ये 18 वासरांची सुटका अशा अनेक मोहिमा त्याने यशस्वीपणे पूर्ण केल्या. गोरक्षणाचे काम वाढत गेले आणि ऋषिकेश त्या कार्यामध्ये पूर्णतः मग्न झाला. मिलिंद एकबोटे यांनी ऋषिकेशला गोरक्षण आणि त्यासंबंधित कायदेविषयक सर्व मार्गदर्शन केले. मुलगा देव, देश, धर्मासाठी कार्य करत आहे, त्याचा आम्हाला अभिमान आहे, अशा शब्दांत ऋषिकेशच्या आई-वडिलांनीही त्याला संपूर्ण पाठिंबा दिला.

किकवी भोर येथे ऋषिकेशने होत असलेल्या अवैध गोतस्करीविरोधात रणशिंग फुंकले. त्याच्या प्रयत्नाने या परिसरातील गोतस्करी आणि गोहत्येचे प्रमाण कमी झाले. हळूहळू त्याने युवकांमध्ये आपल्या कार्याविषयी जनजागृती केली. आतापर्यंत त्याला 100हून अधिक गोवंशांचे गोदान प्राप्त झाले. गोरक्षणासाठी न्यायालयाची पायरी चढावी लागते. जीवे मारण्याच्या धमक्या ही तर नित्याचीच बाब बनून जाते. कित्येक हल्ले पचवून पुन्हा उभे राहावे लागते. गोवंशाची सुटका केल्यानंतर त्यांना गोशाळेला सोपवले जाते. आतापर्यंत त्याने 500हून अधिक गोवंशाची सुटका केली आहे. उपेंद्रजी बलकवडे, अभिजित चव्हाण, मंगेश नडे, गौरव शिंदे, योगेश शेटे, सुभाष कदम, अभि मुळे, अक्षय पवार अशा अनेक सहकार्‍यांचे ऋषिकेशला या कामात सहकार्य मिळते. ’लव्ह जिहाद’ या विषयावरही ऋषिकेश जनजागृती करतो.

“छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा समोर ठेवतो. गाय आपली माता आहे. हे केवळ माझे नव्हे, तर प्रत्येक हिंदूचे कर्तव्य आहे. प्रत्येकाने आपले कर्तव्य पार पाडले, तर आमच्यावर गोरक्षण करण्याची वेळच येणार नाही. महाराष्ट्रात गोहत्याबंदीच्या कायद्याची कडक अंमलबजावणी व्हायला हवी,” असे ऋषिकेश सांगतो. गोवंशाची सुटका केल्यानंतर ती निवांत चारा खाते त्याचबरोबर तिच्या चेहर्‍यावरील आनंद नवी ऊर्जा प्रदान करतो. भविष्यात गोहत्यामुक्त भारत आणि महाराष्ट्रासाठी कार्यरत राहाणार असल्याचे ऋषिकेश सांगतो. एक वर्षापूर्वी ऋषिकेशची मानद पशुकल्याण अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. त्यामुळे त्याच्या या गोरक्षणाच्या कार्याला आणखी बळ मिळाले आहे. इतक्या कमी वयातही जीवावर उदार होऊन गोरक्षणासाठी स्वतःला वाहून घेतलेल्या ऋषिकेश भागवत याला त्याच्या आगामी वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरूण भारत’तर्फे मनःपूर्वक शुभेच्छा...!



Powered By Sangraha 9.0